प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
केरिअन आणि लिशिअन लोक - पूर्वेकडील ग्रीक लोकांचीं स्थळें त्यांच्याशीं कमीअधिक प्रमाणांत सदृश असलेल्या व प्राचीन ग्रीकांशीं संबद्ध असलेल्या केरिअन आणि लिशिअन लोकांच्या देशांशीं लागून होतीं. अलेक्झांडरपूर्वीच्या शतकांत मायलेसाच्या हेकाटोम्नसच्या वंशांतील राजांच्या आधिपत्याखालीं केरिआ हें राष्ट्र सुसंघटित झालें होतें. ख्रि. पू. चवथ्या शतकाच्या पहिल्या दशकांत हेकाटोम्नस हा केरिआचा राजा झाला; पण त्याचा पुत्र मॉसोलस याच्या कारकीर्दीत (राज्यारोहण, ख्रि. पू. ३७७-७६) हें घराणें वैभवाच्या कळसाला जाऊन पोहोंचलें. हालिकार्नासस ही मॉसोलसच्या राज्याची राजधानी होती; व तेथील जें कलाकुसरीचें काम सध्यां उपलब्ध आहे तें ग्रीक धर्तीचें दिसून येतें. मॉसोलीअम म्हटलें गेलेलें जें त्याचें थडगें आहे, त्यावर ग्रीक कारागिरांनीं आपली सर्व निपुणता अहमहमिकेनें खर्च केलेली होती. या केरिआच्या राजांनीं आपली शासनपद्धति ग्रीक लोकांच्या शासनपद्धतीवर उभारलेली होती. मॉसोलिसच्या कारकीर्दीत एक ग्रीक तत्त्वज्ञ त्याच्या दरबारी आला होता व त्याला तेथें आश्रयहि मिळाला होता. मायलेसा शहरांत सुद्धां ग्रीक संस्कृतीच्या खाणाखुणा दिसून येतात, व तेथील जाहीरनामे ग्रीक भाषेंत निघत असल्याचें आढळून येतें. लिशिआमध्यें मात्र ग्रीक संस्कृतीचा फारच थोडा परिणाम झालेला आढळून येतो. तेथें ग्रीक भाषेच्या ऐवजीं देशी भाषाच प्रचारांत होती. व्यक्तींचीं अगर गांवांचीं नांवें पर्शियन आहेत. ग्रीक भाषा तुरळक तुरळक दिसून येते. नाणीं ग्रीक पद्धतीचीं आहेत, पण सर्वांहून जास्त थडग्याच्या अगर स्मारकांच्या अवशेषांत ग्रीक संस्कृतीची निश्चित छाप दिसून येते.