प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

कांहीं स्वतंत्र जातींशीं सामना - हें बंड मोडण्याची तजवीज केल्यानंतर, कथायोइ नांवाच्या राजाच्या नेतृत्वाखालीं निरनिराळ्या जातींच्या नायकांचा संघ स्थापन झाला होता त्यावर अलेक्झांडरनें आपला मोर्चा फिरविला. हा कथायोइ राजा रावी नदीच्या पूर्वेस रहात असून त्या वेळच्या सर्व योद्धयांमध्यें तो अग्रणी मानला जात असे. त्याच्याच शेजारचे हिफासिस (बिआस) नदीजवळच्या मुलखांत राहणारे ऑक्सिड्राकाइ नांवाचे लोक व लाहोरच्या खालीं रावी नदीच्या तीरावर रहात असणारे मलोइ नांवाचे लोक यांनीं देखील त्या संघाला मिळण्याचा विचार चालविला होता. अलेक्झांडर रावी नदी ओलांडून गेल्यानंतर दुसर्‍या दिवशीं जिला ॲरिअननें अद्रैस्ताइ म्हटलें आहे त्या जातीकडे असलेलें पिंप्रम नांवाचें शहर हस्तगत झालें. नंतर एक दिवसाची विश्रांति घेऊन अलेक्झांडर कथायोईंच्या संघानें मुख्य आश्रयस्थान केलेले पाणिनीनें उल्लेखिलेलें जें संगल त्यावर हल्ला करण्यास निघाला. तेथें त्या लोकांनीं त्याशीं कसून लढाई चालवून त्याला आपल्या शौर्याची प्रचीति आणून दिली. इतक्यांत अलेक्झांडरच्या मदतीला पोरस (वडील) पांच हजार सैन्य व वेढ्याची सामुग्री घेऊन येऊन पोंचला. पण शहराच्या तटबंदीस भगदाड पाडलें जाण्यापूर्वीच मॅसिडोनियन लोकांनीं तटबंदीवरून चढून जाऊन ती जागा काबीज केली. या हल्ल्यांत अजमासें शंभर मॅसिडोनियन लोक ठार व १२०० जखमी झाले. या विरोधानें चिडून जाऊन अलेक्झांडरनें तें शहर जमीनदोस्त केलें.

आतां पुढें जाण्यास हिफासिस (बिआस) नदी ओलांडणें जरूर होतें. ही नदी ओलांडून पलीकडील राष्ट्रे काबीज करण्यास ॲलेक्झांडर फार उत्सुक झाला होता. हे लोक अतिशय शूर म्हणून नांवाजलेले असून यांचा धंदा शेतकीचा होता. या प्रांतामध्ये मोठे व फार उत्तम हत्ती होतात असा त्याचा लौकिक होता.