प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
कला व वाङ्मय - अशाच प्रकारचा फरक वाङ्मय, पारमार्थिक व्यवहार व कला या बाबतींतहि दिसूं लागला. पूर्वीचा तरतरीतपणा व कल्पकता हीं हळू हळू कमी होऊं लागली. कांहींतरी भावनोद्दीपक छटा किंवा अधिक हुबेहुबपणा उठविल्याशिवाय लोकांनां कलेंत आनंद वाटेनासा झाला. वाङ्मयामध्यें ऐतिहासिक वाङ्मय अगर कृत्रिम वाङ्मयच लोकांनां आवडूं लागलें. कारागीर आणि विद्वान् लोक दरबारी लोकांनां रुचतील अशींच कलाकौशल्याचीं कामें व वाङ्मय निर्माण करूं लागले. बौद्धिक क्षेत्रांत बरीच प्रगति होऊं लागली. भौतिक सुधारणा अधिकाधिक होऊं लागली व ती होण्याला आतां वाटेल तितकें क्षेत्र मिळालें. काव्याला उतरती कळा लागली. अलेक्झांड्रिया येथील वैद्यकपीठांनी अनेक महत्त्वाचे व उपयुक्त शोध लावून मानवी ज्ञानांत भर घातली. वाङ्मयपीठांनीं व्याकरणशास्त्र उदयास आणलें, व ही वाङ्मयविषयक व कलाविषयक आवड उच्च दर्जास नेऊन पोहोंचविली. पूर्वयुग कल्पकतेचें व स्फूर्तीचें होतें, तर नवीन युग विद्वत्तेचें व चिकित्सेचें होतें. पूर्वीचे प्रसिद्ध ग्रंथ बारकाईनें अभ्यासले जाऊन त्यांची चिकित्सा होऊं लागली. लोकांनीं निरनिराळ्या देशांत राहून अध्ययन करण्यास सुरुवात केली. पुस्तकांची संख्या भराभर वाढूं लागली. ग्रंथालयें जिकडे तिकडे स्थापन झालीं. राजे लोकांनीं मोठमोठी ग्रंथालयें स्थापलीं. ख्रि. पू. ४७ च्या सुमारास अलेक्झांड्रियाचें ग्रंथालय जळालें तेव्हां तेथें ७,००,००० ग्रंथसमूह होता. फार तर काय, अगदीं लहान लहान शहरांत देखील ग्रंथालय अस्तित्वांत आलें होतें.
पण रोमन साम्राज्याखालीं ग्रीक संस्कृतीचा र्हास होऊं लागतांच भौतिक सुधारणाहि होईनाशी झाली; व मध्यंतरीं जरी वाङ्मयाचें पुनरुज्जीवन झालें होतें तरी तें केवळ अनुकरणात्मक व कृत्रिम होतें.