प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

इराणी लोक - पूर्वेकडील स्वामी जे इराणी लोक त्यांच्यावर या नवीन संस्कृतीचा परिणाम होण्यास फारच थोडा अवकाश सांपडला. तथापि ग्रीक लोकांच्या अंगचे लष्करी गुण व तसेंच त्यांचें उपयुक्त भौतिक शास्त्र यांची योग्यता इराणी लोकांनीं ओळखली होती. दरायसनें एका ग्रीक कप्तानाची सिंधूचें संशोधन करण्यासाठीं नेमणूक केली. एका ग्रीक शिल्पशास्त्रज्ञानें त्याला वास्पोरसवर पूल बांधून दिला. इराणी दरबारामध्यें ग्रीक वैद्यांच्या (उ. डेपोसीडीझ व टीसिअस) मोठमोठ्या पगारावर नेमणुका होऊं लागल्या. चवथ्या शतकामध्यें इराणी बादशहाचा व ग्रीक संस्थानांचा जो परस्परांशीं राजकीय बाबतींत संबंध घडून आला त्याचा परिणाम फक्त राजकीय बाबींपुरताच झाला नाहीं. पर्शियन सरदारांपैकीं जे सरदार आशियामायनरच्या बाजूला राहिले होते त्यांचा ग्रीक लोकांशीं निकट संबंध आल्यामुळें ग्रीक संस्कृतीच्या ध्येयात्मक बाजूकडेहि त्यांचें लक्ष वेधलेलें आढळून येतें. धाकट्या सायरससारख्या माणसाचा ग्रीक कप्तानांशीं मैत्री करण्यांत त्यांचा युद्धांत उपयोग करून घेण्यापेक्षां कांहीं अधिक हेतु होता; व त्यानें ग्रीक वारांगना मिळविल्या त्याहि केवळ विषयवासना तृप्‍त करण्याकरितांच नव्हत्या. मिथ्राडेटीझ यानें, सिलेनिअननें केलेला प्लेटोचा पुतळा विद्यापीठाला नजर केला. पर्सेपोलिस अगर सुसा येथील राजवाड्यासारख्या पार्शियन कलाकौशल्याच्या कामामध्यें ग्रीक लोकांकडून नक्षी केलेली अगर पैलू पाडलेलीं रत्नें जात होतीं हें निश्चित आहे. शापूर येथील विद्यापीठांत ग्रीक अध्यापक आणले होतें व ग्रीक ग्रंथांचीं भाषांतरेंहि करण्याचा प्रयत्‍न चालू होता.