प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
असाकेनाईवर मोहीम - अलेक्झांडरनें यानंतर असाकेनाइ नांवाचें राष्ट्र काबीज करण्याचें काम हातीं घेतलें. तेथील लोकांजवळ २०,००० घोडेस्वार व ३०,००० हून अधिक पायदळ असून त्यांसह ते लढाईला सज्ज होऊन राहिले आहेत अशी बातमी त्याला लागली होती. अलेक्झांडरनें आपल्याबरोबर निवडक घोडेस्वारांचें पथक घेऊन गौरायास (हल्लीची पंजकोरा) नदी ओलांडली, व त्यांच्या प्रदेशांत शिरून त्या लोकांच्या मरसग नांवाच्या एका मुख्य शहरावर हल्ला करण्याचा बेत केला. हें शहर म्हणजे एक भरभक्कम किल्लाच होता. त्याच्या पूर्वेला एक डोंगरांतून वहात आलेली मोठी नदी असून तिच्यामुळें ती बाजू सुरक्षित झाली होती; व दक्षिणेला व पश्चिमेला मोठे पर्वत व टेकड्या असल्यानें त्या बाजूहि निर्धोक होत्या. मोकळ्या राहिलेल्या बाजूस शहराभोंवतीं चार मैलांची एक प्रचंड भिंत असून शिवाय तिच्याबरोबर एक खोल खंदकहि होता. अशा शहरावर कोठून कसा हल्ला करावा हें ठरविण्यासाठीं टेहळणी करीत असतांना अलेक्झांडरला एक बाण लागून तो जखमी झाला. परंतु जखम फारशी मोठी नसल्यामुळें त्यानें आपलें वेढ्याच्या देखरेखीचें काम दक्षतापूर्वक चालू ठेविलें. अशा प्रकारचा शूर सेनापति लाभला असतां साध्या शिपायाला देखील स्फुरण चढणें साहजिक आहे. त्याच्या सैनिकांनीं अतिशय उत्साहानें काम करून नऊ दिवसांच्या आंतच खंदकावरून पलीकडे जाण्यासाठीं धक्का तयार केला, व अशा रीतीनें भिंतीच्या जवळ जाऊन यंत्रांच्या साहाय्यानें मारा करण्यास सुरुवात केली. मुख्य नाईक आरंभींच जखमी होऊन मेल्यामुळें किल्ल्याच्या संरक्षणास असलेल्या शिपायांचा उत्साह नाहींसा होऊन ते अलेक्झांडरला शरण आले. त्या नायकाची बायको अलेक्झांडरच्या हातीं लागली व तिला त्याच्यापासून एक मुलगाहि झाला असें म्हणतात. मस्सगच्या किल्याच्या रक्षणाकरितां ७००० भाडोत्री शिपाई ठेवलेले होते. 'मला येऊन मिळाल्यास मी तुम्हांस जीवदान देतों' असें अलेक्झांडरनें त्यांनां सांगितलें, व तें त्यांनीं कबूल करतांच मॅसिडोनियनांच्या लष्करापासून नऊ मैल दूर असलेल्या एका टेकडीवर जाऊन राहण्यास त्यांनां परवानगी देण्यांत आली. परंतु स्वतःच्या लोकांनां जिंकण्यास मदत करणें हें बरोबर नाहीं असें त्यांनां वाटल्यावरून रात्रीच्या रात्रीं पळून जाण्याचा त्यांनीं बेत केला. अलेक्झांडरला ही वर्दी लागतांच त्यानें त्यांच्यावर एकदम छापा घातला. त्या लोकांनीं व त्यांच्या बायकांनीं मोठ्या धैर्यानें अलेक्झांडरच्या सैन्यास तोंड देऊन लढण्याची शिकस्त केली व कैद होऊन अपमानानें जिवंत रहाण्यापेक्षां लढतां लढतां प्राण सोडणें त्यांनीं पतकरले. अलेक्झांडरच्या या कृत्याबद्दल पुष्कळांनीं त्यावर झणझणीत टीका केली आहे. त्यांच्या मतें अशी विश्वासघातानें कत्तल करणें अगदीं नीचपणाचें काम होय. परंतु एका दृष्टीनें अलेक्झांडरनें केलें तें बरोबरच केलें असें म्हटलें पाहिजे. कारण इतके शूर शिपाई विरुद्ध बाजूस मिळाले असते तर अलेक्झांडरला फार त्रास झाला असता.
अलेक्झांडरनें नंतर ओरा अथवा नोरा नांवाचें शहर काबीज केलें, व बझिरा नांवाचें एक महत्त्वाचें ठिकाण ताब्यांत घेतलें. या शहरांतील लोक इतर शहरांतील लोकांप्रमाणेंच सिंधु नदीच्या जवळील औरनोस नामक किल्ल्यांत आश्रयासाठीं गेले होते. लष्करी दृष्ट्या हें स्थळ महत्त्वाचें असल्यामुळें अलेक्झांडरनें तें काबीज करण्याचें ठरविलें. अलेक्झांडरच्या पूर्वी हेराक्लीझ याचे बेत या शहरानेंच ढासळून पाडले होते. या स्थळाच्या दक्षिण बाजूस सिंधु नदीचे खोल पात्र असून इतर बाजूंनीं मोठे पर्वत, कडे वगैरे पसरले होते. अलेक्झांडरनें आपल्या नेहमींच्या पद्धतीस अनुसरून हा किल्ला काबीज करण्यास निघण्यापूर्वी आपली मागील बाजू ओरा, मस्सग, बझिरा वगैरे ठिकाणीं सैन्य ठेवून सुरक्षित केली. तसेंच, स्वतः स्वारी करून त्यानें पेउकेलेओटिस ( चारसड्डा) आणि त्याच्या आसपास असलेला युसुफझाय नांवाचा मुलूख घेतला, व अशा रीतीनें त्या किल्ल्याला बाहेरची मदत मिळणें अशक्य करून सोडलें. नंतर त्यानें मोठ्या प्रयासानें औरनोसच्या पायथ्याखालीं असलेलें एंबोलिगा नांवाचें सिंधूवरील एक लहान शहर ताब्यांत घेऊन तेथें क्राटेरॉसच्या ताब्यांत युद्धसामुग्रीचें कोठार ठेवलें. उद्देश हा कीं, हल्ला अयशस्वी होऊन वेढा घालण्याची पाळी आली, तर तें दिरंगाईचें युद्ध चालवण्यास आसर्याची जागा असावी. नंतर अलेक्झांडरनें त्या किल्ल्याची दोन दिवस बारकाईनें टेहळणी केली. वाटाड्यांनां भरपूर बक्षीस देऊन त्यांच्या साहयानें लेगसचा पुत्र टॉलेमी यानें पर्वताच्या पूर्वेकडील फांट्यावर एक मार्याचें ठिकाण शोधून तेथे त्यानें खंदक खणून आपले लोक बसविले. त्याच्या मदतीस जाण्याचा अलेक्झांडरचा प्रयत्न फसल्यानें टॉलेमीच्या सैन्यावर जोरावर हल्ला आला. तेथें दोन्ही सैन्यांत तुंबळ युद्ध होऊन टॉलेमीनें तो हल्ला कसाबसा परतविला. अलेक्झांडरचा दुसरा प्रयत्न मात्र खूप झटापटीनंतर यशस्वी झाला, व मॅसिडोनियनांच्या हातांत त्या किल्ल्यावर मारा करण्यास सोयीचें असें स्थान आलें. तरी पण अद्यापहि त्या किल्ल्यावर एकदम हल्ला करतां येणें अशकय होतें. म्हणून प्रथम त्या जागीं विपुल असलेलीं लांकडें घेऊन अलेक्झांडरनें मधल्या दर्या भरून काढून चांगला रस्ता तयार केला. आतां मात्र हल्ल्याची सर्व पूर्व तयारी झाली. हल्ला यशस्वी होणार असें शत्रूला दिसतांच त्यानें समेठाचें बोलणें सुरू केलें. यांत त्यांचा एक उद्देश हा होता कीं, अलेक्झांडरला समेटाच्या बोलण्यांत गुंतवून रात्रीं बर्याच लोकांनीं मिळून निसटून जावें. परंतु अलेक्झांडर फार धूर्त असल्यानें त्यानें ७०० निवडक शिपायांसह किल्ला चढून जाऊन त्यांचा बेत बराचसा फसविला. अशा रीतीनें हेराक्लीझलाहि जो किल्ला घेतां आला नव्हता तो अलेक्झांडरनें काबीज केला. या जयोत्सवाप्रीत्यर्थ, अथीनि आणि नायकी या देवतांची पूजा करून त्यांनां बळी देण्यांत आले, व तेथें एक किल्ला बांधण्यांत येऊन त्या किल्ल्याचा बंदोबस्त सिसिकोटस (शिशुगुप्त) नांवाच्या एका विश्वासू हिंदू माणसाकडे सोंपविण्यांत आला.