प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
अलेक्झांडरची हिंदुस्थानावर स्वारी - अलेक्झांडर यानें बॅक्ट्रियाचें राज्य पूर्णपणें हस्तगत करून, डायोनायसस, हेराक्लीझ आणि सिमिरामिस यांच्या हातून झालेल्या अद्भुत गोष्टींवर ताण करण्यासाठीं, हिंदुस्थानावर स्वारी करण्याचा निश्चय केला. ख्रि. पू. ३२७ या वर्षी वसंत ॠतूच्या शेवटीं त्यानें हिंदूकुश आणि खावक यांच्या घाटांतून ५०I६० हजार गोर्या सैन्यासह कूच केलें; व दहा दिवसांनंतर तो ज्याला आतां दाम म्हणतात त्या कोहि सुसंपन्न खोर्यापाशीं आला. येथें त्यानें दोन वर्षांपूर्वी आपल्या स्वारीच्या सुरक्षिततेसाठीं मार्याची जागा पाहून अलेक्झांड्रिया नांवाचें एक शहर वसविलें होतें. येथील पूर्वीचा अधिकारी नालायक दिसल्यानें त्याच्या बदलीं आपल्या पार्मीनिऑन नामक मित्राच्या नायकेनॉर या नांवाच्या मुलाची त्या जागेवर नेमणूक केली. तसेंच वरील घांटावरील प्रदेशावर आणि काबूल नदीच्या कांठच्या प्रदेशावर टायरिआस्पस यास नेमून व कडेकोट बंदोबस्त करून तो काबूलपासून हिंदुस्थानास जावयाच्या मार्गांतील जलालाबाद शहराच्या पश्चिमेस असलेल्या निकैया नामक शहराजवळ आपल्या सैन्यासह दाखल झाला. येथें त्यानें आपल्या सैन्याचे दोन भाग केले. एका भागावर हेफाइस्तिऑन आणि पेर्डिक्कस या दोन सेनापतींची नेमणूक करून त्यांनां तीन पायदळांच्या तुकड्या, अर्धे घोडदळ व सर्व भाडोत्री घोडेस्वार यांच्यासह तडक हिंदुस्थानाकडे कूच करण्यास सांगितलें; व सिंधुनदीच्या कांठीं जाऊन पेउकेलओटिस हें शहर काबीज करण्याचा हुकूम केला. मार्गांतील निरनिराळ्या जातींच्या नायकांनीं त्यास अडथळा करण्यापेक्षां शरण जाण्यांतच आपलें हित आहे असें पाहिलें; तथापि हस्ति (अस्तेस) नांवाच्या एका नायकानें मात्र त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानें आपला किल्ला तीस दिवस एकसारखा झुंजविला, पण शेवटीं तो काबीज करण्यांत येऊन त्याचा विध्वंस करण्यांत आला. या स्वारीमध्यें अलेक्झांडरच्या सेनापतीबरोबर तक्षशिलेचा राजा हजर होता व सिंधुनदीच्या पश्चिमतीरावरील दुसरे राजे देखील असेच त्यांनां मदत करण्यास आले होते. या हिंदू संस्थानिकांच्या मदतीनें अलेक्झांडरच्या सेनापतींनां सिंधु नदीवर पूल बांधण्याचें त्यांच्याकडे सोपविलेलें काम पार पाडण्यास विशेषसा प्रयास पडला नाहीं.