प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

अलेक्झांडर दि ग्रेटनंतर - ख्रि. पू. चवथ्या शतकाच्या मध्यकालापर्यंत साधारणतः ग्रीक संस्कृतीचा प्रसार किती झाला हें पाहूं लागल्यास आपणाला असें आढळून येईल कीं, ग्रीक वसाहतींनां लागून असलेल्या शहरांमध्येंच ग्रीक संस्कृति पसरली होती, व त्यांतहि मॉसिडोनियाच्या राज्याशिवाय इतरत्र ती नुसती दरबारांत व वरच्या वर्गामध्येंच पसरलेली होती. पण त्याचबरोबर हेंहि ध्यानांत ठेवणें जरूर आहे कीं, ग्रीक संस्कृति अस्तित्वांत येऊन फारच थोडा काल लोटला होता. ग्रीक संस्कृतीचा तींतील आध्यात्मिक विचारांच्या योगानेंच केवळ किती प्रसार झाला असता हें ठरविणें फार कठिण आहे. जेव्हां अलेक्झांडरनें आपल्या विजयामुळें आपली सत्ता पूर्वेकडे हिंदुस्थानापर्यंत नेली व ज्या वेळीं ग्रीक शहरें निरनिराळ्या ठिकाणीं वसविलीं गेलीं, त्या वेळीं ग्रीकांचें ऐहिक व व्यावहारिक महत्त्व वाढलें; व त्यामुळें सर्वच गोष्टींत फरक घडून आला. जगज्जेत्या लोकांनीं ज्या गोष्टींस महत्त्व दिलें त्या गोष्टी सामान्य लोकहि महत्त्वाच्या मानूं लागले. ग्रीक संस्कृतीचे प्रसारक म्हणवून घेण्यांत मॅसिडोनियन राजांनां अभिमान वाटूं लागला. अलेक्झांडरविषयीं तर बोलावयासच नको. आशिया मायनर, सिरिया इजिप्‍त येथील अलेक्झांडरनंतर येणार्‍या राजांच्या दरबारीं ग्रीक भाषाच चालत असे; व तेथील सर्व वातावरणच ग्रीक होतें. ग्रीक शहरांसाठीं व ग्रीक संस्थांसाठी अनेक देणग्या देऊन ग्रीकांच्या तोंडून धन्यवाद मिळविण्यासाठीं सर्व राजे प्रयत्‍न करीत असत. ग्रीक वाङ्‌मयाला व कलेला पुष्कळ राजांनीं आश्रय दिला; व कित्येकांनीं स्वतःच ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्‍न केला. ग्रीकेतर राजांच्या दरबारांनीं देखील ग्रीकांचें अनुकरण करण्यास सुरुवात केली होती. पण कांहीं झालें तरी ग्रीक संस्कृति ही नुसत्या दरबारप्रवेशानें पसरणें अशक्य होतें. ग्रीक संस्कृति ही ग्राम्य नसून नगरराज्याच्या विकसित संस्कृतीपासून ती निष्पन्न झाली होती; व ती नगरराज्याव्यतिरिक्त पसरणें शक्य नव्हतें. अलेक्झांडरनें सर्वत्र ग्रीक शहरें वसविलीं व या नगरराज्यपद्धतीवरच ग्रीक संस्कृतीचा प्रसार झाला. पुढें या नगरराज्यांतील राजांचीं घराणीं जरी नष्ट झालीं, तरी तेथें एकदां प्रस्थापित झालेल्या संस्कृतीला धक्का पोहोंचला नाहीं. रोमची सत्ता बलाढ्य झाली तेव्हां तिनें या संस्कृतीच्या रक्षणापलीकडे कांहीं केलें नाहीं. पूर्वेकडे रोमनें ग्रीक संस्कृतीचाच प्रसार केला. या दृष्टीनें पाहतां ग्रीक संस्कृति ही एका अखंड प्रवाहाप्रमाणें वहात चाललेली आढळून येईल. हा अखंड प्रवाह वहात असतां त्याला मॅसिडोनियन लोकांनीं वळण दिलें, व रोमच्या आश्रयाखालीं तो प्रवाह तसाच वहात चालला. तो कसा वहात चालला हें पहाणें जरूर आहे. पण तत्पूर्वी हीं 'नगरराज्यें' काय होतीं याचा थोडासा विचार करणें आवश्यक आहे.