प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

अलेक्झांडरचा जलप्रवास व मार्गांतील लोकांचा विरोध - अलेक्झांडरच्या आरमाराच्या संरक्षणार्थ दोन्ही तीरांवर मिळून वर सांगितलेल्या दोन सेनापतींच्या हातांखालीं १,२०,००० सैन्य चालावयाचें होतें, व सिंधूच्या पश्चिमेकडील मुलुखाचा क्षत्रप फिलिप्पॉस यास तीन दिवसानंतर पिछाडीनें येण्यास सांगितलेलें होतें. अशा रीतीनें या आरमारानें आपला प्रवास सुरू केला. एके दिवशीं सकाळीं नदीच्या देवतांनां वगैरे बळी अर्पण करून अलेक्झांडरनें आपलें आरमार हांकारण्याचा हुकूम सोडला (अक्टोबर ख्रि. पू. ३२६). तिसर्‍या दिवशीं हेफाइस्तिऑन व क्रॉटेरॉस यांनां जेथें तळ देण्यास सांगितलें होतें त्या ठिकाणी, म्हणजे बहुधा भीरपाशीं हे आरमार येऊन पोहोंचलें. येथें मागून फिलिप्पॉसचें सैन्य येईतोंपर्यंत मुक्काम करण्यांत आला, व दोन दिवसांनीं ते सैन्य आल्यावर फिलिप्पॉस यास मागें चालण्याच्या ऐवजीं पुढें जाण्याची आज्ञा झाली. नंतर आरमार पुन्हां निघालें व पांचव्या दिवशीं जेथें झेलम नदी चिनाबला मिळते तेथें येऊन पोहोंचलें. येथें नदीचें पात्र लहान असून त्यांत भयंकर भोंवरे झालेले होते. त्यामुळें आरमाराला फार त्रास झाला. येथें पुष्कळशा खलाशांनिशीं दोन लढाऊ गलबतें बुडालीं व अलेक्झांडर ज्या जहाजांत बसला होता तें जहाज देखील अगदीं संकटांत सांपडलें होतें. शेवटीं अतिशय खटपटीनें बहुतेक आरमार तीरावर सुखरूपपणें येऊन लागलें. येथें अलेक्झांडर आपल्या सैन्यानिशीं उतरला, व ज्यांनां कर्शिअसनें सिबोइ व अगलसोइ म्हणून म्हटलें आहे त्या आसमंतांतील जातींनीं, नदीच्या खालच्या बाजूस असलेलें मलोइ (मालव) नामक बलाढ्य राष्ट्र अलेक्झांडरशी लढण्याची तयारी करीत होते त्यास जाऊन मिळूं नये यासाठीं त्यांनां जिंकून घेण्याचें त्यानें ठरविलें. सिबोइ लोक हे जंगलांतील पशूंचीं कातडीं पांघरणारे व गदेसारखीं हत्यारें वापरणारे रानटी लोक होते, व ते अलेक्झांडरला कांहीं विरोध न करतां आपण होऊनच शरण आले. परंतु अगलसोइ लोकांनीं मात्र ४०,००० पायदळ व ३,००० घोडेस्वार जमवून अलेक्झांडरला अडथळा केला; तथापि त्यांचा युद्धांत पराभव होऊन त्यांचे असंख्य लोक मारले गेले व कित्येकांनां गुलाम म्हणून धरून विकण्यांत आलें. अलेक्झांडरनें त्यांच्या देशांत ३० मैल शिरून त्यांचे मुख्य शहर काबीज केलें. त्यांच्या दुसर्‍या शहराकडून त्यास जोराचा विरोध होऊन पुष्कळ मॅसिडोनियन शिपाई मारले गेले. तेथील २०,००० रहिवाश्यांनां जय मिळण्याची निराशा वाटूं लागतांच त्यांनीं शहराला आग लावून तींत ते आपल्या बायकांमुलांसकट पडले. मुख्य किल्ला मात्र या आगींतून बचावला. त्याच्या संरक्षणार्थ ठेवलेल्या ३,००० शूर लोकांस अलेक्झांडरनें जीवदान दिलें.

इतक्यांत मलोइ, ऑक्सिड्राकाइ व इतर स्वतंत्र जातींनीं एकत्र होऊन आपल्याला तोंड देण्याची तयारी चालविली आहे असें अलेक्झांडरला कळलें. हे सर्व लोक एकत्र होण्याच्या आंत त्यांपैकीं एकएकट्या जातीवरच हल्ला करून त्यांचा बेत फिसकटविण्याचा अलेक्झांडरनें निश्चय केला. त्यानें आरमारास व बरोबर न घ्यावयाच्या सैन्यास पुढील रावी व चिनाब यांच्या संगमावर जमण्याचा हुकूम केला; व तो स्वतः रावी नदीच्या दोन्ही तिरांवरील खोर्‍यांत रहाणार्‍या मलोई लोकांनां प्रथम तोंड देण्याचा निश्चय करून निवडक सैन्यानिशीं कूच करून निघाला. या मालवांचे शेजारी जे ऑक्सिड्राकाइ (क्षुद्रक) यांचा जरी त्यांच्याशीं वैरभाव होता तरी या वेळेस ऑक्सिड्राकाइ लोकांनीं आपला वैरभाव बाजूस ठेवून त्यांनां मदत करण्याचा निश्चय केला. या दोन्हीहि जातींनीं मोठ्या प्रमाणावर परस्परांत शरीरसंबंध घडवून आणून आपली मैत्री पक्की करण्याचा प्रयत्‍न केला होता. परंतु वैयक्तिक द्वेषानें नेहमींप्रमाणेंच हा समेट यशस्वी होऊं दिला नाहीं. कोणत्या पक्षाच्या सेनापतीनें सैन्याचें आधिपत्य घ्यावें याबद्दल या जातींमध्यें एकत्र वाद चालला असतां अलेक्झांडरनें अतिशय कौशल्यानें त्या लोकांवर हल्ला चढवला, आणि ऑक्सिड्राकाइ लोक मदतीला येण्यापूर्वीच त्यांचा धुवा उडविला. या जातींनां जर योग्य रीतीनें तयारी करण्यास अवसर मिळाला असता, तर त्यांनीं अलेक्झांडरबरोबरचें लहानसें सैन्य सहज नामशेष करून टाकलें असतें. कारण त्यांच्या जवळ ८०।९० हजार चांगलें पायदळ १०,००० घोडदळ व ७०० पासून ९०० पर्यंत रथ होते. मॅसिडोनियन सैन्य किती होतें हे जरी कोठें सांगितलेले नाहीं तरी तें कांहीं थोडक्या हजारांहून अधिक नसलें पाहिजे असें म्हणतात. परंतु अलेक्झांडरनें एकदम अचानक या लोकांनां गांठल्यामुळें प्रतिकार करण्यास त्यांनां अवसरच मिळाला नाहीं. रावी व चिनाब यांच्या खोर्‍यांच्या दरम्यान असलेलें ज्याला हल्लीं बार म्हणतात तें निर्जल पठार अवघ्या दोन मजलांत ओलांडून त्यानें शेतांत निशःस्त्र काम करीत असलेल्या मलोइ लोकांवर अचानक छापा घातला. अशा स्थितींत त्यांची धांदल उडून त्यांचा मोड होणें साहजिक आहे. त्यांच्यापैकीं पुष्कळांनीं हातहि वर उचचला नसतां त्यांची निर्दयपणें कत्तल करण्यांत आली. मॅसिडोनियन लोकांच्या हातून जे सुटले ते आपल्या तटबंदीच्या शहरांचा आश्रय घेऊन, वेशी बंद करून आंत राहिले. अशा या शहरांपैकीं एक अलेक्झांडरनें आपल्या स्वतःच्या देखरेखीखालीं हल्ला करून घेतलें व तेथील २००० शिबंदीची कत्तल केली. अशाच दुसर्‍या एका शहरावर पेर्डिक्कस यास पाठविलें होतें; परंतु तो तेथें जाईतों तेथील रहिवाशी शहर सोडून पळून गेले होते. अलेक्झांडर तसाच रावी नदीपर्यंत चाल करून गेला, व पळून जाणार्‍या मालाव लोकांस उताराच्या तेथेंच गांठून त्यांच्यापैकीं कित्येकांची त्यानें कत्तल केली. या लोकांचा पाठलाग करीत तो रावीच्या पूर्वेकडे गेला व हल्लीं ज्याला मांटगोमेरी जिल्हा म्हणतात त्या भागांतील ब्राह्मणांनीं वसलेलें एक शहर सुरुंग लावून व तटावरून चढून जाऊन त्याने काबीज केले. तेथें सुमारें ५००० लोक होते त्या सर्वांची कत्तल करण्यांत आली.

अशा रीतीनें या (मालव) मलोई लोकांचा जिकडे तिकडे कोंडमारा झाल्यामुळें, त्यांनीं पुन्हां रावी ओलांडून ५०,००० सैन्यानिशीं तिच्या उताराचें रक्षण करण्याचा प्रयत्‍न केला. परंतु अलेक्झांडरच्या सैन्यापुढें त्यांचा टिकाव न लागल्यामुळें त्यांनां पळ काढावा लागला. येथून ते निघाले ते आसमंतांतील एका मजबूत तटबंदीच्या शहराचा आश्रय घेऊन राहिले. हें शहर मुलतानच्या ईशान्येस ८०।९० मैलांवर असावे. हें शहर हस्तगत करीत असतां एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडून आली. मॅसिडोनियन लोकांनीं शहर काबीज केलें होतें व किल्ला सर करण्याकरितां तटावर चढण्याचा त्यांचा प्रयत्‍न चालला होता. परंतु शिड्या आणणारे लोक रेंगाळत येत आहेत असें पाहून अलेक्झांडरनें एका माणसापासून शिडी हिसकावून घेतली, आणि तिच्या साहाय्यानें तो आणखी तीन इसमांसह किल्ल्याच्या तटावर चढून गेला. परंतु तो तटावर चढून उभा राहतांच आंतील शत्रूंनां त्याच्यावर नेम धरण्याची आयतीच संधि मिळाली. हें अलेक्झांडरच्या लक्षांत येतांच त्यानें आपल्या सोबत्यांसह एकदम त्या किल्ल्यांत उडी टाकली. त्याच्या सोबत्यांपैकीं एक जण तर लवकरच मरून पडला. अलेक्झांडर स्वतः किल्ल्याच्या जवळील एका झाडाच्या आश्रयानें उभा राहिला, व त्यानें त्या किल्ल्याच्या हिंदु किल्लेदारास ठार मारलें. अनेक लोकांविरुद्ध तो एकटा स्वतःचें रक्षण करीत असतां त्याला एक बाण लागून तो खालीं पडला. लागलेंच त्याच्या दुसर्‍या सोबत्यानें त्याच्यावर चिलखत घातलें व तो व तिसरा सोबती मिळून त्याचें रक्षण करुं लागले. शिड्या मोडल्यानें बाहेरील मॅसिडोनियन लोकांस आपल्या राजाला मदत करण्यासाठीं किल्ल्यांत प्रवेश करणें कांहीं वेळ अगदीं अशक्य झालें. परंतु सरतेशेवटीं कांहीं लोक कसेबसे भिंतीवरून चढून गेले, व कांहीं लोकांनीं किल्ल्याचे दरवाजे फोडून आंत प्रवेश केला व अलेक्झांडरचे प्राण वांचविले. अलेक्झांडरच्या छातींत बाण घुसला होता तो शस्त्रक्रिया करून मोठ्या कौशल्यानें बाहेर काढण्यांत आला. या प्रसंगीं बराच रक्तस्त्राव होऊन अलेक्झांडर जगेल अशी लोकांस आशा राहिली नाहीं. परंतु अलेक्झांडरची प्रकृति फार सुदृढ असल्यामुळें त्याची प्रकृति हळू हळू सुधारूं लागली, व कांहीं दिवसांनीं तो चांगला बरा झाला.