प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
इजिप्त - सॅमेटिकसच्या कालापासूनच (मृत्यु ख्रि. पू. ६१०) फेरोच्या पदरीं ग्रीक शिपाई असत. तसेंच ग्रीक व्यापारीहि नाइल नदीपर्यंत आलेले होते. नाइल नदीच्या बॉलबिटायनिक मुखाजवळ नॉक्रॅटिस नांवाचें ग्रीक शहर वसलेलें होतें. परंतु ग्रीक लोकांचा स्पर्श झालेलें मांस देखील न खाण्याइतका जातिमत्सर इजिप्शियन लोकांत वसत असल्यामुळें ग्रीक संस्कृतीची त्या लोकांवर बसावी तितकी छाप बसली नाहीं. पण अलेक्झांडरच्या नंतर हें राष्ट्रच ग्रीकांचें अंकित झालें व पुढें रोमन राष्ट्रानें ग्रीकांचें उच्चाटन करून त्यावर आपलें स्वामित्व स्थापन केलें.