प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
ईजिप्तः टॉलिमेइक राज्य - इतर मॅसिडोनियन घराण्यांप्रमाणें टॉलेमीच्या घराण्यांनां कांहीं विशिष्ट कारणांस्तव ग्रीक नगरांची स्थापना करतां आली नाहीं. नॉक्राटिस हें ग्रीक शहर ते येण्याच्या पूर्वीपासूनच अस्तित्वांत होते. अलेक्झांडरनें अलेक्झांड्रिया शहर वसविलेलें होतें. पहिल्या टॉलेमीनें त्यांत 'वरच्या इजिप्त' साठीं ग्रीक संस्कृतीचे केंद्र म्हणून टॉलिमेइस ह्या शहराची भर घातली. याशिवाय दुस-या कोणत्याहि समाजांनां त्यांनीं ग्रीक शहराचें स्वातंत्र्य उपभोगूं दिलें नाहीं असें दिसतें. फायुममध्यें अगर इतर ठिकाणीं वसलेल्या ग्रीक आणि मॅसिडोनियन शिपाई लोकांच्या वसाहतींत स्वातंत्र्य असल्याचें दिसून येत नाहीं. खुद्द अलेक्झांड्रियामध्यें सुद्धां ग्रीक संस्कृतीच्या पूर्ण विकासास वाव दिला गेला नव्हता. टॉलिमेइसला शासनस्वातंत्र्याचे बहुतेक सर्व मामूल हक्क होते तें खरें. पण अलेक्झांड्रियांत अधिका-यांचा अरेरावी कारभारच चालत होता. अलेक्झांड्रियाची लोकवस्ती देखील अर्धवटच ग्रीक होती. कारण त्यांतील खालचा वर्ग इजिप्तमधील लोकांचा होता; तसेंच तें व्यापारी ठिकाण असल्याकारणानें त्यांत अनेक जातींच्या लोकांचा भरणा झाला होता. उदाहरणार्थ, शहराच्या पांच भागांपैकीं दोन भागांमध्यें यहुदी लोकांचीच अधिक वस्ती होती. परंतु यहुदी लोकांची मातृभाषा अरमइकच्या ऐवजीं ग्रीक झाली होती; व अलेक्झांड्रियाच्या उच्च समाजांतील लोक या टॉलेमींच्या कारकीर्दीत संस्कृतीनें ग्रीक होते एवढेंच नव्हे, तर वाङ्मयाच्या व कलाकौशल्याच्या बाबतींत त्यांनीं ग्रीक लोकांत ख्याति मिळविली होती; यावरून त्या वेळीं तेथील जनतेवर एकंदरींत ग्रीक संस्कृतीचाच पगडा होता हें व्यक्त होतें. तेथील सरकारी विद्यापीठ व अजबखाना यांमुळें, अथेन्सला ज्याप्रमाणें नैतिक शास्त्रांत त्याप्रमाणें अलेक्झांड्रियाला सृष्टिशास्त्रांत व वाङ्मयशाखांत फार महत्त्व प्राप्त झालें होतें. अलेक्झांड्रियांत भाषाशास्त्रांचा, विशेषेंकरून ग्रीक व्याकरणाचा झालेला विकास ५ व्या विभागांत वण्रिलाच आहे (विज्ञानेतिहास, पृ. २१४ पहा)
इजिप्तमध्यें ज्याप्रमाणें ग्रीक संस्कृतीच्या प्रसाराला अडथळा आला त्याप्रमाणें जुडीआशिवाय दुस-या कोठेंहि आला नाहीं. ''यांच्या मनांत परधर्मीय जेत्यांविषयीं विलक्षण द्वेष असतो'' असें जें पौरस्त्यांचें सर्वसाधारण वर्णन करण्यात येतें त्याची थोडीफार सत्यता या ठिकाणीं दिसून येते. मेफिस येथील सिरेपिसच्या देवळांत एका मॅसिडोनियन भक्तावर तो ग्रीक आहे एवढ्या सबबीवरच हल्ला करण्यांत आला होता हे ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. तरीपण कांहीं पापायरसावर लिहिलेल्या हस्तलिखितांवरून असें आढळून येते कीं, ग्रीक लोकांमध्यें व तद्देशीय रहिवाश्यांमध्यें लग्नें होत असत व कांहीं तद्देशीय लोकांचीं नांवेंहि ग्रीक होतीं. इजिप्शियन धर्मातील कांहीं अंगांची वाढ ग्रीक धर्माच्या वर्चस्वामुळें झाली असें कांहींचें मत आहे. ग्रीकसंस्कृति व देश्य संस्कृति यांचें मीलन व्हावें एतदर्थ सिरेपिसच्या पूजेला सरकारकडून उत्तेजन देण्यांत आलें. इजिप्तमध्यें ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार होऊं लागला तेव्हां ख्रिस्ती वाङ्मय देश्य भाषांत वाढूं लागून त्यायोगे एका अर्थी ग्रीकसंस्कृतीवर देश्य संस्कृतीनें वर्चस्व मिळविलें असलें तरी सिरिअक वाङ्मयाप्रमाणें या कॉप्टिक (इजिप्शिअन) वाङ्मयांतहि ग्रीकसंस्कृतीचीं तत्त्वें ख्रिस्ती दैवतशास्त्रामधून आलेली होतीं हें विसरतां कामा नये.