प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
ओहिंदपाशीं आगमन - नंतर अलेक्झांडरनें असाकेनाईंनां पूर्णपणें जिंकण्यासाठीं आसपासच्या टापूवर पुन्हां हल्ला करून डायर्टा नांवाचें शहर काबीज केलें. येथील लोक व आसपासच्या मुलुखांतील लोक हे हायडॅस्पीझ (झेलम) आणि अकेसिनीझ (चंद्रभागा चिनाब) या नद्यांमधील अभिसार देशांत आश्रयासाठीं गेले होते. यानंतर अलेक्झांडर आस्ते आस्ते दाट अरण्यांतून मार्ग काढीत ओहिंदच्या पुलाजवळ आला. अशा रीतीनें हेफाइस्तिऑनच्या लष्कराजवळ जाण्याला त्याला पंधरासोळा मुक्काम करावे लागले. येथें त्यानें आपल्या सैन्यास एक महिना विश्रांति देऊन मजेखातर मोठमोठे खेळ करविले. या ठिकाणींच अलेक्झांडरकडे तक्षशिलेचा नवीन गादीवर आलेला राजा आंभी याजकडून वकील आले व वडिलांप्रमाणेंच आपणहि मांडलिक व्हावयास तयार आहों असा त्याचा त्यांच्यातर्फे निरोप आला. त्यांनीं अलेक्झांडरला पुष्कळशी संपत्ति, ७०० घोडे, ३० हत्ती, ३००० लठ्ठ बैल व १०,००० हून अधिक शेळ्या नजर म्हणून दिल्या व अलेक्झांडरनेंहि त्यांचा साभार स्वीकार केला. तक्षशिलेच्या राजानें असें करण्याचें कारण आसपासच्या संस्थानांविरुद्ध आपणास मदत मिळावी अशी त्याची इच्छा होती असें पुष्कळांचें मत आहे. या वेळीं तक्षशिलेच्या राजाची अभिसार नामक पहाडी मुलुखाच्या राजाशीं व पोरस राजाशीं लढाई चालली होती.
या वेळीं वसंतकाळ होता, व ताजेंतवानें झालेलें अलेक्झांडरचें सैन्य तक्षशिलेच्या राजाच्या साहाय्यानें पोरसकडे वळलें (ख्रि. पू. ३२६, फेब्रूवारी किंवा मार्च). तक्षशिला हें त्या वेळीं पूर्वेकडील एक मोठें विद्यापीठ होतें व त्या वेळेस निरनिराळ्या भागांतून मोठमोठे विद्वान् तेथें येत असत. येथें असतांना प्रथमतः ज्याचा पोरसला मिळून अलेक्झांडरवर चालून येण्याचा विचार होता त्या अभिसारच्या राजानें अलेक्झांडरपाशीं सख्याची याचना केली. पोरस देखील असाच आपल्याला येऊन मिळेल असें वाटून अलेक्झांडरनें त्याला खलिता पाठविला. परंतु, लढाईची तयारी करून मी आपणास भेटण्यास येत आहे असें त्यास पोरसकडून उलट उत्तर मिळालें.