प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

इराण आणि बाबिलोनिया- अलेक्झांडरला व त्याच्या नंतरच्या राजांनां आपली नगरस्थापनेची कल्पना तडीस नेण्याला इराण हें चांगलेंच क्षेत्र मिळालें. त्यापूर्वीं इराणामध्यें तटबंदीचीं शहरें क्वचितच होतीं. पण अलेक्झांडरनें व त्याच्या नंतरच्या राजांनीं व्यापाराच्या दृष्टीनें फायदेशीर व तटबंदीचीं अशीं पुष्कळ शहरें वसविलीं. पोलिबिअस म्हणतो कीं, मीडियाचा रानटी लोकांच्या स्वा-यांपासून बचाव या ग्रीक शहरांमुळें झाला. हेराक्लिआ आणि युरोपस हीं शहरें तेहरानच्या जवळ होतीं. पूर्व इराणमध्यें हल्लीं जीं महत्त्वाचीं शहरें आहेत त्या सर्वांनां पूर्वीं ग्रीक नांवें असून त्यांपैकीं प्रत्येकाचा मूळ वसविणारा अलेक्झांडर अगर कोणी ग्रीक राजा होता असें मानण्यांत येतें. खोजेंद, हिरात, व कंदाहार या सर्वांनां पूर्वीं अलेक्झांड्रिया हेंच नांव होतें. मर्व्हला पूर्वीं अलेक्झांड्रिया व नंतर अँटिऑक असें नांव होतें. सायरिंकासारख्या रानटी लोकांच्या शहरांत सुद्धां ख्रि. पू. २०९ मध्यें पुष्कळ ग्रीक व्यापारी होते. ग्रीक ऐतिहासिक वाङ्‌मयाचा नाश झाल्यामुळें आणि इराणमध्यें सांपडलेला असा पुराणवस्तुसंशोधनविषयक पुरावाहि नसल्यामुळें या शहरांतील ग्रीक लोकांच्या आयुष्यक्रमाविषयीं केवळ अनुमान करींत बसण्याशिवाय गत्यंतर नाहीं. नुकताच सांपडलेला असा महत्त्वाचा पुरावा म्हणजे पर्सिसमधील अँटिऑकचा हुकूमनामा होय (ख्रि. पू. २०६). त्यावरून बौली, एक्लोशिआ, प्रैटॅनीस वगैरे शासनसंस्था तेथें चांगल्या प्रचारांत होत्या, व अधिका-यांच्या वार्षिक निवडणुकी वगैरे सर्व प्रकार तेथें अस्तित्वांत होते असें आढळतें. पण ग्रीक संस्कृतीच्या विस्तारांत विस्ताराच्या क्षेत्रापेक्षां महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ग्रीक संस्कृतीच्या लोकांचा एवढा मोठा विस्तार होता तरी त्यांच्या संस्कृतीमधील ऐक्यांत मुळींच फरक पडला नाहीं ही होय. पहिल्या अँटायोकसच्या बोलावण्यावरून मॅग्नीझिआ-ऑन-मिअँडरहून जे वसाहतवाले आले होते ते एकग्रीकत्वाचे मोठे भोक्ते होते; आणि यामुळें निरनिराळ्या ग्रीक नगरांचें परस्परांशीं राजकीय बाबतींत व अन्य बाबतींतहि दळणवळण चालू होतें. विशेषतः स्थानिक धार्मिक महोत्सवांमुळें त्यांच्यामध्यें ऐक्य राहण्यास बरीच मदत झाली होती. पर्सिसमधील अँटिऑकमधून ग्रीसमधील मोठ्या शर्यतींनीं खेळाडू पूर्वींपासूनच पाठविले जात असत. पण मॅग्नीझिआमध्यें अर्टिमिसप्रीत्यर्थ नवीन सुरू झालेल्या शर्यतींनांहि खेळाडू पाठविण्याचा ठराव या हुकूमनाम्याच्या द्वारां झाला आहे. यांत दाखविलेल्या सिल्यूकिडी राजांविषयींच्या स्वामिनिष्ठेवरून देखील ही एकग्रीकत्वाची कल्पना व्यक्त होते. अशाच प्रकारचे हुकूम नामे जेथें निघाले होते अशा बाबिलोनियामधील इतर ग्रीक शहरांची यादीहि यांत दिली आहे.