प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
इथिओपिआ - ग्रीक संस्कृति ही आरंभकालींच टॉलेमींच्या राज्यांतून नाइल नदीच्या वरच्या बाजूस इथिओपिआमध्यें गेली. दुस-या टॉलेमीच्या वेळच्या इथिओपियनांचा राजा एर्गामिनीझ यास ग्रीक शिक्षण मिळाले होतें, व त्यानें ग्रीक तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. त्यानें स्वधर्मी भिक्षुकांचें वर्चस्व झुगारून दिलें व त्या वेळेपासून इथिऑपिआंत ग्रीक संस्कृतीच्या प्रसारात सुरुवात झाली. पुढें चवथ्या शतकामध्यें इथिओपिआंत ख्रिस्ती धर्म शिरला तेव्हां तर इथिओपिआचा ग्रीक संस्कृतीच्या देशांशीं अधिकच निकटचा संबंध जडला.