प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

ग्रीक कला - कांहीं विद्वानांच्या मतें ग्रीक संस्कृतीचा हिंदुस्थानावर फार परिणाम झाला. पण फिलॉस्ट्राटसनें लिहिलेल्या ॲपॉलोनिअसच्या चरित्रामध्यें जें ब्राह्मणांचें वर्णन आलें आहे, त्यावरून ग्रीक संस्कृतीचा या ब्राह्मणांवर फारसा परिणाम झाल्याचें दिसून येत नाहीं. कांहीं लोक असें प्रतिपादन करतात कीं, ग्रीक अगर शक लोकांच्या नाण्यांच्या कल्पनेशिवाय हिंदुस्थानानें परकीयांच्या कोणत्याहि अंशाचा अंगीकार केला नाहीं. केवळ नाण्यांवरूनच ग्रीक भाषेचें त्या वेळेस किती महत्त्व होतें हें नक्की ठरविणें कठिण आहे; तथापि ग्रीक दरबाराबाहेर ग्रीक भाषा फारशी प्रचलित नव्हती तरी, ग्रीक सत्तेचा नायनाट झाल्यानंतर दोन शतकेंपर्यंत हिंदुस्थानांतील नाण्यांवर ग्रीक अक्षरें दृष्टीस पडतात. त्या अर्थी, त्या भाषेला महत्त्व आलें होतें यांत शंका नाहीं.

ग्रीक लोक त्या वेळीं हिंदुस्थानांत आपला दृढ पाया रोवण्याच्या खटपटींत गुंतले असल्यामुळें ग्रीक विचारांचा, वाङ्‌मयाचा व कलांचा प्रसार करण्यास त्यांनां अवसरच मिळाला नाहीं; व मिनँडरच्या वेळच्या एका हिंदू ग्रंथांत तर ग्रीक लोकांनां दुष्ट यवन म्हटलेलें आढळतें. अशा परप्रांतांत ग्रीक लोकांनां आपली छाप कशी बसवितां येणार, अगर आपलें वैशिष्ट्य कायम कसें राखतां येणार ? क्सर्क्सीझनें वसविलेल्या ग्रीक ब्रँकिडी लोकांचें वंशज सहा पिढ्यांच्या आंत दोन भाषा बोलूं लागले, याच्या आधारावर टॉर्ननें मोठमोठीं अनुमानें काढलेली आहेत. पण अलेक्झांडरच्या पूर्वीच्या ग्रीक लोकांबद्दल अशी ख्याति नव्हती, म्हणून या अनुमानांवर थोडा फार जपूनच विश्वास ठेवावा लागतो. हिंदुस्थानांतील ग्रीक लोकांनीं जर खरोखर कांहीं तरी राजकीय चळवळ केली असती तर कलाकौशल्याच्या बाबतींत अगर शिलालेखांत त्याचा कांहीं तरी दाखला पहावयास मिळाला असता. कदाचित् हल्लींचे ग्रीक लोक जसे व्यापारामुळें निरनिराळ्या प्रदेशांत पांगले जाऊन त्या त्या देशाच्या परिस्थितीप्रमाणें फरक पावतात, तशीच जुन्या ग्रीक लोकांचीहि स्थिति असेल. हिंदुस्थानानें ग्रीक लोकांपासून काय घेतलें याविषयीं पुष्कळ मतभेद आहे. हिंदूंनीं ग्रीक नाटकांपासून आपली नाटकाची कल्पना घेतली असें पुष्कळ म्हणतात; पण तें नीट सिद्ध झालेलें नाहीं. ग्रीक लोकांपासून हिंदुस्थानानें ज्योतिःशास्त्र घेतलें हें त्यांनीं स्वीकारलेल्या ग्रीक नांवांवरून दिसून येतें. पण सर्वांत अधिक हिंदूंनीं ग्रीकांपासून कलाकौशल्य घेतलें. या दोहोंविषयीं आणि वाङ्‌मयविषयक चौर्याविषयीं भिन्न मतें पहिल्या विभागांत दिली आहेत. आशियांत पूर्वेकडे जी बुद्धकला गेली तिचा उगम वायव्य हिंदुस्थानांत झालेला होता. त्या ठिकाणीं संशोधनाअंतीं ज्या शिल्पकलेचे व कोरीव कामाचे अगर मंदिरांचे अवशेष सांपडले, त्यांवरून ही कला बौद्धांनीं मूळ ग्रीक लोकांपासून घेतली असें उघड दिसतें. पूर्वेकडे ही कला किती दूरवर गेली हें आथीनाच्या व इरॉसच्या मुद्रांसारख्या मुद्रा खोतानच्या गडप झालेल्या शहरांतून डॉ. स्टीननें उकरून काढल्या आहेत यावरून दिसून येईल. तसेंच जपानांतील अत्यंत जुन्या देवळांमध्यें जीं चित्रें आहेत त्यांत ग्रीक व बौद्ध त-हांचें मिश्रण दिसून येतें असें जें हॅवेलनें प्रतिपादन केलें आहे त्यावरूनहि वरील म्हणण्याला बळकटी येते.