प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

ग्रीक राज्यें - ख्रि. पू. तिस-या शतकाच्या मध्यकालांत सिल्युकिडी साम्राज्यांतून बॅक्ट्रिया व सॉग्डिएना हीं राज्यें फुटलीं. पुढें एक शतकानंतर मध्यआशियामधील शक व युएचि हे भटके लोक जिंकून घेईपर्यंत या प्रदेशांवर स्वतंत्र ग्रीक राज्ये राज्य करीत होते. अलेक्झांडरनें या प्रदेशामध्यें ब-याच ग्रीक लोकांची वसाहत करविली होती. त्यांनीं ख्रि. पू. ३२५, आणि पुन्हां ३२३ सालीं स्वदेशीं जाण्याचा प्रयत्न केला, पण तो हाणून पाडण्यांत आला. यामुळें मॅसिडोनियन लोकांविषयीं त्यांच्यामध्यें जातिमत्सर उत्पन्न होऊन त्यांनीं ख्रि. पू. २५० मध्यें मॅसिडोनियाविरुद्ध बंड केलें. या ग्रीक राजघराण्यांचा इतिहास मुळींच उपलब्ध नाहीं; आणि बॅक्ट्रियामध्यें मॅसिडोनियन व ग्रीक सत्तेच्या अजमासें १८० वर्षाच्या अवधींत ग्रीकसंस्कृति किती पसरली याचें अनुमान केवळ अपु-या प्रमाणांवरूनच करावें लागतें. टार्टनें एतद्विषयक उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा विचार केला आहे, पण त्यासहि जोराची ग्रीक संस्कृति येथें प्रचलित होती असें दाखविणारा बळकट पुरावा मिळत नाहीं, अशा नास्तिपक्षी सिद्धान्ताशिवाय जास्त कांहीं सांगतां येत नाहीं. त्याच्या मते ग्रीक राज्यें मुख्यतः स्थानिक इराणी पद्धतीवर चालत असावींत. पण उलट पक्षीं ग्रीक नाण्यांचा पुरावा पुढें मांडला जातो; व कलेच्या एका शाखेंतील उत्कर्षावरून दुस-या शाखांचाहि उत्कर्ष आपणांस अनुमानतां येतो असें कांहींचे म्हणणें आहे. तथापि एकंदरीत या सरहद्दीवरील प्रांतांमध्यें इराणी वर्चस्वच प्रामुख्यानें दिसून येतें.

दुस-या शतकांत पश्चिम इराण हें सिल्यूकिडी साम्राज्यांतून निघून पार्थियन राज्यामध्यें अंतर्भूत झाले; किंवा तद्देशियांचीं लहान लहान संस्थानें बनलीं. ख्रि. पू. १३० सालीं पर्थियन लोकांनीं बाबिलोनिया व ख्रि. पू. ८८ सालीं मेसापोटेमिया जिंकला. पण यापुढें रोमन लोकांच्या आगमनामुळें पौरस्त्य राजांच्या या मुलूख पादाक्रांत करण्याच्या क्रियेस आळा बसला. ७ व्या शतकांत मुसुलमान जिंकून घेईपर्यंत आशियामायनर व सिरिया हे रोमन साम्राज्याचे घटक म्हणून राहिले. पण यानंतर मुसुलमानी सत्तेनें या ग्रीक राज्यांनां नवें स्वरूप दिलें. पार्थियन राज्याच्या पूर्वी २०० वर्षें तरी सूशिएना, मेसापोटेमिया व बाबिलोनिया येथें नगरराज्यांच्या रूपांत ग्रीक संस्कृति प्रस्थापित झालेली होती. या सर्वांत मोठें असें सिल्यूशिआचें राज्य तैग्रिस नदीवर जवळ जवळ अर्वाचीन बगदादच्याच जागेवर होतें. बाबिलोनियांतील व्यापाराचें केंद्र या नात्यानें प्रत्यक्ष बाबिलोनला देखील या राज्यानें मागें टाकलें होतें. प्लिनीच्या मतें या राज्यांतील लोकवस्ती ६,००,००० होती. याशिवायहि अनेक ग्रीक शहरें वसलेलीं होतीं, पण त्यांची यादी येथें देणें अशक्य आहे. पूर्वीच्या खेडवळ रहाणींत या नव्या लोकांच्या वस्तीमुळें मेसापोटेमियांत केवढा फरक घडून आला याबद्दल प्लिनीनें फार महत्त्वाचें व मार्मिक विवेचन केलेलें आहे.