प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
ग्रीसचा इतिहास - मागें ग्रीसचा इराणच्या इतिहासाशीं संबंध दिलाच आहे. इराणी साम्राज्याला पूर्वपश्चिमसंयोगाचें श्रेय चार हजार वर्षे असेल, तर मध्येंच शें दीडशें वर्षे ते ग्रीकांसहि होतें. आणि व्यापक घडामोडीच्या इतिहासाच्या दृष्टीनें ग्रीक संस्कृति, तिशीं संबद्ध ग्रीसचा इतिहास, आणि त्या संस्कृतीचा जगभर व्याप हा स्पष्ट केला पाहिजे. ग्रीक संस्कृति ग्रीसमध्यें जन्मास आली नाही, पण तेथें ती सुदृढ आणि पसरण्यास योग्य अशी झाली. त्यामुळें ग्रीस देशांतील हालचाली, संस्था, वाङ्मय व कला यांस इतिहासांत महत्त्व आहे.
प्रस्तुत प्रसंगीं प्राचीन ग्रीसच्या इतिहासांतील सर्व मुख्य गोष्टींची विस्तृत हकीकत देतां येत नाहीं. ग्रीसचा इतिहास म्हणजे एका राज्याचा किंवा एका देशाचा इतिहास नसून त्यांत आरिस्टॉटलला आपल्या 'ग्रीक संस्थानांतील राज्यपद्धति' या ग्रंथांत १५० हून अधिक संस्थानांचा समावेश करावा लागला. आणि ग्रीक लोकांची जात तर पिरिनीझपासून उत्तर कॉकेशसपर्यंत व दक्षिण रशियापासून आफ्रिकेपर्यंत सर्व प्रदेशांत पसरलेली होती. म्हणून सध्यां त्या इतिहासांतील गोष्टीचें कार्यकारणभावात्मक विवेचन करून ग्रीसमधील मुख्य मुख्य प्रश्न व त्यांवरील मतें द्यावयाचा व एकंदर सांस्कृतिक वाढीमध्यें हेलेनिक भागाचें महत्त्व किती हें दाखविण्याचा विचार आहे.