प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

डोंगरांतील रानटी जातींचा बंदोबस्त - सैन्याच्या दुसर्‍या भागाचें आधिपत्य स्वतः अलेक्झांडर यानेंच पतकरलें होतें. यामध्यें थ्रेसचीं पायदळें, तिरंदाज, भालाईत वगैरे लढवय्यीं पलटणें होतीं. अशा सैन्यासह काबूल नदीच्या कांठच्या दुर्गम दर्‍याखोर्‍यांत रहाणार्‍या निरनिराळ्या भयंकर जातींनां जिंकून आली मागील बाजू सुरक्षित करण्याचा त्यानें प्रयत्‍न केला. या डोंगराळ प्रदेशांत लष्करी हालचाली करणें फार अवघड होतें. कडाक्याची थंडी, भाजून काढणारें ऊन व तेथील लोकांचें विलक्षण शौर्य यामुळें तर या मोहिमीचें काम अधिकच कठिण झालें होतें. तथापि अलेक्झांडर हा असामान्य पुरुष असल्या कारणानें असल्या अडचणींनीं त्यानें दाद दिली नाहीं. त्यानें आपल्या हालचाली कशा रीतीनें केल्या, कोणकोणत्या जातींनां जिंकलें, कोणकोणते किल्ले काबीज केले याबद्दलची जरी नक्की माहिती देतां येत नाहीं, तरी चारपांच महिन्यांत कूनर किंवा चित्रळ नदीच्या खोर्‍यांत तो बराच वर गेला असला पाहिजे यांत शंका नाहीं. तेथील डोंगरांतील एका शहरीं त्याच्या खांद्यास एक बाण लागून तो जखमी झाला, व त्यामुळें त्याच्या शिपायांनीं चिडून जाऊन त्या ठिकाणीं कैद केलेल्या सर्व बंदिवान लोकांची सररहा कत्तल करून तें शहर जमीनदोस्त केलें.

या अपघातानंतर लवकरच अलेक्झांडरनें आपल्या सैन्याच्या पुन्हां दोन तुकड्या केल्या. त्यांपैकीं एका तुकडीचें आधिपत्य आपला अतिशय विश्वासू सेनापति क्राटेरॉस यास देऊन त्याच्याकडे त्यानें कूनर नदीच्या खोर्‍यांमधील रानटी जातींचा पुरा बंदोबस्त करण्याचें काम सोंपविलें, व स्वतः अस्पसिअनांवर चाल करून जाऊन त्यांची भयंकर कत्तल करून त्यांचा पराभव केला. नंतर पर्वत ओलांडून तो ज्याला आतां बाजौर म्हणतात त्या खोर्‍यांत आला. तेथें त्याला अगीयॉन नांवाचें रहिवाशी जाळून सोडून गेलेलें निर्जन असें एक शहर आढळून आलें. येथेंच क्राटेरॉसहि आपली कामगिरी बजावून त्याला येऊन मिळाला; व त्यांनीं दोघांनीं मिळून पुढील हिंदुस्थानावर स्वारी करण्याचें काम सुकर व निर्धोक व्हावें याकरितां पूर्वेकडील जातींचें निर्दलन करण्यास सुरुवात केली. अस्पासिअन हे मोठें तुंबळ युद्ध होऊन दुसर्‍या खेपेस पुन्हां पराभूत झाले, व त्यांचे ४०,००० लोक कैद होऊन २,३०,००० बैल लुटले गेले. यांपैकीं जे उत्तमोत्तम बैल व गाई होत्या त्यांनां शेतकीकरितां मॅसिडोनियाकडे रवाना करण्यांत आलें. यानंतर नायसा नांवाच्या शहरावर हल्ला करण्यांत आला. डायोनायसस आणि पौराणिक कथांतील पवित्र शिखर नायसा यांचा या नायसाशीं काल्पनिक संबंध जोडण्यांत आला होता. या शहराजवळची नदी अतिशय खोल असल्यामुळें अलेक्झांडरचा हल्ला फसला; म्हणून अलेक्झांडर त्यास वेढा घालून त्याचा सर्व बाजूंनीं कोंडमारा करण्याच्या विचारांत होता. परंतु तेथील लोक आपण होऊनच त्यास शरण आले. असें म्हणतात कीं, या लोकांनीं आपला डायोनायससशीं व ग्रीकांशीं संबंध लावून अलेक्झांडरपाशीं क्षमेची याचना केली. अलेक्झांडरला आपल्या परदेशांत राहून कंटाळलेल्या सैनिकांची आपण आपल्या लोकांतच आहों असें भासवून समजूत करावयाची असल्यामुळें त्यानेंहि त्यांच्या विधानाच्या सत्यासत्यतेचा विचार न करतां त्यांच्यावर दया केली.

येथें सैनिकांनां थोडी विश्रांति मिळावी म्हणून व आपल्या जिज्ञासातृप्‍तीसाठी निवडक शिपायांनिशीं अलेक्झांडर ज्याला हल्लीं कोहिमोर म्हणतात त्या पर्वतांत हिंडावयास गेला. तेथील लोकांची गाणीं व नाच यांच्यामध्यें व हेलास येथील गाणीं व नाच यांमध्यें त्याला बरेंच साम्य आढळून आलें; त्याच्या शिपायांनांहि सजातीय लोक भेटल्यामुळें आनंदच झाला. या लोकांच्या सहवासांत अलेक्झांडरनें व त्याच्या सैनिकांनीं दहा दिवस मोठ्या चैनींत घालवून विश्रांति घेतली. नायसाच्या लोकांनीं अलेक्झांडरनें त्यांच्यावर दया केली म्हणून तीनशें घोडेस्वारांचें एक पथक त्याच्या कुमकेस दिलें. हें पथक अलेक्झांडरपाशीं सर्व स्वारीभर होतें व शेवटीं ख्रि. पू. आक्टोबर ३२६ मध्यें तें आपल्या गांवीं परत गेलें.