प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

ग्लौसाइ व दुसरा पोरस - अलेक्झांडरनें आपल्या नेहमीच्या वहिवाटीप्रमाणें लढाईंत मेलेल्यांचे अंत्यविधी केले व बळी वगैरे देऊन मोठमोठे खेळ करविले. यानंतर त्यानें आपला विश्वासू सरदार क्राटेरॉस याला कांहीं सैन्यानिशीं मागें ठेवून ठाणीं घालून मागील दळणवळण कायम राखण्याचा हूकूम केला, व स्वतः निवडक सैन्यानिशीं पोरसच्या राज्याला लागून असलेल्या ग्लौसाइ अथवा ग्लोकानिकॉइ नामक देशावर स्वारी केली. तेथील ३७ मोठीं महत्त्वाचीं गांवें व अनेक खेडीं कांहींहि अडथळा न करतां अलेक्झांडरला शरण आल्यामुळें तीं सर्व पोरसच्या मुलुखांत सामील करण्यांत आली, व त्यांचा कारभार पोरसकडे सोंपविण्यांत आला. शिवाय किंचित् सखल प्रदेशांतील ज्याला ग्रीकांनीं अबिसारेस म्हणून म्हटलें आहे तो राजाहि आपण होऊनच शरण आला, व गंडारिस प्रांतांत पोरसचा पुतण्या राज्य करीत होता त्यानेंहि (याचेंहि नांव पोरसच होतें) अलेक्झांडरजवळ वकिलामार्फत सख्याची याचना केली. हाच मार्ग पुढें दुसर्‍याहि कित्येक स्वतंत्र जातीच्या राजांनीं स्वीकारला.

यानंतर अलेक्झांडरनें चिनाब नदी ओलांडली. ती ओलांडण्यास त्याला फार प्रयास पडले. याचें कारण त्या नदीचा प्रवाह जोरानें वहात असून त्यांत बरेचसे खडक होते, व त्यामुळें नाव सुरक्षितपणें पैलतीरास नेणें फार धोक्याचें काम होतें. चिनाब ओलांडल्यावर अलेक्झांडर युद्धसामुग्री गोळा करीत पूर्वेकडे आला, व त्यानें हिड्राओटीझ म्हणजे रावी नदी निर्विघ्नपणें ओलोंडली. येथून त्यानें पोरसच्या पुतण्याचा बंदोबस्त करण्यासाठीं हेफाइस्तिऑन यास मागें पाठवलें. या पोरसच्या पुतण्यानें त्याच्या काकालाच अलेक्झांडरनें पुष्कळ प्रांत बक्षीस दिल्यामुळें चिडून जाऊन बंड उभारलें होते.