प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

नवीन ग्रीक शहरांचें स्वरूप - या नवीन वसविलेल्या शहरांची नागरिक सभा आरंभीं केवळ ग्रीक अगर मॅसिडोनियन लोकांचीच असे. हे नागरिक म्हणजे बहुधा राजाच्या सैन्यांत काम केलेले शिपाई अगर व्यापाराच्या आशेनें जुन्या शहरांतून इकडे आलेले व्यापारी असत. या नवीन भूमीवर आपली लष्करी सत्ता कायम ठेवणें हे मॅसिडोनियन राजांनां जरूर वाटत असे. कारण हीं नगरराज्यें ग्रीकेतर लोकांमध्यें वसलीं असल्याकारणारनें त्यांवर केव्हां काय संकट येईली याचा नेम नव्हता. यासाठीं प्रत्येक राज्यांत चांगले कसलेले शिपाई ठेवलेले असत. या राज्यांत तद्देशीय रहिवाशी देखील पुष्कळ रहाण्यास येत. पूर्वेकडील प्रांतामध्यें जीं नवी नगरराज्यें वसविलीं होतीं त्यांत अलेक्झांडरनें मुद्दाम तद्देशीय लोकांची बरीच वसाहत करविली होती. साधारणपणें अगदीं खालचा समाज तद्देशीय रहिवाशांचाच असे असें म्हटलें तरी चालेल. पण या खालच्या समाजाला नागरिक सभेंत भाग घेतां येत नसे; व बहुतेक यूरोपीयेतर लोकांनां देखील तो क्वचितच घेतां येत असे असें दिसतें. यहुदी लोकांनां नागरिक सभेमध्यें बसण्याचा हक्क असे, असें जें जोसेफसनें म्हटलें आहे तें खोटें आहें असें कित्येकांचें मत आहे. या नागरिक सभेचें कामकाज ग्रीक नगरांतील धर्तीवरच चालत असे. शहरांतील राजकीय व सामाजिक संस्था सर्व ग्रीक नगरांतल्याप्रमाणेंच होत्या. ग्रीक नगरांतल्याप्रमाणें येथेंहि आखाडे वगैरे असत, व तेथल्याप्रमाणेंच येथेंहि मोठमोठे महोत्सव व त्या महोत्सवांमध्यें खेळ, नाटकें इत्यादि होत असत. गाण्याबजावण्याप्रमाणें फिरत्या विद्वानांच्या प्रवचनांसहि श्रोतृसमुदायाची वाण पडत नसे. वरच्या समाजाची भाषा ग्रीक होती. इमारती, पोषाख, वगैरे सर्व ग्रीक पद्धतीचेच असत. या नव्या शहरांतील रस्ते व जुन्या ग्रीक शहरांतील रस्त्यांपेक्षां देखील शोभिवंत व प्रमाणशीर आंखलेले असे असत.

कधीं कधीं जुनीं पूर्वेकडील शहरेंच चांगलीं सुधारून नवीं बनवली जात व त्यांनां ग्रीक नांव देण्यांत येत असे. उदाहरणार्थ, फ्रिजिआमधील सिलीनीआ ॲपामिया, सिरियांतील हॅलेब (अलेप्पो) ला बिरीआ, मेसापोटेमियांतील निसिबिसला ॲटिऑक व मीडियामधील रॅगी (राइ) ला युरोपस अशीं नांवें देण्यांत आलीं होतीं. क्वचित् प्रसंगीं जुनें नांवहि कायम ठेवलेलें आढळतें. थायाटायरा, दमास्कस, सामरिआ हीं अशा प्रकारचीं उदाहरणें आहेत. नवीं शहरे वसलीं नाहींत अशा फिनीशिया व सिरिया देशांत सुद्धा ग्रीक संस्कृतीची छाप बसल्याशिवाय राहिली नाहीं. टायर व सायडॉन येथें अलेक्झांड्रिया व ॲटिऑक येथल्याप्रमाणेंच ग्रीकवाङ्‌मय व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास होत असे. या ग्रीक संस्कृतीनें जुन्या शहरांवर देखील आपली छाप कशी वसवली हें यरुशलेमच्या उदाहरणावरून दिसून येईल. तेथील तरुण पिढी व या ग्रीक संस्कृतीच्या तत्त्वांनीं मोहित होऊन तेथें आखाडे व नाटकगृहें उदयास येऊन ग्रीक शासनपद्धति प्रचारांत आली.