प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
पेलोपॉनीशिअन युध्दें - याप्रमाणें सर्व ग्रीसदेशभर वर्चस्वाकरितां चुरस लागली असतां ''पहिलें पेलोपॉनीशिअन युद्ध'' अथेन्स विरुद्ध कॉरिंथ, इजायना व स्पार्टा यांच्यामध्यें झालें (ख्रि. पू. ४६०-४५४). या युद्धांत ग्रीक साम्राज्यसत्ता आपल्या हातांत घ्यावी असा अथेन्सचा हेतु होता; तर हें साम्राज्याचें खूळ नाहींसें करावें असा स्पार्टाचा उद्देश होता. अथेन्साची समुद्रावरील सत्ता व स्पार्टाची जमिनीवरील सत्ता, अथेन्सच्या बाजूचीं अल्पसत्ताक संस्थानें व स्पार्टाच्या बाजूची लोकसत्ताक संस्थानें, अथेन्सकडील आयोनियन संस्थानें तर स्पार्टाकडील डोरिअन संस्थानें अशांमधला हा बडा सामना होता.