प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.

परमार्थिक कल्पना व तत्त्वज्ञान - निरनिराळ्या ग्रीक जातींचें एकीकरण झाल्यामुळें, निरनिराळ्या देशांतील लोकांशीं ग्रीक लोकांचा संकर झाल्यामुळें व ग्रीकेतर सुधारलेल्या व रानटी जातींचा संपर्क घडल्यामुळें पूर्वीच्या पारमार्थिक समजुतींत साहजिकच फेरफार घडून आला, व नवीन प्रकारच्या आचारनियमांची जरूरी भासूं लागून स्टोइक तत्त्वज्ञान अस्तित्वांत आलें. त्यांतील नीतीच्या कल्पना व तत्त्वें सामान्य जन व इतर तत्त्वज्ञानी यांनां सारखींच पसंत पडूं लागलीं; व समाजांतील चालीरीतींवर कोरडे ओढणारें स्टोइक किंवा सिनिक तत्त्वज्ञानी जिकडे तिकडे दृष्टीस पडूं लागले.

या नव्या शहरांमध्यें प्राचीन देवतांच्या यज्ञांत व महोत्सवांत भाग घेणारे जरी बरेच लोक होते, तरी इतर धर्मांतील देवतांकडे त्यांचें नाविन्यामुळें लक्ष वेधलें, व ते त्या देवतांचेहि महोत्सव करूं लागले. सिरेपिस व आयसिस, ओसायरिस व अनुबिस यांचीहि गणना ग्रीक देवतांत होऊं लागली. ख्रि. पू. दुसर्‍या शतकाच्या अखेरीस सिंरेपिसचीं देवळें अथेन्स, ऱ्होडस, डीलॉस इत्यादि ठिकाणीं बांधण्यांत आली. रोमन साम्राज्याच्या काळीं आयसिस देवतेला विशेष महत्त्व आलें. ख्रि. पू. तिसर्‍या शतकामध्यें अशोकानें आपले भिक्षू संप्रदायप्रसाराकरितां देशोदेशीं पाठवले होते. त्यांनां जरी येथें आपल्या कार्यांत विशेष यश आलें नाहीं, तरी पौरस्त्य संप्रदायांचा ग्रीक लोकांवर बराच परिणाम झाला यांत शंका नाहीं.

ख्रिस्ताच्या वेळीं यहुदी लोकांनीं आपला संप्रदाय निरनिराळ्या दिशेनें पसरविण्यास सुरुवात केली. पुष्कळ लोकांनीं त्यांचा संप्रदाय स्वीकारला व पुष्कळ लोक एकेश्वरवादी बनले. याशिवाय, जंटाईल शहरांच्या देवळांनांहि पुष्कळसे भक्त मिळाले.