प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
अलेक्झांडरच्या पूर्वी ग्रीक संस्कृतीचा विस्तार - ख्रिस्तपूर्व ५ व्या शतकांत ग्रीक शहरांनीं स्पेनपासून इजिप्त व कॉकेशस पर्वतापर्यंत भूमध्य व काळ्या समुद्राचा किनार व्यापून टाकला होता; आणि ग्रीक वाङ्मयाचा प्रसार ग्रीकेतर राष्ट्रांवरहि होऊं लागला होता. ख्रिस्तपूर्व सातव्या शतकामध्येंच म्हणजे ज्या वेळीं ग्रीक संस्कृति बाल्यावस्थेंत होती त्या वेळींच ग्रीक लोक हे कणखर व शूर शिपाई आहेत अशी बाबिलोनिया व ईजिप्त या देशांची खात्री झाली होती; व इराणसारख्या साम्राज्यांत ग्रीक शिपायांची पगार देऊन सैन्यांत भरती करण्यांत येत असे. पुढें शिकंदरानें इराणच्या बादशहाचा पराभव केला तेव्हां देखील बादशहाचें ग्रीक सैन्यच अखेरपर्यंत टिकून राहिलें. पण जसजशी ग्रीक संस्कृति विकसित होत चालली तसतसें इतर राष्ट्रांचें लक्ष तिच्याकडे अधिकाधिक वेधूं लागलें. युफ्रेटीझ व नाइल या नद्यांच्या कांठच्या संस्कृतींनीं ग्रीक संस्कृतीची फारशी पर्वा केली नसेल. पण जेथें ग्रीक लोकांनीं आपल्या वसाहती केल्या होत्या त्या ठिकाणचे देश्य लोक ग्रीक संस्कृतीच्या वर्चस्वाखालीं आले. कांहीं कांहीं बाबतींत ग्रीक लोकांचा व रानटी लोकांचा निकट संबंध येत असे; व परस्परांच्या आचारांचेंहि मिश्रण होत असे. ॲनाकार्सिस व सायर्लेस यांच्या कथांवरून काळ्या समुद्रावरील ग्रीक वसाहतींशेजारील जातींच्या ज्या प्रमुख लोकांचा ग्रीकांशीं संबंध आला ते लोक ग्रीक संस्कृतीच्या अंतर्बाह्य तेजानें कसे दिपून गेले हें चांगलें दिसून येतें.
अलेक्झांडरच्या पूर्वीच्या दीड शतकांत जो ग्रीक संस्कृतीचा विकास झाला त्यामुळें ग्रीक लोक जगापुढें निराळ्या स्वरूपांत चमकले. त्यांचें लष्करी सामर्थ्य, क्सर्क्सीझचा पराजय व अथेन्सची अगर स्पार्टाची पूर्व भूमध्य समुद्रावरील सत्ता ह्यावरून अडाणी लोकांनीं देखील सहज दिसण्यासारखें होतें. सायरसच्या स्वारीनें रानटी शिपायांपेक्षां ग्रीक शिपायांचें श्रेष्ठत्व कळून आल्यामुळें पूर्वेकडील राजे ग्रीक शिपायांवरच अवलंबून रहात असत. स्वतः ग्रीक लोकांमध्येंच जी अंतर्गत प्रगति झाली होती ती देखील महत्त्वाची होती. ग्रीक लोकांमध्यें राजकीय दुफळी माजली होती तरी कलाकौशल्यांत, वाङ्मयांत व तत्त्वज्ञानांत अथेन्सनें फारच प्रगति केल्यामुळें त्या दुफळीचे दुष्परिणाम लोकांनां दिसले नाहींत. ग्रीक सुधारणा व ग्रीकांची बुद्धिमत्ता अथेन्समध्यें केन्द्रीभूत झाली होती असें म्हटलें तरी चालेल. तितकीच महत्त्वाची दुसरी गोष्ट ही कीं, सर्व ग्रीक वाङ्मयांमध्यें ॲटिक ही एकच भाषा वापरलेली होती; कारण ग्रीकसंस्कृतीचा सर्व जगभर फैलाव व्हावयास त्याला एका ठराविक भाषेची जरूरी होती. वाङ्मय, कला, शौर्य इत्यादि गोष्टींमुळें ग्रीकांचा प्रसार सर्वत्र झाला. ग्रीक संस्कृतीचा प्रसार इतर राष्ट्रांत कसा काय झाला हें दाखविणार्या टीपा दिल्या म्हणजे ग्रीकसंस्कृतीचें बल अधिक स्पष्ट होईल.