प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
अलेक्झांडर - तथापि या काळांतील अलेक्झांडरच्या कारकीर्दीनें इतिहासाला अगदीं निराळेंच वळण लावलें, व मानव जातीचा चरित्रक्रम बदलून टाकला. हेलेनी संस्कृति व उत्कृष्ट राजसत्ताकपद्धति या दोन गोष्टी अलेक्झांडरच्या कर्तुत्वामुळें पुढें आल्या. त्याच्या पूर्वी डायोनिशिअस, पिसिस्ट्रेटस यांच्यासारखे हुषार व बुद्धिमान् राज्यकर्ते होऊन गेले होते, पण ते कायदेशीर राजे नव्हते. त्यामुळें ''राजा म्हणजे ईश्वरी अवतार'' अशी कल्पना पाश्चात्य देशांत अलेक्झांडरमुळेंच प्रथम उत्पन्न झाली. तसेंच त्यानें एकाच प्रकारची भाषा, वाङ्मय व कला सर्वत्र सुरू करून एका जातीची हेलेनिक संस्कृति सर्व जगभर पसरविण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणेंच अलेक्झांडरनें अनेक देश जिंकून एक विश्वसाम्राज्य व विश्वसंस्कृति स्थापन केली. अलेक्झांडरच्या मृत्यूबरोबर त्याचें साम्राज्य लयास गेलें ही गोष्ट खरी; तथापि पौरस्त्य व पाश्चात्य या दोन्ही संस्कृतींवर ग्रीक संस्कृतीची छटा उमटली ती कायम राहिली, व त्यामुळेंच पुढें रोमन साम्राज्य व रोमन चर्च या दोन संस्था निरनिराळ्या झाल्या. असो.
अलेक्झांडरचा विजय सविस्तर वर्णन करण्याचें प्रयोजन नाहीं. ग्रीसमधील यादवीमध्यें अलेक्झांडरचा जय झाला. त्यानें कांहींस बरें वागविलें, कांहींस वाईट तर्हेनें वागविलें एवढेंच कायतें. अथेन्सला त्यानें म्युनिसिपालिटी चालविण्यापुरते हक्क जिवंत ठेवले. आशियांतील अलेक्झांडरचे पराक्रम इराणच सत्तावर्धन विवेचितांना वर्णिलेच आहेत. ग्रीकांचा हिंदुस्थानाशीं काय संबंध आला हें मात्र येथें दिलें पाहिजे.