प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
अलेक्झांडरचा जलप्रवास व मार्गांतील लोकांचा विरोध - अलेक्झांडरच्या आरमाराच्या संरक्षणार्थ दोन्ही तीरांवर मिळून वर सांगितलेल्या दोन सेनापतींच्या हातांखालीं १,२०,००० सैन्य चालावयाचें होतें, व सिंधूच्या पश्चिमेकडील मुलुखाचा क्षत्रप फिलिप्पॉस यास तीन दिवसानंतर पिछाडीनें येण्यास सांगितलेलें होतें. अशा रीतीनें या आरमारानें आपला प्रवास सुरू केला. एके दिवशीं सकाळीं नदीच्या देवतांनां वगैरे बळी अर्पण करून अलेक्झांडरनें आपलें आरमार हांकारण्याचा हुकूम सोडला (अक्टोबर ख्रि. पू. ३२६). तिसर्या दिवशीं हेफाइस्तिऑन व क्रॉटेरॉस यांनां जेथें तळ देण्यास सांगितलें होतें त्या ठिकाणी, म्हणजे बहुधा भीरपाशीं हे आरमार येऊन पोहोंचलें. येथें मागून फिलिप्पॉसचें सैन्य येईतोंपर्यंत मुक्काम करण्यांत आला, व दोन दिवसांनीं ते सैन्य आल्यावर फिलिप्पॉस यास मागें चालण्याच्या ऐवजीं पुढें जाण्याची आज्ञा झाली. नंतर आरमार पुन्हां निघालें व पांचव्या दिवशीं जेथें झेलम नदी चिनाबला मिळते तेथें येऊन पोहोंचलें. येथें नदीचें पात्र लहान असून त्यांत भयंकर भोंवरे झालेले होते. त्यामुळें आरमाराला फार त्रास झाला. येथें पुष्कळशा खलाशांनिशीं दोन लढाऊ गलबतें बुडालीं व अलेक्झांडर ज्या जहाजांत बसला होता तें जहाज देखील अगदीं संकटांत सांपडलें होतें. शेवटीं अतिशय खटपटीनें बहुतेक आरमार तीरावर सुखरूपपणें येऊन लागलें. येथें अलेक्झांडर आपल्या सैन्यानिशीं उतरला, व ज्यांनां कर्शिअसनें सिबोइ व अगलसोइ म्हणून म्हटलें आहे त्या आसमंतांतील जातींनीं, नदीच्या खालच्या बाजूस असलेलें मलोइ (मालव) नामक बलाढ्य राष्ट्र अलेक्झांडरशी लढण्याची तयारी करीत होते त्यास जाऊन मिळूं नये यासाठीं त्यांनां जिंकून घेण्याचें त्यानें ठरविलें. सिबोइ लोक हे जंगलांतील पशूंचीं कातडीं पांघरणारे व गदेसारखीं हत्यारें वापरणारे रानटी लोक होते, व ते अलेक्झांडरला कांहीं विरोध न करतां आपण होऊनच शरण आले. परंतु अगलसोइ लोकांनीं मात्र ४०,००० पायदळ व ३,००० घोडेस्वार जमवून अलेक्झांडरला अडथळा केला; तथापि त्यांचा युद्धांत पराभव होऊन त्यांचे असंख्य लोक मारले गेले व कित्येकांनां गुलाम म्हणून धरून विकण्यांत आलें. अलेक्झांडरनें त्यांच्या देशांत ३० मैल शिरून त्यांचे मुख्य शहर काबीज केलें. त्यांच्या दुसर्या शहराकडून त्यास जोराचा विरोध होऊन पुष्कळ मॅसिडोनियन शिपाई मारले गेले. तेथील २०,००० रहिवाश्यांनां जय मिळण्याची निराशा वाटूं लागतांच त्यांनीं शहराला आग लावून तींत ते आपल्या बायकांमुलांसकट पडले. मुख्य किल्ला मात्र या आगींतून बचावला. त्याच्या संरक्षणार्थ ठेवलेल्या ३,००० शूर लोकांस अलेक्झांडरनें जीवदान दिलें.
इतक्यांत मलोइ, ऑक्सिड्राकाइ व इतर स्वतंत्र जातींनीं एकत्र होऊन आपल्याला तोंड देण्याची तयारी चालविली आहे असें अलेक्झांडरला कळलें. हे सर्व लोक एकत्र होण्याच्या आंत त्यांपैकीं एकएकट्या जातीवरच हल्ला करून त्यांचा बेत फिसकटविण्याचा अलेक्झांडरनें निश्चय केला. त्यानें आरमारास व बरोबर न घ्यावयाच्या सैन्यास पुढील रावी व चिनाब यांच्या संगमावर जमण्याचा हुकूम केला; व तो स्वतः रावी नदीच्या दोन्ही तिरांवरील खोर्यांत रहाणार्या मलोई लोकांनां प्रथम तोंड देण्याचा निश्चय करून निवडक सैन्यानिशीं कूच करून निघाला. या मालवांचे शेजारी जे ऑक्सिड्राकाइ (क्षुद्रक) यांचा जरी त्यांच्याशीं वैरभाव होता तरी या वेळेस ऑक्सिड्राकाइ लोकांनीं आपला वैरभाव बाजूस ठेवून त्यांनां मदत करण्याचा निश्चय केला. या दोन्हीहि जातींनीं मोठ्या प्रमाणावर परस्परांत शरीरसंबंध घडवून आणून आपली मैत्री पक्की करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वैयक्तिक द्वेषानें नेहमींप्रमाणेंच हा समेट यशस्वी होऊं दिला नाहीं. कोणत्या पक्षाच्या सेनापतीनें सैन्याचें आधिपत्य घ्यावें याबद्दल या जातींमध्यें एकत्र वाद चालला असतां अलेक्झांडरनें अतिशय कौशल्यानें त्या लोकांवर हल्ला चढवला, आणि ऑक्सिड्राकाइ लोक मदतीला येण्यापूर्वीच त्यांचा धुवा उडविला. या जातींनां जर योग्य रीतीनें तयारी करण्यास अवसर मिळाला असता, तर त्यांनीं अलेक्झांडरबरोबरचें लहानसें सैन्य सहज नामशेष करून टाकलें असतें. कारण त्यांच्या जवळ ८०।९० हजार चांगलें पायदळ १०,००० घोडदळ व ७०० पासून ९०० पर्यंत रथ होते. मॅसिडोनियन सैन्य किती होतें हे जरी कोठें सांगितलेले नाहीं तरी तें कांहीं थोडक्या हजारांहून अधिक नसलें पाहिजे असें म्हणतात. परंतु अलेक्झांडरनें एकदम अचानक या लोकांनां गांठल्यामुळें प्रतिकार करण्यास त्यांनां अवसरच मिळाला नाहीं. रावी व चिनाब यांच्या खोर्यांच्या दरम्यान असलेलें ज्याला हल्लीं बार म्हणतात तें निर्जल पठार अवघ्या दोन मजलांत ओलांडून त्यानें शेतांत निशःस्त्र काम करीत असलेल्या मलोइ लोकांवर अचानक छापा घातला. अशा स्थितींत त्यांची धांदल उडून त्यांचा मोड होणें साहजिक आहे. त्यांच्यापैकीं पुष्कळांनीं हातहि वर उचचला नसतां त्यांची निर्दयपणें कत्तल करण्यांत आली. मॅसिडोनियन लोकांच्या हातून जे सुटले ते आपल्या तटबंदीच्या शहरांचा आश्रय घेऊन, वेशी बंद करून आंत राहिले. अशा या शहरांपैकीं एक अलेक्झांडरनें आपल्या स्वतःच्या देखरेखीखालीं हल्ला करून घेतलें व तेथील २००० शिबंदीची कत्तल केली. अशाच दुसर्या एका शहरावर पेर्डिक्कस यास पाठविलें होतें; परंतु तो तेथें जाईतों तेथील रहिवाशी शहर सोडून पळून गेले होते. अलेक्झांडर तसाच रावी नदीपर्यंत चाल करून गेला, व पळून जाणार्या मालाव लोकांस उताराच्या तेथेंच गांठून त्यांच्यापैकीं कित्येकांची त्यानें कत्तल केली. या लोकांचा पाठलाग करीत तो रावीच्या पूर्वेकडे गेला व हल्लीं ज्याला मांटगोमेरी जिल्हा म्हणतात त्या भागांतील ब्राह्मणांनीं वसलेलें एक शहर सुरुंग लावून व तटावरून चढून जाऊन त्याने काबीज केले. तेथें सुमारें ५००० लोक होते त्या सर्वांची कत्तल करण्यांत आली.
अशा रीतीनें या (मालव) मलोई लोकांचा जिकडे तिकडे कोंडमारा झाल्यामुळें, त्यांनीं पुन्हां रावी ओलांडून ५०,००० सैन्यानिशीं तिच्या उताराचें रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु अलेक्झांडरच्या सैन्यापुढें त्यांचा टिकाव न लागल्यामुळें त्यांनां पळ काढावा लागला. येथून ते निघाले ते आसमंतांतील एका मजबूत तटबंदीच्या शहराचा आश्रय घेऊन राहिले. हें शहर मुलतानच्या ईशान्येस ८०।९० मैलांवर असावे. हें शहर हस्तगत करीत असतां एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडून आली. मॅसिडोनियन लोकांनीं शहर काबीज केलें होतें व किल्ला सर करण्याकरितां तटावर चढण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. परंतु शिड्या आणणारे लोक रेंगाळत येत आहेत असें पाहून अलेक्झांडरनें एका माणसापासून शिडी हिसकावून घेतली, आणि तिच्या साहाय्यानें तो आणखी तीन इसमांसह किल्ल्याच्या तटावर चढून गेला. परंतु तो तटावर चढून उभा राहतांच आंतील शत्रूंनां त्याच्यावर नेम धरण्याची आयतीच संधि मिळाली. हें अलेक्झांडरच्या लक्षांत येतांच त्यानें आपल्या सोबत्यांसह एकदम त्या किल्ल्यांत उडी टाकली. त्याच्या सोबत्यांपैकीं एक जण तर लवकरच मरून पडला. अलेक्झांडर स्वतः किल्ल्याच्या जवळील एका झाडाच्या आश्रयानें उभा राहिला, व त्यानें त्या किल्ल्याच्या हिंदु किल्लेदारास ठार मारलें. अनेक लोकांविरुद्ध तो एकटा स्वतःचें रक्षण करीत असतां त्याला एक बाण लागून तो खालीं पडला. लागलेंच त्याच्या दुसर्या सोबत्यानें त्याच्यावर चिलखत घातलें व तो व तिसरा सोबती मिळून त्याचें रक्षण करुं लागले. शिड्या मोडल्यानें बाहेरील मॅसिडोनियन लोकांस आपल्या राजाला मदत करण्यासाठीं किल्ल्यांत प्रवेश करणें कांहीं वेळ अगदीं अशक्य झालें. परंतु सरतेशेवटीं कांहीं लोक कसेबसे भिंतीवरून चढून गेले, व कांहीं लोकांनीं किल्ल्याचे दरवाजे फोडून आंत प्रवेश केला व अलेक्झांडरचे प्राण वांचविले. अलेक्झांडरच्या छातींत बाण घुसला होता तो शस्त्रक्रिया करून मोठ्या कौशल्यानें बाहेर काढण्यांत आला. या प्रसंगीं बराच रक्तस्त्राव होऊन अलेक्झांडर जगेल अशी लोकांस आशा राहिली नाहीं. परंतु अलेक्झांडरची प्रकृति फार सुदृढ असल्यामुळें त्याची प्रकृति हळू हळू सुधारूं लागली, व कांहीं दिवसांनीं तो चांगला बरा झाला.
मालव लोक अशा रीतीनें पुरे चेचले गेल्यामुळें ते आतां अलेक्झांडरास शरण आले. ऑक्सिड्राकाइ लोक आपल्या दिरंगाईमुळें या संकटांतून वांचले तरी त्यांनींहि अलेक्झांडर यास बरीच खंडणी पाठवून आपण शरण येण्यास तयार आहों असा निरोप कळविला. अलेक्झांडरनें त्या खंडणीचा स्वीकार केला. त्या खंडणीमध्यें १०३० चार घोड्यांचे रथ, १००० ढाली, १०० चिलखतें, कापसाचा माल, ३०० घोडे आणि पुष्कळ प्रकारचे वाघ, सिंह आदिकरून प्राणी होते.
या सर्व जित प्रदेशावर फिलिप्पॉस यास अलेक्झांडरनें आपला क्षत्रप नेमलें. यानंतर त्याचें आरमार पुढें चाललें, व जेथें हिफासिस (बिआस) येऊन मिळाले तो तिसरा संगम ओलांडून, झेलम, रावी व बिआस या सर्वांच्या प्रवाहांस घेतलेल्या चिनाब नदीचा जेथें प्राचीन लेखक जिला सिंधु म्हणतात त्या नदीशीं संगम होतो तेथें, म्हणजे चवथ्या संगमापाशीं येऊन पोहोंचलें. येथें पुष्कळसें पायदळ ठेवून तें फिलिप्पॉसच्या ताब्यांत देण्यांत आलें. याच सुमारास अलेक्झांडरनें आपला सासरा ऑक्सायार्टीझ नांवाचा बॅक्ट्रियन सरदार होता त्याला टायरिआस्पसच्या बदलीं काबूल (परोपनिसदी) चा क्षत्रप नेमलें. वर सांगितलेल्या चार नद्यांच्या संगमाच्या ठिकाकणीं अलेक्झांडरनें मोठें शहर वसविलें, व येथील कांहीं जातींचा पराभव करून त्यांनां आपल्या अंकित केलें. तसेंच क्राटेरॉस हा आतांपर्यंत नदीच्या पश्चिम बाजूनें चालत होता त्याला त्यानें आतां पूर्वेच्या बाजूनें चालण्याचा हुकूम केला. एवढें झाल्यावर अलेक्झांडर यानें अतिशय बलाढ्य अशा मौसिकनॉस या राजावर अचानक हल्ला करण्याचा निश्चय केला. या राजाची राजधानी बहुधा हल्लीं सक्कर जिल्ह्यांत असलेली सिंधची प्राचीन राजधानी अलोर किंवा अरोर असावी. येथील लोक अतिशय सशक्त असून १३० वर्षांचे होईतों जगत असें म्हणतात. त्यांच्या प्रदेशांत जरी सोन्यारुप्याच्या खाणी होत्या तरी त्या धातूंचा ते स्वतः कधीं उपयोग करीत नसत. इतर हिंदू लोकांप्रमाणें ते गुलाम बाळगीत नसत, व औषधिशास्त्राशिवाय दुसर्या कोणत्याहि शास्त्राचा अभ्यास करीत नसत. त्यांच्यामध्यें सार्वजनिक भोजनाची चाल होती. मलोंईप्रमाणें अलेक्झांडर मौसिकनास यावरहि अचानाक चालून आल्यामुळें त्यानें आपल्या सर्व वैभवानिशीं अलेक्झांडरास सामोरें येऊन त्याचें प्रभुत्व कबूल केलें. परंतु पुढें त्याचा त्याला पश्चात्ताप होऊन त्यानें बंड उभारलें. ह्या बंडाचा मोड करण्यासाठीं अलेक्झांडरनें अगेनोरचा पुत्र पैथॉन यास पाठविलें व आपण स्वतः त्याच्या शहरांवर चाल करून जाऊन त्यांपैकीं कित्येक जमीनदोस्त केलीं इकडे पैथॉननें मौसिकनॉसला कैद करून आणून त्यास त्याला बंडास प्रवृत्त करणार्या ब्राह्मण मंत्र्यांसह ठार केलें.
मौसिकनॉसच्या वधानंतर सिंधु नदीच्या मुखांच्या दुबेळक्यांत पटल येथें राज्य करणारा संस्थानिकहि अलेक्झांडरच्या छावणींत येऊन आपण होऊनच त्याचा मांडलिक बनला. अलेक्झांडरनें नंतर ऑक्सिकनॉस नांवांच्या संस्थानिकावर चाल करून जाऊन त्यास कैद केलें. सिंदिमन या शहरीं राज्य करणारा संबॉस नामक दुसरा एक संस्थानिक तर आपण होऊनच त्यास शरण आला. अलेक्झांडरनें त्याला आपल्या आरमाराच्या स्वागताची तयारी करण्यास पुढें पाठवून दिलें. याच सुमारास त्यानें क्राटेरॉस यास बरेंचसें सैन्य बरोबर देऊन कंदाहार (ॲराकोशिआ) व सीस्तान या मार्गानें कार्मेनियांत जाण्याचा हुकूम केला. अलेक्झांडरनें स्वतः आपल्याकडे आरमाराचें आधिपत्य घेतलें, व हेफाइस्तिऑनला नदीच्या उजव्या तीरानें चालणार्या बाकीच्या सर्व सैन्याचें आधिपत्य दिलें. क्राटेरॉस पूर्वी नदीच्या डाव्या किनार्यानें चालत होता त्याच जागीं पैथॉनची नेमणूक झाली, व त्याच्या हाताखालीं घोडेस्वार देऊन त्याला वाटेंतल्या सर्व बंडाळ्या मोडून अलेक्झांडरला पटल येथें येऊन मिळण्याचा हुकूम झाला. पटल येथें अलेक्झांडर आल्याबरोबर तेथील लोक भीतीनें पळून गेले; पण त्यांच्या जीवितास अपाय होणार नाहीं असें आश्वासन देऊन त्यांनां परत बोलावण्यात आलें. या पटल नगराची नक्की माहिती लागत नाहीं, पण बहुतेक तें बहमनाबाद या शहराच्या आसपास कोठें तरी असावें असें तज्ज्ञांचें मत आहे. हें शहर लष्करी दृष्ट्या फार महत्त्वाचें आहे असें आढळून आल्यामुळें हेफाइस्तिऑन यास येथें किल्ल बांधण्यास व आसपासच्या भागांत विहिरी खणण्यास अलेक्झांडरनें हुकूम केला. तसेंच ज्या ठिकाणीं नदीचे फाटें झाले होते. त्या ठिकाणीं एक मोठें बंदर बांधण्याचा त्यानें निश्चय केला, व त्या नदीच्या दोन्ही फांट्यांचें थेट समुद्रापर्यंत संशोधन करण्याचें ठरविलें. प्रथम तो पश्चिम दिशेच्या फांट्यांचें संशोधन करण्यासाठीं निघाला, व ठठ (ठठ्ठा) नगरीपासून १५ मैलांवर असलेल्या दीबल बंदरापर्यंत येऊन पोहोंचला. त्याच्या खलाशांनां भूमध्यसमुद्राच्या संथ पाण्यांत नावा चालविण्याची संवय असल्यामुळें येथील भरतीआहोटीच्या भयंकर लाटामुळें त्यांची फार फजिती होऊं लागली. तरी पण ते कसेबसे समुद्रापर्यंत येऊन पोहोंचले, व येथें थोडे मैल समुद्रांत जाऊन अलेक्झांडरनें तेथें देवतांनां बळी वगैरे दिले.
नंतर अलेक्झांडर पुन्हां पटल येथें परत आला. तेथें त्याला बंदर बांधण्याचें काम झपाट्यानें चाललेलें आढळून आलें. नंतर तो नदीच्या पूर्वेकडील फांट्याचें संशोधन करण्यास निघाला. मुखापाशीं त्याला एका मोठ्या सरोवरांतून जावें लागलें. हें सरोवर म्हणजे बहुधा उमरकोटाच्या पश्चिमेस असलेलें समारा सरोवरच असलें पाहिजे. तेथून नंतर त्याला समुद्र लागला. तेथें त्यानें तीन दिवस समुद्रकिनार्याची पाहणी करण्यांत घालविले. नंतर पुन्हां पटल येथें तो परत आला. येथें आल्यावर त्यास बंदराचें काम बहुतेक पुरें झालेलें आढळून आलें. नंतर त्यानें भरपूर चार महिन्यांची सामुग्री बरोबर घेऊन दोन धाडशी कामगिर्या हातीं घेण्याचें ठरविलें. या कामगिर्या म्हणजे आरमाराचें पर्शियन आखातामधून पर्यटन व त्याला समांतर अशा दिशेनें जमिनीवरून जिड्रोसिआच्या प्रदेशामधून स्वतःचा प्रवास या होत. पहिल्या कामावर त्यानें निआर्कसची योजना केली. त्यानें त्याला पर्शियन आखातामधून युफ्रेटीझ नदीच्या मुखापर्यंत येण्यास सांगितलें, व वाटेंत जितकीं शहरें व जितके समुद्र लागतील त्यांची काळजीपूर्वक माहिती मिळविण्याचा हुकूम केला. स्वतः त्यानें आतांपर्यंत कोणीहि न गेलेल्या अशा मकराणच्या मार्गानें जाण्याचा निश्चय केला. निआर्कसला नदीमध्येंच पुष्कळ दिवस रहावें लागलें व मोठ्या प्रयासानें तो समुद्रांत येऊन पोहोंचला. उलट दिशेनें वारा वाहूं लागल्यामुळें त्याला २४ दिवस एका बंदराचा आश्रय घ्यावा लागला. त्या बंदराला त्यानें आपला सेनापति अलेक्झांडर याचें नांव दिलें. नंतर १०० मैल प्रवास केल्यानंतर तो अरबिस (पुरालि) नदीच्या मुखाजवळ येऊन पोहोंचला. नंतर पुन्हां १०० मैल प्रवास केल्यानंतर तो कोकल नांवाच्या एका ठिकाणीं पोहोंचला. येथें त्यानें जरूर तेवढीं विश्रान्ति घेतली. येथें एका किल्ल्यांत वस्ती करून रहात असतां अलेक्झांडरनें ओरैटाइ लोकांनां जिंकण्यास पाठविलेला लिओनाटस हा आपल्या नजीकच आहे असें त्याला कळलें. तसेंच त्याला अशीहि बातमी येऊन पोहोंचली की, तेथील लोकांचा लिओनाटसनें पराभव केला असून त्यांत त्यांची भयंकर प्राणहानि झाली होती. लिओनाटसच्या बाजूची प्राणहानि जरी थोडी होती तरी लिओनाटसचा गुरुबंधु आपोलोफानीझ, ज्याला अलेक्झांडरनें, त्या प्रांताचा क्षत्रप नेमलें होतें तो ठार झाला होता. आपण येथें आहों अशी बातमी त्यानें लिओनाटस यास कळवली, आणि जे कांहीं आपले खलाशी निरुपयोगी झाले होते त्यांनां त्यानें त्याच्या सैन्यांत पाठवून त्याच्या हाताखालील कांहीं नवे खलाशी आपल्याइकडे आणून घेतले. अशा रीतीनें ताजातवाना होऊन त्यानें आपलें पर्यटन पुन्हां सुरू केलें व तामीरस नदीच्या मुखापर्यंत येऊन पोहोंचला. तेथील रानटी लोकांचा पराभव करून व तेथें पांच दिवस राहून तो ओरैटाईंच्या पश्चिम सरहद्दीवरील मलन (अर्वाचीन रासमाली) भुशिरापाशीं आला. मलन भुशिराच्या पुढें गेल्यावर किनार्याच्या बाजूस ओरैटाईंचा मुलूख संपून जिड्रोसींचा लागला.
याप्रमाणें बर्याच संकटांतून आपला मार्ग काढीत काढीत तो ऑर्मझ (हार्मोझीआ) च्या समुद्रधुनीच्या मुखाशीं असलेल्या जस्कच्या भुशिरानजीकच्या बदिस बंदरीं येऊन पोहोंचला. येथून पुढें तो ऑर्मझ येथें आला. येथें विश्रांति घेत असतां त्याला एक ग्रीक बोलणारा गृहस्थ आढळून आला. त्याची विचारपूस करतां त्याला हा अलेक्झांडरच्या सैन्यांतील शिपाई आहे असें आढळून आलें, व त्याच्या सांगण्यावरून अलेक्झांडर हा तेथून पांच दिवसांच्या अंतरावर आहे असें समजलें. निआर्कस आणि आर्किआस हे लगेच आपल्या राजास भेटण्यास निघाले, व अतिशय हाल काढीत अलेक्झांडरपाशीं येऊन त्याला जहाजें सुरक्षित आहेत अशी त्यांनीं बातमी सांगितली. नंतर तो पुन्हां अनामिसच्या मुखाशीं परत आला व कांहीं दिवसांनंतर युफ्रेटीझ नदीच्या मुखाशीं येऊन पोहोंचला. तेथें अलेक्झांडर हा सुसा येथें जात आहे असें कळल्यावरून तो परत फिरून तैग्रिसमध्यें शिरला व अशा रीतीनें अलेक्झांडरपाशीं येऊन त्यानें आपलें जलपर्यटन संपविलें.
परंतु निआर्कस यास जितके हाल सोसावें लागले त्यांपेक्षां पुष्कळच अधिक हाल अलेक्झांडर यास सोसावे लागले. अलेक्झांडरास मार्गांत हाला नांवाची एक पर्वताची ओळ आहे हें माहीत नसल्यानें त्याच्या बेतांत बराच अडथळा आला. शिवाय हजारों सैनिक पाण्याच्या अभावीं मृत्युमुखीं पडले, व उन्हाच्या प्रखरतेमुळेंहि कित्येक ओझें वाहणारीं जनावरें व सैनिक प्राणास मुकले. सरतेशेवटीं ते एकदाचे पास्नी नांवाच्या बंदरापर्यंत येऊन पोहोचले. परंतु या प्रवासामध्यें बरोबर त्यांनीं जितकी कांहीं लुट आणली होती ती सर्व गमावल्यामुळें या स्वारीपासून विशेषसा फायदा कांहींच झाला नाहीं.
कार्मेनिआमध्यें सैन्य असतांनाच अलेक्झांडरला अशी बातमी लागली कीं, चिनाब व सिंधु यांच्या संगमाच्या उत्तरेकडील प्रांतावरचा क्षत्रप फिलिप्पॉस हा त्याच्या भाडोत्री लष्कराकडून मारला गेला. तथापि अलेक्झांडरला या वेळीं तक्षशिलेच्या राजास व यूडेमॉस यास त्या प्रांताची व्यवस्था पहाण्यास सांगण्याशिवाय दुसरें कांहींच करतां आलें नाहीं. पुढें स्वतः अलेक्झांडरहि दुसर्याच वर्षी बाबिलोनमध्यें वारल्यामुळें ग्रीकांनां या प्रांतावर चांगला ताबा बसवितां आला नाहीं.
ज्या वेळेस त्रिपारादैसॉस येथें ख्रि. पू. ३२१ सालीं साम्राज्याची पुन्हां विभागणी झाली, त्या वेळेस सर्व हिंदुस्थान व पंजाब यावरील अधिकार पोरस व तक्षशिलेचा राजा आंभी यांजकडे देण्यांत आला व पैथॉन यास ॲराकोशिआचा क्षत्रप नेमण्यांत आलें. तात्पर्य, ग्रीकांचे सार्वभौमत्व यापुढें नांवाला जरी शिल्लक राहिलें होतें, तरी प्रत्यक्ष सत्ता ग्रीकांच्या हातीं न राहतां हिंदूंकडेच राहिली. अलेक्झांडरची ही स्वारी ख्रि. पू. ३२७ पासून ३२४ पर्यंत म्हणजे तीन वर्षे चालली असे म्हणण्यास हरकत नाहीं.
कुशल सेनापतीच्या दृष्टीनें पाहतां इतक्या थोड्या अवधींत अलेक्झांडरनें जीं अनेक प्रचंड कृत्यें केलीं त्यांनां इतिहासांत दुसरी उपमाच नाहीं. त्याच्या लष्करी हालचाली, युद्धाच्या निरनिराळ्या युक्तया वगैरेसंबंधीं ज्ञान पूर्णावस्थेप्रत पोहोचलेले दिसतें. तो अत्यंत शूर असल्यामुळें व कोणत्याहि संकटांत तो स्वतः सर्वांच्या अगोदर उडी टाकीत असल्यामुळें त्याच्या सैनिकांत तो उत्साह उत्पन्न करूं शकत होता. हिमालयापासून तों समुद्रापर्यंत त्यानें जे विजय मिळविले त्यांवरून यूरोपीय लोकांच्या शिस्तीपुढें अतिशय बलाढ्य असें हिंदू सैन्य देखील टिकाव धरीत नाहीं असें आढळून आलें. तसेच युद्धांतील हत्तींच्या उपयुक्ततेबद्दल हिंदूंची जुनी कल्पनाहि मॅसिडोनियन लोकांनीं फोल ठरविली. क्राटेरॉसच्या सिंधपासून पर्शियापर्यंतच्या स्वारीमुळें युरोपशीं संबंध ठेवण्याचा एक सोपा मार्ग खुला झाला, व त्याचप्रमाणें निआर्कसच्या जलपर्यटनामुळें समुद्राच्या बाजूनें दुसरा एक मार्ग उपलब्ध झाला.
अलेक्झांडरनें स्वीकारलेल्या एकंदर धोरणावरून असें दृष्टीस पडतें कीं, त्याचा विचार हिंदुस्थान देश आपल्या साम्राज्यास जोडावा असा होता. परंतु त्याच्या अकालीं मरणामुळें तो हेतु सफल झाला नाहीं. त्याच्या मरणानंतर तीनच वर्षांच्या आंत त्याचे सेनापती, त्याचें लष्कर व त्याची सत्ता सर्व कांहीं लयाला गेलें व अशा रीतीनें त्याच्या स्वारीपासून मुळींच फायदा झाला नाहीं. हिंदुस्थान देश पूर्वी होता तसाच कायम राहिला व ग्रीकांच्या स्वारीचा येथें जवळ जवळ कांहींच मागमूस राहिला नाहीं असें म्हटलें तरी चालेल. कोणताहि हिंदु, बौद्ध किंवा जैन ग्रंथकर अलेक्झांडरच्या स्वारीचा उल्लेख देखील करतांना आढळत नाहीं, इतकी त्याची विस्मृति झाली.
हिंदुस्थानांतील ग्रंथकारांनां जरी अलेक्झांडरची पूर्ण विस्मृति पडली तरी ग्रीक संस्कृतीनें हिंदुस्थानांत किंवा आशियांत कार्य केलें नाहीं असें नाहीं. अलेक्झांडरच्या आगमनाची साक्ष जरी येथील ग्रंथकार देत नाहींत तरी ग्रीकांच्या पांडित्याबद्दल आदर दाखवून त्यांच्या प्राचीन अस्तित्वाची साक्ष गर्गासारखे ग्रंथकार देतात. असो. आतां आपण ग्रीक संस्कृतीच्या जगांतील एकंदर कार्याचा हिशेब घेऊं.