प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

ॠत्विजाचा दासीपुत्र म्हणून त्याग व विशेष करामत दाखविल्यावर स्वीकार- ॠषींनीं आरंभिलेल्या सत्रांत आर्त्विज्य मिळविण्यासाठी कवष नामक ॠषि त्या ठिकाणीं येऊन बसला असतां. हा जुगार खेळणारा व दासीपुत्रासारखा ब्राह्मण आमच्या सोमयागामध्यें आर्त्विज्यास योग्य नाहीं असें म्हणून त्या ॠषींनीं कवषाला जेथें उदक नाहीं अशा ठिकाणीं घालवून दिलें. नंतर त्या पाणी नसलेल्या ठिकाणी तहान लागल्यामुळे कवषानें सरस्वती नदीची स्तुति केली असतां सत्र करणा-या ॠषींच्या सन्निध वाहत असलेली सरस्वती नदीच कवषाकडे आली. ही गोष्ट सत्रांतील ॠषींनां समजताच कवषावर देवांची अत्यंत प्रीति आहे असें जाणून त्यांनी कवषाचे सर्व दोष माफ करून त्याला आपल्यामध्यें घेतलें. (ऐ. ब्रा. २.१९)

ॠत्विजांनां अग्नीषोमीय पशूचें मांस (इडा) भक्षण्यास मोकळीक - यज्ञांतील अग्नीषोमीय नामक पशूंचें मांस (इडा) ॠत्विजांनीं भक्षण करू नये कारण यजमानानें आत्मस्वरूप असा तो अग्नीषोमीय पशू देवतांनां अर्पण केला असल्यामुळें त्या पशूचें मांस भक्षण केलें असतां यजमानाचें मांस भक्षण केल्यासारखें होईल असा एक पक्ष. परंतु इंद्रानें अग्नि आणि सोम यांच्यासाठी वृत्राला मारल्यावर अग्नि आणि सोम या देवतांनीं यज्ञांतील सोमाभिषवाच्या पूर्वदिवशीं आमच्या नांवाने (अग्नि आणि सोम अग्नीषोम) देवतांनां पशु अर्पण केला जावा असा वर मागून घेतला असल्यामुळें अगीषोमीय पशु व यजमान यांचा संबंध रहात नाही. यासाठी अग्नीषोमीय पशूचें मांस भक्षण करावें असा दुसरा पक्ष (२.४)

शांखायनी खटपट- यज्ञविषयक आपला संप्रदाय वाढविण्यासाठीं दुस-या संप्रदायांचा निषेध केल्याचीं शांखायन ब्राह्मणांतील उदाहरणें आपण विचारांत घेऊं.
दर्शपूर्णमास यागांत शेवटच्या प्रयाजयागामध्यें ‘देवा आज्यपाजुषाणा अग्नि आज्यस्य व्यंतु’ या पाठाचा निषेध व ‘देवा आज्यपा जुषाणा  अग्नआज्यस्य हविषो व्यंतु’ असा पाठ (३.४)
‘सूक्तवाक’ नामक यागामध्यें (पूर्वी ज्या देवतांनां आव्हान केलें असेल त्या देवतांनां उद्देशून) ‘अग्निरिदं हविरजुषत’ ‘सोम इदं हविरजुषत’ असा मंत्र म्हणावयाच्या असलेल्या परिपाठाचा निषेध व त्या जागीं नुसतें ‘हविरजुषत’ असें म्हणावयाचा पाठ (४.८).
चातुर्मास्य यागांत वैश्वदेवपर्वामध्यें क्षत्रियांनां वाजिन यागाचा निषेध (५.१)
अगिष्टोमामध्यें सुत्येच्या दिवशीं प्रउग नामक शस्त्र पठण करतांना त्यांतील सरस्वती देवतेसंबंधी पुरोरुक्  नामक मंत्र पठणाचा निषेध.
या त-हेचे अनेक आग्रह शांखायन ब्राह्मणांत दाखवितां येतील.

यज्ञिय कर्मासंबंधी शतपथ व तैत्तिरीय यांतील परस्परनिषेध व विरोध.
(१) अग्न्याधानासंबंधी नक्षत्र उक्त कोणतें तें ठरविणें- शतपथांत पूर्वाफाल्गुनी घ्यावें असें मत (१.२,११) आहे. व तैत्तिरीयांत पूर्वाफाल्गुनीचा निषेध व कामनापरत्वें ग्रहण (१.१,२).
(२) अग्न्याधानासंबंधी मंथनाचा काल यासंबंधी. अग्निमंथन रात्रीं करावें व गार्हपत्याधान पहाटें करून सूर्योदयकाळीं आहवनीयाचें आधान करावें असें तैत्तिरीय मत (१.१,४) व अग्निमंथन रात्रीं न करतां दिवसा (सूर्योदयी) करावें असें शतपथ (१.४,८) मत.
(३) चातुर्मास्य यागांत पितृयज्ञाच्या दिवशीं गार्हपत्याच्या दक्षिणेस बसून प्राचीनर्वातो करून हविर्निर्वाप करावा असें शतपथ मत (५.२,८) व वरील मताचा निषेध करून उत्तरेस बसून व उपवीती करून निर्वाप करावा असें तैत्तिरीय मत (१.६,८)

आपला यज्ञविषयक सांप्रदाय वाढविण्यासाठी दुस-या सांप्रदायांचा केलेला निषेध
तैत्तिरीय संहिता
होत्याच्या स्रुगादापनसंज्ञक मंत्रामध्यें यजमानदेवता या अक्षरांच्या पुढें ‘यो आग्निं होतारमवृथाः’ हीं अक्षरें म्हणण्याची अन्य शाखेंत पद्धति होती. तैं. संहितेत त्याचा निषेध करून ‘योअग्नि होतारमवृथाः’ ही अक्षरें म्हणणा-या होत्याचा यजमान दोन्ही बाजूंनी अग्नीकडून घेरला जातो असें म्हटलें आहे. (तै. सं. २.५,९)
होत्याच्या सूक्तवाकसंज्ञक मंत्रसंघाचा आरंभ एका शाखेमध्यें ‘उद्यावापृथिवी’ असा होता त्याचा निषेध करून ‘इंदद्यावापृथिवी’ असा पाठ सुरू केला. (तै. सं. २.६,९)
सूक्तवाचक मंत्रामध्ये एका ठिकाणीं सूपावसानाच  स्वध्यवसानाच असा एक शाखेचा पाठ होता हा पाठ उपयोगांत आणल्यास यजमान मरेल अशाप्रकारें निषेध करून सूपचरणार स्वधि चरणाच अशा प्रकारचा नवा पाठ रूढ केला. (तै.सं. २.६,९)
दीक्षाहुति देतांना एका मंत्रामध्यें ‘हविषा विधेः’ असा एका शाखेचा पाठ होता त्याचा निषेध करून हविषा वृघातु हा पाठ रूढ केला. (तै. सं. ६.१,२)
प्रायणीयेष्टीमध्यें प्रयाज याग करावयाचे व अनुयाज करावयाचे नाहींत व उदयनीयेष्टींत प्रयाज न करतां फक्त अनुयाज करावयाचे असा एक प्रचार होता त्याचा निषेध करून प्रायणीया व उदनीया या दोन्हीहि इष्टीमध्यें प्रयाज व अनुयाज हे दोन्ही करावयाचे असा प्रचार सुरू झाला. (तै. सं. ६.१,५)
अग्नीषोमीय पशूचें हविःशेष मांस भक्षण करूं नये अशी पद्धति होती ती मोडून भक्षण करण्याची पद्धति रूढ केली.

तैत्तिरीय ब्राह्मण
मनूची मुलगी ‘इडा’ हिने अग्न्याधानांत अग्निस्थापनाच्या क्रमांत नवा प्रचार सुरू केला. आहवनीय, गार्हपत्य आणि नंतर दक्षिणाग्नि असा असुरांचा क्रम होता. दक्षिणाग्नि गार्हपत्य व नंतर आहवनीय असा देवांचा अग्निस्थापनेचा क्रम होता. इडेने या दोन्ही क्रमांचा निषेध करून आपल्या बापाच्या अग्नयाधानांत गार्हपत्य, दक्षिणाग्नि व नंतर अहवनीय असा नवाच अग्नित्थापनक्रम सुरू केला व हाच क्रम सांप्रत सर्वत्र चालूं आहे. (तै. ब्रा. १.१.४).
आहवनीय अग्नीचें आधान (स्थापन) करावयाच्या पूर्वी तो अग्नि आनशेव्यानशें या मंत्रानें तीन वेळ खालून वर असा चाळवून नंतर त्या अग्नीची स्थापना करण्याची पूर्वी चाल असावी. तैत्तिरीय ब्राह्मण म्हणतें की तसें करूं नये (१.१,८) तर एकदांच हातानें उचलून घ्यावा व त्याची स्थापना करावी.
सत्रामध्यें विषुवान् नांवाचा जो मध्यम दिवस असतो त्याच्या पूर्वीचे ३ व पुढचे ३ असे सहा दिवस अग्निष्टोमाचे अनुष्ठान करण्याची एक पद्धति प्रचारांत होती. तिचा निषेध करून. तै. ब्रा. १.२,२ म्हणते की, पूर्वोक्त सहाहि दिवस उक्थ नामक ॠतूचेंच अनुष्ठान करावें.
चतुर्मास्य यागांमध्यें पितृयज्ञाच्या दिवशी गार्हपत्याच्या दक्षिणेस बसून पितृदेवतांच्यासाठी निर्वाप करण्याची पूर्वी पद्धति होती. कां कीं, दक्षिणदिशा ही पितरांची दिशा म्हणून समजली जाते. परंतु तै. ब्रा. (१.६,८) म्हणतें कीं तसे करूं नये. उत्तरेसच बसून निर्वाप करावा. कारण पितृयज्ञामध्यें केवळ पितृदेवतांचेच कांही यजन नाहीं. देव  व पितर या दोघांचेहि आहे. फार झालें तर पितरांच्यासाठी पुरोडाश भाजतांना अग्नीवर दक्षिण बाजूस भाजावा म्हणजे झाले. या बाबतीत शतपथाचा तैत्तिरीयांशी विरोध (५.२,८.९) आहे.
अग्निहोत्रहोमामध्यें अवदानार्थ चार स्रुवे स्त्रुचीमध्यें भरून घेतल्यावर गार्हपत्याजवळ ती स्रुची एकदां खलिं ठेवावयचीं व मग तेथून पुढें होमासाठीं ती आहवनीयाकडे घेऊन जावयाची अशी पद्धति एका संप्रदायाची होती. तिचा निषेध करून तै. ब्रा. म्हणतें की अशा प्रकारें आहवनीयग्नीवर होम होण्यापूर्वी गार्हपत्याजवळ सुची खाली ठेवूं नये. असें केल्यानें एकासाठी घेतलेलें अन्न दुस-याचें पुढें ठेवलेल्यासारखें होतें. (२.१,७)
अश्वमेधामध्ये अवभृताचे वेळी मृत्यूला कारणभूत असल्यामुळें मृत्युरूपच अशा निरनिराळया व्याधींनां त्यांच्या कडून उपसर्ग होऊं नये म्हणून अहुति देण्याचा परिपाठ होता परंतु तो मोडून मृत्युरूपी मुख्य एकाच व्याधीला आहुति देण्याचा परिपाठ चालू केला. (तै. ब्रा. ३९, १५).
दहि व दूध यांच्या मिश्रणास सान्नाय म्हणतात. सान्नाय द्रव्याचें अवदान घेतांना प्राथम्याच्या दृष्टीनें दहि हे आदल्या दिवशी विरजलें असल्यामुळें ते प्रथम घेऊन नंतर दूध घेण्याची पद्धति होती. पण ती मोडून दूध हे दह्याचे पूर्ण किंवा प्रथम स्वरूप असल्याने आधी दूध घेऊन नंतर दहि  घ्यावें अशा पद्धति सुरू झाली. (तै. सं. २.३,५)

शतपथ ब्राह्मण
पत्नीने इष्टीसाठी तांदुळ कांडतांना मंत्र म्हणण्याची  जी कोणाची पद्धत होती तिचा निषेध करून अमंत्रक तांदुळ कांडण्याचा प्रचार सुरू केला. (श. ब्रा. ८.१,४)
संमार्गदर्भ अग्नीत जाळून टाकण्याचा पूर्वीचा प्रचार बंद करून संमार्गदर्भ कायम तसेच (पात्रें वगैरे घासतांनां उपयोगी पडण्यासाठीं) उत्करावर ठेवण्याची पद्धति सुरू झाली (श. ब्रा. २, ४,११). तैत्तिरीयांच्या मतें संमार्गदर्भ जाळणे हें जास्त महत्त्वाचें आहे (तै. ब्रा. ३.३,१).
पत्नीनें आपल्या कमरेस योक्त्र बांधल्यावर त्याला गांठ द्यावयाची चाल होती तिचा निषेध करून नुसतीं डोकें वर  खोचून देण्याचा प्रघात सुरू केला (श. ब्रा. २,४.१६) तैत्तिरीयांचे मतें पत्नीनें योक्त्र कमरेस बांधल्यावर त्याच्या दोन्ही टोकांनां, गांठ दिली पाहिजे. (३.३,३)
अध्वर्यु व यजमान या दोघांनीं आज्यस्थालींत घेतलेले आज्य अवलोकन करावयाचा प्राचीन प्रचार होता. त्याचा निषेध करून एकटया अध्वर्युनेच आज्य अवलोकन करण्याची पद्धत सुरू केली. (श. ब्रा. २.४,२६). तैत्तिरीय  ब्राह्मणांत आज्यावलोक विधीच नाहीं. सूत्रांत आहे.
‘अग्नेसमिध्यमानाय होतरनुब्रूइहि’ असा प्रैष होत्याला देण्याची एका शाखेंत चाल होती. ती बंद करून तिचा निषेध व ‘अग्नेयसमिध्यमानायनुब्रूहि’ असा प्रैष देण्याची पद्धति सुरू केली. (श. ब्रा. ३.२,३). निषेध केलेली पद्धति तैत्तिरीयांची नसून कोणाची तरी होती.
वेदीमध्यें उभे करून ठेवलेल्या बहीचें (दर्भाचें) प्रेक्षण करतांना शडा, मध्य व बुडखा या तीन ठिकाणीं प्रोक्षण करण्याचा विधि होता त्याचा निषेध करून फक्त बुडख्याचेंच प्रेक्षण करण्याचा प्रचार रूढ केला. (श. ब्रा. २,६,३.४)
इघ्मा ज्या प्रकारच्या काष्ठांचा असेल त्या काष्ठाचेंच परिधी असावेत असा पूर्वीचा नियम होता त्याचा निषेध करून भिन्न काष्ठाचे परिधी करण्याची पद्धति चालू केली. (शत. प. ब्रा. २.६,१८). निषेधित चाल तैत्तिरीयांची होती. (तै. ब्रा. ३.३.३)
स्विष्टकृताची याज्या म्हणतेवेळी होत्यानें ‘अग्नेरयाट्’ ‘सोमस्यायाट्’ असें म्हणण्याचा जो प्रचार होता त्याचा निषेध करून ‘अयाडग्नेः’ ‘अयाट सोमस्य’ असें म्हणण्याचा प्रघात सुरू केला. (श. ब्रा. ६.१,१२). (तै. ब्रा. ३,५,७).
अध्वर्युनें प्राशित्र संज्ञक पात्र ब्रह्माकडे घेऊन जातांना आहावनीयाच्या पूर्व बाजूनें (दक्षिण बाजूस) जावयाचें अशी कोणा याज्ञिकाची पद्धति होती तिचा निषेध करून अघ्वर्यूनें आपल्या जाग्यावरूनच लांब तिरका हात करून प्राशित्र ब्रम्ह्याचे हातीं द्यावें असा पक्ष रूढ केला (श. ब्रा. ६.२,१२). तैत्तिरीय उदासीन आहे (तै. ब्रा. ३.३,९)
सूक्तवाकामध्यें होत्यानें ‘उभे चमे द्यावा पृथिवी’ असें म्हणण्याचा एका शाखेमध्यें पाठ होता त्याचा
निषेध करून ‘उभे चैनां द्यावा पृथिवीं’ असें म्हणण्याचा पाठ रूढ केला. (श. ब्रा. ७. २.२१). तैत्तिरीयांमध्यें उभे चनो द्यावा पृथिवी असा पाठ आहे (तै. ब्रा. ३,५ १०).
‘पत्नीसंयाज’ संज्ञक याग करण्यासाठीं पश्चिमेस गार्हपत्याग्नीकडे जातांना (१) आहवनीयाच्या पूर्वेस जाऊन नंतर दाक्षणच्या बाजूनें गार्हपत्याकडे यावयाचें  (२) पत्नीच्या पाठीमागून जावयाचे  व तिच्या दक्षिणेस बसावयाचें (३) गार्हपत्याच्या उतरबाजूनें गार्हपत्य व पत्नी यांच्यामधून जाऊन दक्षिणेस बसावयाचें असें तीन प्रकारचे कोणाकोणाचे परिपाठ चालू होते.त्यांचा निषेध करून गार्हपत्य आहवनीय यांच्यामधून वेदीच्या नैर्ॠत्य कोणावरून पलीकडे जावें आणि नंतर पत्नीच्या पाठीमागून उत्तर बाजूस जावें असा परिपाठ सुरू झाला. (श. ब्रा. ३, २,३,४). तै. ब्रा. या बाबतींत उदासीन आहे (३.३,१०).
चयनामध्यें चितिखाली पांच पशूची मस्तकें पुरावयाची असतात आणि प्रत्येक मस्तकाच्या ठिकाणीं असणा-या (२ कान, २ डोळे, २ नाकपुडया व १ मुख या) इंद्रियांच्या ठिकाणीं एक एक सोन्याचा रज किंवा तुकडा ठेवावयाचा असतो. एका शाखेमध्यें एकच पशूचें शिर पुरलें असलें तरी तें पांच शिरांचा प्रतिनिधि असल्यामुळें पांच शिरांच्याबद्दल प्रत्येकी सात प्रमाणें पत्नीनें सुवर्णाचे तुकडे एकाच पशूचे शिरावर ठेवावे असें एक मत चालू होत त्याचा निषेध करून पांच शिरांचा प्रतिनिधि म्हणून जरी एकच शिर पुरलें असलें तरी सुद्धां फक्त सात सुवर्णाचे रज किंवा तुकडेच ठेवण्याचा प्रचार रूढ केला. (श. ब्रा. ४.२,१०).
पशूंची अंगें शिजवितांनां मुख्य देवासंबंधी ज्या अंगांचें हवन करावयाचें तीं निराळी शिजवावी व स्विष्टकृतासंबंधी याग करावयाचीं अंगें निराळीं शिजवावी असा एक पक्ष व सर्व एकच भांडयांत शिजवावी असा दुसरा पक्ष  (१.३,६) ह्याविषयी कृष्ण यजुर्वेदांत कांही आढळत नाहीं.
वाजपेय यज्ञांत करावयाच्या पशूंच्या उपाकरणांत (देवतांनां समर्पण) वाग्देवत्य पशूचें उपाकरण शेवटी करावें. असें एक मत व मध्येंच करावें असें दुसरें मत (१.३,११). तैत्तिरीय ब्राह्मणाचे मत शतपथांतील पहिल्या मताप्रमाणें असल्याचें आढळतें. (तै. ब्रा. १.३,४).
राजसूय यज्ञांत यजमानास अभिषेकानंतर वस्त्र परिधान केल्यावर पागोटयासारखें वस्त्र यजमानाच्या गळयांत माळेप्रमाणें लोंबणारे व शेवटें नाभीजवळ खोचलीं आहे असें असावें असा एक पक्ष व तें वस्त्र गळयांत न घालतां कमरेस बांधून नाभीजवळ गांठ मारावी असा दुसरा पक्ष. (३.५,२४) तैत्ति. ब्राह्मणांत यजमानास एक वस्त्र नेसावयास (तुपांत भिजलेले) व एक पांघरावयास (उष्णीष) दिल्याचें फक्त आढळतें. कमरेस बांधण्याविषयी काहीच उल्लेख नाही. (तै. ब्रा. १.७,६).
नवीन वस्त्रें परिधान केल्यावर दीक्षिताचें पूर्वीची वस्त्रेहि पुन्हां धारण करावी असा एक पक्ष,व एकदां टाकलेली पुन्हां घेऊ नयेत असा दुसरा पक्ष (३.५,२५) कृष्ण यजुर्वेदाशीं हा विरोध नाही.

विशिष्ट कर्माचा प्रघात सुरू करण्यास ऐतिहासिक गोष्टींची जोड.
प्रायणीयेष्ठींत अदिति देवतेसंबंधीं भात शिजविण्याचें कारण- यज्ञ देवाच्यांवर रुसला असतां देव अदितीकडे गेल. अदितीनें यज्ञारंभी मला हविर्भाव द्याल तर तुमचें कार्य होईल असें सांगितलें. (ऐ. ब्रा. १. ७)

यज्ञामध्यें ‘उपसदू’ नामक इष्टि करण्याचे कारण- देवासुरांच्या लोकत्रयसंबंधी लढाईत असुरांनी भूलोक, अंतरिक्षलोक व द्युलोक या तीन लोकांचे तीन किल्ले बनविले. देवांनीं, असुरांनां जिंकण्यासाठीं पृथ्वीवर ‘संद’, नामक मंडप, अंतरिक्षांत ‘आग्नीघ्र’ नामक धिष्ण्या आणि द्युलोकांत हविर्धान. अशी तीन स्थलें उत्पन्न केली, आणि त्या ठिकाणीं उपसद् इष्टीचें अनुष्ठान करून असुरांचा पराभव केला. (ऐ. ब्रा. १.२३)

सोमवल्ली विकत घेतांना त्याच्या मोबदला गाय देण्याचें कारण- गंधर्वाच्या जवळ असलेला सोम मिळविण्यासाठी ‘मला मोबदला देऊन सोम विकत घ्या’ असें वाग्देवता म्हणालीं, व गाईचें रूप धारण करणा-या वाग्देवतेला देऊन देवांनीं सोम विकत घेतला (ऐ. ब्रा. १. २५)

यज्ञांतील पशू वधस्थानीं (शामित्र शालेंत) नेण्यापूर्वी पशूच्या व यज्ञमंडपाच्या भोंवती तीन वेळ अग्नी फिरविण्याचें (पर्यग्निकरण कर्म) कारण- देवांच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी (पशू पळवून नेण्यासाठी)असुर यज्ञांतील यूपाजवळ आले असतां देवांनीं पशूसह सर्व मंडपाभोवती अग्नीची तीन पुरें (वेष्टणें) उत्पन्न केली. त्यामुळें असुर तेथून परत गेले (ऐ. ब्रा. २.३)
सोम कुटण्यासाठी अर्घ्वयु पाणी भरीत असतां होत्यानें ‘आपोनप्त्रीय’ मंत्र पठण करण्याचें कारण- सत्रामध्यें बसलेल्या कवष ॠषीला (तो दासीपुत्र व जुगारी आहे म्हणून) उदकरहित अशा ठिकाणी घालवून दिलें असता तेथे त्यानें ‘आपोनप्त्रीय’ मंत्र पठण करून उदक उत्पन्न केलें (ऐ. ब्रा. २.१९)

सोमयागांत प्रथम इंद्रवायू देवतांनां सोम अर्पण करण्याचें कारण- देवांमध्यें प्रथम कोणी सोम प्राशन करावा याबद्दल तंटा लागला असतां धावण्याची शर्यत जो जिंकील त्यानें प्रथम सोम प्यावा असें ठरवून प्रथम वायु व त्याच्या मागून इंद्र, मित्रावरूण, अश्विनौदेव हे पळूं लागले. सर्वात पुढें असलेला वायु लवकरच शर्यत जिंकणार असें पाहून ‘मीं व तूं’ दोघांनी शर्यत जिंकली असें आपण ठरवूं आणि दोघेहि एकदम अर्धा अर्धा सोम पिऊं असें इंद्र वायूला म्हणाला. परंतु ते वायु कबूल करीना.शेवटी इंद्र आपण एक भाग घेऊन तीन भाग वायूस देण्यास कबूल झाला व त्यांनी मतैक्यानें आम्ही शर्यत जिंकली असें जाहीर केलें (ऐ. ब्रा. २.२५)