प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

शस्त्रांच्या शंसनारंभी (प्रातःसवनांत) तूष्णींशंस नामक मंत्र पठणाचें कारण -  देव व असुर यांच्या युद्धांत देव ज्या ज्या शस्त्रांचा उपयोग करीत त्या सर्वांचा असुर प्रतिकार करूं लागले परंतु तूष्णीशंस नामक वज्राचा त्यांना प्रतिकार करतां आला नाहीं. (ऐ. ब्रा. २. ३)

ब्राह्मणग्रंथांतील अनेक वाद आपणांस शुष्क भासतील. वादांचे स्वरूप पाहिलें म्हणजें शुष्क गोष्टींवर ते होते यांत शंका नाहीं,  पण कारणें मात्र शुष्क नव्हतीं. कारण पैशाचें असतें, आणि तें लपविण्यासाठीं तत्त्वांची जोड होते. आपलें धंद्यांचे स्वातंत्र्य स्थापन करणें, तें करण्यासाठीं विधींत फेरफार करणें आणि विधींतील त्या क्षुल्लक फेरफारांचे समर्थन करण्यासाठी पांडित्य खर्च करणें इत्यादि क्रिया त्यांत दिसून येतात. ब्राह्मणग्रंथकालापासून आजच्या याजुषहौत्राच्या किवा ॠग्वेदी कोकणस्थांनीं हिरण्यकेशीसूत्रपरिग्रह करावयाच्या भांडणापर्यंत इतिहास तत्त्वतः एकच आहे. भिक्षुकीपासून प्राप्ती एका वर्गास व्हावी आणि ती दुस-यापासून जावी हेंच मूळ कारण असतें.

श्रौतसंस्था वाढल्यानंतर जेव्हां स्थानिकांच्या देवतांचे प्राधान्य अधिकाधिक होत गेलें तेव्हां शिवविष्णूसारखीं दैवतें संहितांतून कशीं शिरली हें मैत्रायणी संहितेंतील उता-यानें स्पष्ट होईल. श्रौतसंस्था जेव्हां अधिकाधिक संकुचित होऊं लागल्या तेव्हां पौराणिक देवतांसाठीच याग होऊं लागले याला विष्णुयागासारखी स्मार्त यागांची उदाहरणें देतां येतील. अशा रीतीनें मांत्रसंस्कृतीचा पराजय व देश्यांच्या दैवतांची पुनः स्थापना झाली.