प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
मंत्रकालीन पौरोहित्य व त्यास आश्रय - गोत्रांचा आणि सूक्तकर्तृत्वाचा संबंध दाखविणारें कोष्टक वर दिलें पण इतक्यात आपणांस गोत्रांच्या विषयाकडे वळतां येत नाहीं. मंत्रकालीन दुस-या अनेक भानगडी आहेत त्यांजकडे लक्ष दिल्याशिवाय आपणांस सूत्रोक्त गोत्रांकडे एकदम वळतां येत नाहीं. मंत्रांत दृष्ट होणारा पुष्कळच ब्राह्मण्याच्या इतिहासाचा भाग अजून मांडावयाचा आहे. ब्राह्मण्याच्या इतिहासांत त्यांनां दान देणा-या राजांचा किंवा इतर व्यक्तींचा इतिहास हा आलाच पाहिजे, कां कीं दान देणा-या व्यक्ती म्हणजे सूक्तरूपी मालाच्या गि-हाईक व्यक्ती होत.
उपाध्यायाचें अस्तित्त्व त्यांस दान देणा-या किंवा त्यांच्या मार्फत यजन करणा-या राजांशिवाय किंवा सामान्य व्यक्तींशिवाय शक्य नसतें. पारमार्थिक इतिहासांत परमार्थोद्यम करणारा वर्ग कसा होत गेला याचें ज्ञान पाहिजे आणि या वर्गाच्या अस्तित्त्वाचें स्पष्टीकरण करण्याकरतां त्या वर्गाचें योगक्षेम चालविणा-या वर्गाचेहि वर्णन पाहिजे. मागें उल्लेखिलेल्या ॠषींनीं पारमार्थिक गरजा कोणाच्या व कशा पुरविल्या हें स्पष्ट झाल्याशिवाय पारमार्थिक व धार्मिक इतिहास खुला होणार नाहीं यासाठी ॠषी व त्यांस दान देणारे राजे यांचे कोष्टक आमच्या वाचकांपुढे टाकणें अवश्य आहे. महावंसो व दीपवंसो यांमध्यें ज्या ज्या राजांनीं भिक्षूंस व संघांस दान दिलें त्यांच्या नांवांचे (नांवापलीकडे बहुतेक कशाचेंच नाहीं) रक्षण केले याबद्दल जर बुद्ध भिक्षूंची व त्यांत असलेल्या ऐतिहासिक जाणीवीची तारीफ करावयाची तर दानें देणा-यांचे नांव रक्षण करण्याबद्दल प्राचीन सूक्तकारांची तारीफ अधिकच केली पाहिजे. कांकी पुस्तकांत लिहिलेलें राजाचें नांव पुस्तकांत राहतें आणि मंत्रातील नांव तर वारंवार गाईले जाते. ज्या राजांनीं वरील ॠषींस दानें दिलीं ते भाग्यवान खरे कारण थोडयाशा दक्षणेबद्दल त्यांचं नांव सर्व गोष्टीची आठवण चिरडून टाकणा-या कालक्रमापासून जिवंत सुटलें आहे. तर त्या भाग्यवानांच्या आणि ज्या कृत्याबद्दल त्यांचें नांव अजरामर झालें त्या कृत्यांचा आपण परिचय करून घेऊं.
ऋषी व त्यांना दान देणारे राजे. |
वरील कोष्टकांत सर्वानुक्रमणी विश्वसनीय मानिली आहे. कारण ॠचेंत दान देणा-या राजांचा उल्लेखच नेहमी येत असून दान घेणा-या ॠषींचा उल्लेख फारच क्वचित येतो. तेव्हां दान देणा-या राजांचा ज्या सूक्तांत उल्लेख असेल त्या सूक्ताचा कर्ता राजापासून दान घेणारा होय असें गृहीत धरून वरील कोष्टक तयार केलें आहे. यामुळें दान घेणा-या सर्वच ॠषींचा उल्लेख ॠग्वेदांत आढळणार नाही.