प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

वैदिक सूक्तांचा एका विशिष्ट प्राचीन युद्धाशीं संबंध व्यक्त झाल्यामुळें प्राचीन इतिहासाचा एक धागा आपणांस लावतां आला असें मानण्यास हरकत नाहीं. आतां प्राचीन संस्कृतीच्या इतिहासाच्या दुस-या मुख्य अंगाकडें आपणांस वळलें पाहिजे. त्यांकरितां आतां आपण ब्राह्मणांच्या विद्येच्या, कुलांच्या आणि सामाजिक संस्थांच्या इतिहासाचें अवलोकन करूं. ब्राह्मणांचा इतिहास द्यावयाचा म्हणजे मंत्रद्रष्टे, गोत्रें, ॠषिकुलें आणि ब्राह्मणकुलें, यांचा म्हणजे ब्राह्मण जातीचा आणि तिच्या विद्येचा इतिहास द्यावयाचा.

ब्राह्मणजातीच्या इतिहासाचे भाग साधारणतः पुढीलप्रमाणें पडतील.
(१) ब्राह्मण शब्दाची उत्पत्ति, सूक्तकर्तृत्व, सूक्तकर्त्यांत पूर्वोत्तरता, त्यांतील कुलें व संप्रदाय ही शोधीत बसणें हा ब्राह्मणेतिहासांतील पहिला भाग होय.
(२) यानंतरच्या भागांत यज्ञसंस्थेच्या विकासामुळें झालेली जुन्या अथर्व्याहून ॠत्विजांच्या महत्त्वाची स्थापना, ॠत्विजाचें समुच्चय आणि त्यात झालेले विशिष्टीकरण, तसेच त्याचें निरनिराळया वेदाच्या ब्राह्मणजातीत पर्यवसान इत्यादि विषय मोडतील. या विवेचनात ब्राह्मण या नांवाची उत्पत्ति, त्या नावाखाली जो समाज गोळा झाला त्याचें पृथक्करण आणि त्याचा पूर्वकालीन व समकालिन समाजांशीं संबंध इत्यादि विषय मोडतील.
(३) यज्ञजीवी ॠत्विजांचा वर्ग स्थापिला गेल्यानंतर त्या वर्गामध्ये अनेक भेद कसकसे उत्पन्न झाले व पुढें त्यांच्या जाती कशा बनल्या ह्या विवेचनाचा त्यापुढील भाग होय.
(४) या वर्गाचा सर्व हिंदुस्थानभर प्रसार कसा झाला आणि त्याचें कार्य काय झालें.
(५) गोत्रप्रवरादिकाची उत्पत्ति आणि गोत्रसंस्थेचा ब्राह्मण जातीशी व इतर जातीशी संबंध.

यापैकी काहीसा इतिहास मागें येऊन गेलाच आहे. याच्या विकासक्रमांत चातुर्वण्यकल्पनेचा व तदंतर्गत वर्गीकरणाचा उल्लेख केला नाहीं व त्यास कारणहि आहे. चातुर्वण्याची कल्पना जुनी आहे आणि ब्राह्मणसदृश एक वर्ग पशुभारतीय काली व मूलगृहकालीं होता ही गोष्टहि मागे वेदविद्या या भागांत दिलीच आहे व जर वेदपूर्ववालीं वर्गरूप संधीकरण होऊन गेले होतें तर उत्तर कालांत जो इतिहास यावयाचा त्यांत पूर्वीच्या संधीकरणांत पुढें कशी काय रूपांतरें होत गेली होच यावयाचें. प्रथम संघीकरण वेदसाहित्यानें आपणांस ज्ञेय नाही. वाटेल त्या तत्ववेत्त्यानें या प्रथम संधीकरणाविषयीं वाटेल ती कल्पना करावी आणि आपली कल्पना तीच खरी असें गृहीत धरून बसावें यापलीकडे या विषयाची चर्चा जाणें शक्य आहे असें आम्हास वाटत नाहीं. जो अत्यंत प्राचीन समुच्चय तयार झाला त्याचा प्रारंभकाल जरी ज्ञेय नाही, आणि वेदांत त्या वर्गाच्या घटनेची क्रिया सापडणार नाहीं, तरी ब्राह्मण जातिस्थापनेपूर्वीचें त्याचें स्वरूप कसें काय होतें हे वैदिक वाङमयावरून समजण्यायाजोगे आहे. त्या वर्गात मांत्रिकपणा वैद्यकपणा, कवित्व, स्तोत्रकर्तृत्व हीं होती. समाज नियमानात्मक धर्मशास्त्रकर्तृत्व यांच्यात त्याकाळी नसावें. ईश्वरी संचार होऊन बोलणें म्हणजे यहूदी लोकांत असलेला प्रवक्तेपणा हाहि त्यांच्यात फारसा दिसत नाहीं. अगदी प्रारंभीच्या काळीं नीतियुक्त वचनांच्या प्रवक्त्यांच्या उद्भवास योग्य प्रसंग उत्पन्न होत होते असें म्हणतां येत नाहीं. पण देवाशी सायुज्य व सलगी दाखविणारे ॠषी वेदांत दिसून येतात. या वर्गास अत्यंत प्राचीन काळीं काय नांव होते हें सांगता येत नाही. पुरोहित, उपाध्याय, वगैरे सर्व प्रकारचीं नांवे त्याचे कार्य वर्णन करण्यास अपु-या अर्थाची आहेत. तरी अगदी प्रारंभी त्या वर्गाला ब्राह्मण हें नांव असावें असें वाटत नाहीं.

इराणी संस्कृतीत समाजांतील प्रथम वर्गाचें नांव अथ्रवन्  असें होतें हें आपल्याकडील अथर्वा या शब्दाचें भिन्न रूप आहे हे उघड आहे. भारतीय संस्कृतीत प्रथमवर्गाचें “ब्राह्मण” असेंच नांव आपणांस परिचित आहे. तर यांतील नांव जुनें कोणतें. अथर्ववेद हा ग्रंथ जर समाजातील अत्यंत प्राचीन विद्येस समंत्रकता उत्पन्न केल्यामुळे उत्पन्न झाला आहे आणि, अथर्वा हें यज्ञ संस्थेतील ॠत्विजाचें नांव नाहीं तरी वेदास तें नाव देण्याइतका तो शब्द महत्त्वाचा होता, आणि अग्नीस प्रथम अथर्व्यानें मंथन करून उत्पन्न केलें अशी वाक्यें प्रत्येक वेदांत वारंवार वदलीं गेलीं आहेत त्या अर्थी अथर्वा हेंच नांव एका काळीं त्या परमार्थोपजीवी समुच्चयास लागलें असणें अशक्य नाहीं. अथर्वा हेंच नांव जर प्राचीन असेल तर ब्राह्मण या नांवाचा प्रसार कसा झाला व तो केव्हा झाला, आणि ब्राह्मण या शब्दाचा मूळ अर्थ काय?

पण प्रथम असा संशय येतो की, “ब्राह्मण” हाच शब्द प्रथमतः त्या वर्गाचा बोधक म्हणून उत्पन्न झाला काय? ॠग्वेदांत ब्राह्मण हा शब्द अनेक प्रसंगी येतो त्याप्रमाणेंच ब्रह्मपुत्र हाहि येतो.  तर ब्रह्मपुत्र आणि ब्राह्मण हे एकाच अर्थाचे शब्द नसतीलना? ब्राह्मण म्हणजे ब्रह्मन्चा मुलगा असा अर्थ नसेल ना? असा संदेह उत्पन्न होतो ही कल्पना खरी असल्यास ब्रह्मन हें वर्गाचे अगर वैद्याचे नांव असून पुढें ब्राह्मणपुत्र आणि ब्राह्मण हे शब्द तो वर्ग वंशपरंपरेनें चालू झाल्यावर उत्पन्न झाले असतील  अशी शक्यता दिसते. पुष्कळ प्रसंगी ब्राह्मणास ब्रह्मन या शब्दानेच संबोधिलेलें आपणास अनेक उत्तरकालीन ग्रंथांतहि दिसतें. असें असल्यास ब्रह्मन या शब्दाचा मूळ अर्थ काय असावा; तो या वर्गास कोणत्या कारणपरंपरेनें लागला असावा हे प्रश्न उत्पन्न होतात.

श्रौतधर्माचा विकास झाल्यानंतर चारवर्गाचे ॠत्विज तयार झाले. त्याच्यानंतर ब्रह्मन  किंवा ब्राह्मण शब्द प्रचारांत आला की अगोदर अस्तित्वांत आला हें निश्चयात्मक सांगतां येतें.चार वर्गाच्या ॠत्विजांनीं चालविलेल्या यज्ञसंस्थेतील ब्रह्मत्वावरून ब्राह्मण ही पदवी तयार झाली असें वाटत नाहीं. कांकी, ब्रह्मास त्रैविद्यांनीं जेव्हां आपल्या यज्ञसंस्थेत स्थान दिले नव्हतें अशाकालीं ब्राह्मण हा शब्द पूर्णपणें स्थितार्थ व स्थितपददर्शक झाला होता हें फक्त तीन वेदांचाच उल्लेख करणा-या पुरुषसूक्तावरून दिसतें. पुरूषसूक्तानें प्रथमवर्गाचा उल्लेख ब्राह्मण या शब्दानें स्पष्ट केला आहे. ब्राह्मण या शब्दाचा संबंध यज्ञसंस्थेंतील ब्रह्मपदाशीं ज्युलियस एकलिंग यानें जोडला तो त्या कारणामुळें आम्हांस संमत नाहीं. ब्रह्मवादी म्हणजे यज्ञांत संशयनिर्णायक वाक्य सांगणारा, हा अर्थ इतका उत्तरकालीन व अप्रसिद्ध आहे आणि हे कार्य इतकें कमी वारंवार येणारें होते कीं त्याच्या योगानें मोठया वर्गास नांव मिळेल हें संभवनीय नाहीं. ब्रह्मन याचा अर्थ सर्व विश्वव्यापक तत्त्व.  त्या शब्दाचा ब्राह्मण अथवा वर्गवाचक ब्रह्मन्  या शब्दांशीं कार्यकारण संबंध जोता येत नाहीं. पण हे दोन्ही शब्द एकाच धातूपासून निरनिराळया कारण पंरपरेनें उत्पन्न झाले असणें शक्य आहे. अथर्व्याची यज्ञसंस्था अतिप्राचीन होती आणि पुढें अध्वर्युहोतृयुक्त यज्ञसंस्था उत्पन्न झाल्यानंतर कालांतराने तीत ब्रह्माची यज्ञसंस्था विलीन झाली आणि ब्रह्माचे सहाय्यक ते ब्रह्मगणांतील ॠत्विज बनले असा इतिहास मागें दुस-या विभागांत दिला आहे. पुरूषसूक्तांत तीन वेदांचा उल्लेख आणि वर्गरूपानें उल्लेख करण्यास ब्राह्मण या शब्दाची योजना यावरून असें दिसतें की, त्रैविद्यांस आपली अथर्व्यांविरहित यज्ञसंस्था चालू ठेवावी लागली तरी ब्राह्मण शब्द घ्यावा लागला. यावरून ब्राह्मण, ब्रह्मपुत्र, निदान ब्रह्मन या शब्दाचें महत्त्व त्रैविद्यांची यज्ञसंस्था उत्पन्न होण्यापूर्वीचे असावें. होतें, उद्गाते, अध्वर्यु यांचे विशिष्टीकरण होण्यापूर्वी ब्रह्मन् हा वर्ग उत्पन्न झाला असावा आणि तो देखील वंशपरंपरेनें आपल्या विद्येचा उपयोग करणारा असावा. बृह याचाच अर्थ स्तोत्र किंवा वाढविण्याची काहीं तरी विद्या असा असून त्याला मत प्रत्यय लागून बृहमत् असा शब्द  तयार झला असावा आणि त्याचें ब्रह्मन असें रूप झाले असावें. एकंदरींत ब्रह्मन हा शब्द सोमसंस्थांच्या पूर्वी तयार झाला असावा आणि सोमसंस्थांच्या पूर्वीच हा वर्ग बराचसा वंशपरंपरेनें चालू असावा असें दिसतें.