प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
भरद्वाजकुल
१ सर्वानुक्रमणीसिद्ध वंशसंबंध व कुलसंबंध - बृहस्पतीचा मुलगा भरद्वाज, भरद्वाज कुलांतील- ॠजिश्वन् , पायु, वसु, गर्ग, सुहोत्र. सुहोत्राचे मुलगे पुरूमीह्ळ व अजमीह्ळ.
भरद्वाज- हा ॠ. मंडळ ६ चा द्रष्टा असून या मंडळांतील बरींच सूक्तें यांच्या नांवावर आहेत. सदर मंडलांत भरद्वाजाचा उल्लेख १६।१७ वेळ आला असून ॠग्वेदांत अन्य ठिकाणीहिं आला आहे. परंतु अनुक्रमणीकार याला बृहस्पतिपुत्र असें जें म्हणतात त्याला आधार ॠग्वेदांत नाहीं.
ॠजिश्व- ६. ४९ ते ५२ या सूक्तांचा द्रष्टा आहे व विकल्पानें ९. ९८ याहि सूक्ताचा द्रष्टा आहे. याला अनुक्रमणीकार भारद्वाज अथवा भरद्वाजकुलोत्पन्न असें म्हणतात. वरील सूक्तांपैकी ६. ५०, १५ व ५१, १२ या दोन ॠचांत भरद्वाजांचा बहुवचनी उल्लेख आहे. परंतु भारद्वाज ॠजिश्व असा उल्लेख नाहीं. ६. २०, ७ या भरद्वाजाच्या सूक्तांतील ॠचेंत ॠजिश्वन् याचा उल्लेख आला आहे. ॠग्वेदांत एक वैदथिन्ॠजिश्वा आहे. व त्याचा उल्लेख ९. १६, १३ व ५. २९, ११ या दोन ठिकाणी आहे. आणि दुसरा औशिज ॠजिश्व. याचा उल्लेख १७. ९९, ११ या ठिकाणीं आहे.
पायु- हा ॠ. ६. ७५ व १०. ८७ या सूक्तांचा द्रष्टा असून याला भरद्वाजपुत्र अथवा भारद्वाज म्हटलें आहे. वरील दोन्ही सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. ॠग्वेदांत पायु शब्द ब-याच वेळां आला आहे. परंतु त्याचा रक्षण करणारा असाच सर्व ठिकाणीं अर्थ सायण करतात. मात्र ६. ४७ या भरद्वाजपुत्र गर्ग याच्या सूक्तांतील २४ व्या ॠचेंत अश्वथानें पायुनामक ॠषीला दान दिल्याचा उल्लेख असून २५ व्या ॠचेंत भारद्वाजांचा उल्लेख आहे. परंतु पायु हा भारद्वाज अथवा भरद्वाजपुत्र असा उल्लेख नाहीं.
गर्ग- ॠ. ६. ४७ या सूक्ताचा हा द्रष्टा आहे. याला भरद्वाजपुत्र अथवा भारद्वाज म्हटले आहे. ॠग्वेदांत गर्गाचा कोठेंहि उल्लेख नाहीं. वरील सूक्ताच्या २५ व्या ॠचेंत भरद्वाजांचा उल्लेख आहे.
वसु- हा सूक्तकार ९. ८० ते ८२ या सूक्तांचा द्रष्टा असून याला भारद्वाज अथवा भरद्वजपुत्र असें म्हटलें आहे. वरील सूक्तांत अथवा ॠग्वेदांत वसु या व्यक्तीचा उल्लेख नाहीं.
सुहोत्र- ९. ३१, ३२ या सूक्तांचा द्रष्टा. याला भारद्वाज- भरद्वाज कुलांतील असें म्हटलें आहे. सदर सूक्तांतील ३१ व्या ॠचेंत भरद्वाजाचा उल्लेख आहे. परंतु सुहोत्र भरद्वाज असल्याबद्दल उल्लेख नाही. सुहोत्राचा ॠग्वेदांत उल्लेख नाहीं.
पुरुमीह्ळ, अजमीह्ळ- ४. ४३, ४४ या सूक्ताचे द्रष्टे. यांनां सुहोत्रपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी सू. ४४ ॠचा ६ यांत आजमीहळाचा उल्लेख आहे. व पुरुमीहळाचा उल्लेख १. १५१, २;१८३, ५.५. ६१, ९. ८. ६०, १४ या ठिकाणी आहे. परंतु त्यापैकी कोणत्याहि स्थळीं पुरुमीह्ळ व आजमीह्ळ सुहोत्रपुत्र असल्याचा उल्लेख नाहीं. ८. ६० याहि सूक्ताचा पुरुमीह्ळ द्रष्टा असून त्या सूक्ताच्या शेवटीं त्याचा उल्लेख आहे. परंतु तो सुहोत्रपुत्र असल्याचा नाहीं.