प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

भृगुकुल

(२) सर्वानुक्रमणीसिद्ध कुल व ॠग्मंत्रसिद्ध वंशसंबंध- कवीचा मुलगा उशना; वेनाचा मुलगा पृथु, पृथुचा मुलगा तान्व.
(३) सर्वानुक्रमणीसिद्ध वंश व कुलसंबंध- वरूणाचा मुलगा भृगु;भृगूचे मुलगे च्यवन, इट, कवि, जमदग्नि. कवीचा मुलगा उशना, जमदग्नीचा मुलगा राम (परशुराम) भृगुकुलांतील प्रयोग, सोमाहुति, नेम, कुत्नु, स्यूमरश्मि, वेन. वेनाचा मुलगा पृथू व पृथूचा मुलगा तान्व. "

भृगु- हा. ९. ६५ व १०. १९ या सूक्तांचा द्रष्टा सून याल वरूणपुत्र असें म्हटलें आहे. वरील दोन्हीं सूक्तांत याचा उल्लेख न हो. ॠग्वेदांत भृगूचा उल्लेख पुष्कळ ठिकाणीं आहे. परंतु त्यांत त्याला वरुणपुत्र म्हटल्याचें आढळत नाहीं.
च्यवन- ॠग्वेद १०.१९ या सूक्ताचा हा विकल्पाने द्रष्टा असून त्याला भार्गव असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत च्यवन या पदाचा व्यक्तिवाचक अर्थ केलेला नाहीं. ॠग्वेदांत च्यवान याचा व्यक्तिवाचक अर्थ केला असून तो १. ११६, १०; ११७, ११८;६;५ ७४, ५;८०; ६८, ६; ७१. ५; १०, ३९, ४ इतक्या ठिकाणीं आला आहे व तो च्यवान याला अश्वीदेवांनीं जरठपणा घालवून तरूण केले, या अर्थानें आला आहे. वरील सर्व उता-यांत तो भार्गव असल्याचा उल्लेख नाहीं.
जमदग्नि- या सूक्तकाराकडे ८. ९० या सूक्ताचें कर्तृत्व आहे व याला भार्गव म्हटलें आहे. वरील सूक्तांत त्याचा १८ व्या ॠचेंत उल्लेख आहे. त्याच्या नांवावर असलेल्या सूक्तांतील ९, ६२, २४;६५, २५ ॠचांतून याचा उल्लेख आहे. ॠग्वेदांत आणखीहि याचा उल्लेख आहे परंतु तो भार्गव असल्याचा उल्लेख नाहीं.
प्रयोग- हा ८. ९१ या सूक्ताचा द्रष्टा असून याला भृगुगोत्रोत्पन्न म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ४ थ्या ॠचेंत भृंगूचा उल्लेख आहे, परंतु ॠग्वेदांत प्रयोग या ॠषीचा कोठेच उल्लेख नाहीं.
स्यूमरश्मि- याला १०. ७७ या सूक्ताचा द्रष्टा व भृगुगोत्रज असें अनुक्रमणीकार म्हणतात. वरील सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. १. ११२, १६ या ॠचेंत या नांवाच्या ॠषीचा उल्लेख आहे, परंतु तो भृगुगोत्रज असल्याबद्दलचा नाहीं.
सोमाहुति- हा २. ४ या सूक्ताचा द्रष्टा असून याला भार्गव म्हटलें आहे. ॠग्वेदांत या व्यक्तीचा कोठेच उल्लेख नहीं. १. ९४, १४ या ॠचेंत सोमाहुतः असें पद आहे. परंतु ते अग्नीचें विशेषण आहे. २. ४ मधील २ -या ॠचेंत भृगूचा उल्लेख आहे. परंतु त्यावरून याला भार्गव म्हणतां येत नाहीं.
नेम- याच्याकडे १०. ८९ या सूक्तांचे द्रष्टृत्व आहे व याला अनुक्रमणींत भार्गव म्हटलें आहे. ॠग्वेदांत सर्व ठिकाणीं नेम शब्दाचा ‘अर्ध’ असा अर्थ केला असून वरील सूक्तांत तिस-या ॠचेंत नेमॠषि असा अर्थ केला आहे. तरी तो भार्गव असल्याचा उल्लेख नाहीं.
कवि- हा. ९. ४७ या सूक्ताचा द्रष्टा असून याला भृगुपुत्र असे म्हटलें आहे. ॠग्वेदांत कवि पद पुष्कळ ठिकाणीं आहे परंतु याच बहुतेक कविःक्रांत दर्शी असाच अर्थ केला आहे. परंतु काहीं ठिकाणीं व्यक्तिवाचक अर्थ केला आहे तरी तो भृगुपुत्र या अर्थी नाहीं.
उशना- हा ९, ८७, ८८, ८९ या सूक्तांचा द्रष्टा आहे. याला कविपुत्र असें म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी ८. ७ सूक्तांतील ३ ॠचेंत व ॠग्वेदांत आणखी ब-याच ठिकाणी उशना काव्य (कविपुत्र) असा उल्लेख आहे.
वेन- हा सूक्तकार ९. ८५ या सूक्ताचा द्रष्टा असून याला भृगुगोत्रज म्हटलें आहे. ॠग्वेदांत वेन या नांवाच्या व्यक्तीचा उल्लेख नाहीं. सर्व ठिकाणीं वेन याचा कांतियुक्त असाच सायणांनी अर्थ केला आहे. तेव्हा वेन हा अनुक्रमणीं प्रमाणें भृगुगोत्रज असल्याचें ॠग्वेदावरून सिद्ध होत नाही.
पृथु- हा १९, १४८ या सूक्ताचा द्रष्टा असून त्याला वेनपुत्र म्हटलें आहे. व तो वेनपुत्र असल्याबद्दल वरील सूक्तांतील ५ व्या ॠचेंत उल्लेख आहे.
तान्व- ९. ९३ या सूक्ताचा हा द्रष्टा असून याला पृथोःपुत्र म्हटलें आहे. सदर सूक्ताच्या १५ व्या ॠचेंत पार्थ्य व तान्व यांचा उल्लेख आहे. पण त्यांत पितापुत्रसंबंध नाहीं.
कृत्नु- हा ८. ६८ या सूक्ताचा द्रष्टा. याला भार्गव असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत कृत्नु या नांवाच्या व्यक्तीचा उल्लेख नाहीं. वरील सूक्तांतील पहिल्याच ॠचेंत व ॠग्वेदांत आणखी दोन ठिकाणीं ‘कृत्नु’ हें पद आलें आहे. परंतु याचा ‘कर्ता’ असा अर्थ आहे. कृत्नु हा भार्गव असल्याचा उल्लेख नाहीं.
इट- याला १०, १७१ या सूक्ताचा द्रष्टा व भृगुपुत्र असें म्हटलें आहे. वरील सूक्तांत पहिल्याच ॠचेंत ‘इटतः’ असें पद असून त्याचा भाष्यकारांनीं इट या नामाची षष्ठी करून अर्थ केला आहे. तो सदर सूक्ताचा इट हा द्रष्टा हें गृहीत धरून केला असावा. इट नामक व्यक्तीचा ॠग्वेदांत आणखी कोठेंहि उल्लेख नाहीं. १०, १७१, १ येथेंहि तो भृगुपुत्र असल्याबद्दल उल्लेख नाहीं.
राम(जमदग्निपुत्र)- हा विकल्पानें १०. ११०, या सूक्ताचा द्रष्टा आहे. याला जमदग्निपुत्र असें म्हटलें आहे. सदर सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. ॠ १०. ३. ३, व ९३, १४, या दोन ठिकाणीं राम शब्द आला आहे. त्याचा अनुक्रमें कृष्णकर्ण व राम नावांचा राजा असा अर्थ केला आहे. एकंदरीत जमदग्निपुत्र राम याचा ॠग्वेदांत स्पष्ट उल्लेख नाहीं.