प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
ब्राह्मणग्रंथकालीन पक्षोत्पादक चळवळी- ब्राह्मण ग्रंथरचनाकाळी कर्माची मांडणी अधिकाधिक निश्चित होत होती. पण या बाबतीत निश्चय होण्यापूर्वी अनेक तटेंबखेडे झाल्याशिवाय निश्चय झाला नाही. आजच्या आपल्या दृष्टीस या तंटेबखेडयांची कारणें अतिशय क्षुद्र अशीं भासतात. पण प्राचीनांना ती तशी भासत होती किंवा नव्हती हें निश्चयानें सांगतां येत नाहीं. आपला संप्रदाय किंवा यज्ञ करण्याची रीत किंव रीतीतील अगदीं बारीकसारीक भाग हा इतरांपेक्षा शास्त्रोक्त ठरविणें आणि दुस-याचा निषेध करणे ही पद्धति त्यावेळच्या भिक्षुकीच्या धंद्यांत स्वतःच्या उत्कर्षासाठी वापरावी लागत असेल यांत शंका नाहीं.
ऐतरेय ब्राह्मणानें स्वमतस्थापनार्थ केलेली खटपट- तत्कालीन स्पर्धेच्या स्पष्टीकरणासाठी प्रथमतः यज्ञविषयक आपला संप्रदाय वाढविण्यासाठी दुस-या संप्रदायांच्या केलेल्या निषेधाची उदाहरणें जी आपणांस ऐतरेय ब्राह्मणात दिसतात ती प्रथमतः घेऊ.
मंत्र कोणते म्हणावे याविषयीं स्वमतस्थापन-
सोमयागांतील दीक्ष येष्टीमध्यें ‘आज्यभाग’ नामक आहुती देतांना होत्याने ज्या पुरोनुवाक्या म्हणावयाच्या त्या यज्ञ करणारा यजमान सोमयाग प्रथमच करीत असेल तर ‘त्वमग्ने सप्रथा’ ‘सौम यारते’ या म्हणाव्या व यज्ञ करणारा दुस-यांदा सोमयाग करीत असेल तर ‘अग्निःप्रत्नेन, सोमगीर्भिः’ या म्हणाव्या, अशी जुनी पद्धत. परंतु वरील दोन्हीहि प्रकार रद्द करून अग्निवृंत्रणि. त्वं सामांसि या म्हणाव्या असें ऐ. ब्रा. कार म्हणतात. (१. ४)
अग्निष्टोमामध्यें मरुत्वतीय शस्त्रांतील तीन धाय्या पठण करताना तिसरी ‘तान्वो महो’ ही म्हणावयाच्या पूर्व परिपाठ असलेला बंद होऊन पिन्वत्यपो हीः धाय्या पठण करण्याचा नवा प्रघात सुरू झाला. (३।१८)
अनुयाजांच्या महत्त्वाची स्थापना - प्रायणीया नामक इष्टीमध्यें (प्रधान यागापूर्वी व नंतर) करावयाच्या प्रयाज व अनुयाज नामक यागापैकी फक्त प्रयाज यागच करावे अशा चालीचा (प्रयाज व अनुयाज हे यजमानाचे प्राण व प्रजा असल्यामुळें अनुयाज याग न केल्यास संततिनाश होईल यासाठी) निषेध करून ऐ. ब्रा, कारांनी अनुयाजाची स्थापना कायम केली. (१.११)
पशुवैशिष्टयाची अडचण काढून टाकण्याची खटपट- अग्नीपोमीय पशु अग्नि व सोम या दोन देवतांसंबंधी असल्यामुळें पांढरा व काळा असा दोन रंगी असावा अशा पूर्वपद्धतीचा निषेध ऐ. ब्रा. कार दर्शवितात. (२.३)
यजमानास पश्विडाभाग देण्याची योजना- अग्नीपोमीय पशूसंबंधी इडा यजमानानें भक्षण करूं नये कारण ‘यजमानो वै. पशुः’ असें श्रृतिवाक्य असल्यामुळें यजमानानें पश्विडा खाणे म्हणजे स्वतःच्या मांसाचे भक्षण होईल. या पूर्वपक्षाचा निषेध करून यजमानाने पश्विडा अवश्य भक्षावी अशा मताचा स्वीकार (ऐ. ब्रा. २.३)
होते व सामक यांतील स्पर्धा व काव्याचें गाण्यापेक्षां महत्व कमी होऊ नये म्हणून होत्यांची खटपट- बहिप्पवमान नामक साम पटण करण्यास सामकांच्या बरोबर होत्यानेहि उत्तरवेदीजवळ बसावे, अशा एका मताचा, सामकांच्या मागें होता गेला असतां ॠचा सामानुगामी होतील म्हणून, निषेध (ऐ. ब्रा. २.२२)
पुरोडाश किती खाप-यांवर भाजावेत. - यज्ञांतील सुत्येच्या दिवशी सवनीय पुरोडाश भाजावयाचे ते प्रातःकालीन सवनांत आठ कपालांवर, माध्यंदिनसवनांत अकरा कपालांवर व तृतीयसवनांत बारा कपालांवर भाजावे असें प्राचीन मत. परंतु त्याचा निषेध व सर्वच अकरा कपालांवर भाजावे या मतांची स्थापना.
पुरोडाश तुपासहित भक्षण करावे- तुपाचें वज्र करून इंद्राने वृत्राला मारलें यासाठीं तूपरहित पुरोडाश भक्षावें, या मताचा निषेध व तुपासहित भक्षावें या मताची स्थापना. (३.२३)
हौत्रांत शाब्दिक ठावठिकीसाठीं खटपट- ‘ऐंद्रवायव’ नामक पात्रांतील सोमरसाची आहुति देतांनां अनुष्टुप छंदांतील पुरोनुवाक्या व गायत्री छंदात्मक याज्या म्हणावी अशा एका मताचा (ज्यास्त अक्षरांच्या छंदांतील पुरोनुवाक्या व कमी अक्षरांच्या छंदाची याज्या होते म्हणून) निषेध दर्शविला आहे. (२.२६)
होते व सामक यांतील स्पर्धा- यज्ञांतील सुत्येच्या दिवशीं सौम्य नामक चरूच्या आहुती दिल्यानंतर तो चरू (अवलोकनार्थ) प्रथम सामकांनां देण्याच्या पद्धतीचा निषेध व (होताच प्रथम सोम भक्षण करणारा असल्यामुळें) होत्यास प्रथम देण्याचा नवा परिपाठ स्थापन झाला. (३.३२)
ॠग्मंत्रांतील पाठभेदाविषयीं आग्रह- आतेपितः (ॠ २.३३,१) या ॠग्वेदांतील ॠचेच्या दुस-या अर्धाच्या आरंभी असलेल्या ‘अभि नो’ या पदांचा निषेध करून तेथें ‘त्वं नो’ या पदांचा पाठ करावा असा आग्रह (३.३४)
विशिष्ट देवतेचें महत्त्व कमी जास्त करण्याची खटपट- सुत्येच्या दिवशी आग्निमारूत नामक शस्त्रांत अहिर्बुघ्न्य देवतेसंबंधी शंसनानंतर ‘राका’ देवतेसंबंदी प्रथम शंसन करून नंतर देवपत्न्यासंबंधी करण्याच्या पद्धतीचा निषेध व अहिर्बुघ्न्य देवतेनंतर प्रथम देवपत्नी आणि नंतर राका देवतेसंबंधी शंसनाचा परिपाठ (३.३७)
छंद व सूक्तवैशिष्टय काढून टाकण्याची खटपट- आतिरात्र ॠतूंमध्यें आश्विन शस्त्र पठण करतांना (प्रातर नुवाकाप्रमाणें) अग्नि, उषा व आश्विन या देवतासंबंधी सूक्तें पठण केल्यावर सूर्यदेवतेसंबंधीहि सात छंदात्मक सूक्तें पठण करावी अशा एका पक्षाचा निषेध व सूर्यदेवतेसंबंधी चारच सूक्तें व ती कोणत्याहि छंदातील म्हणण्याचा परिपाठ. (४. १०)
अग्निहोत्र विधुरावस्थेंत चालवावें काय- अग्निहोत्र्याची बायको मेली असतां त्यानें अग्निहोत्र पुढें चालवूं नये असा एक पक्ष व बायको मेली असतां एकटयानेंच अग्निहोत्र चालवावें असा दुसरा पथ. याला कारण- संतति उत्पन्न करणारा, यजन करणारा व ब्रह्मचारी असणारा हे पितरांच्या ॠणांतून मुक्त झालेले असतात. म्हणून बायको नसली तरी पितरांच्या ॠणांतून मुक्त होण्यासाठी अग्निहोत्र चालू ठेवावें इतकेंच नव्हें तर सोमयाग व सौत्रामणीयागसुद्धां करावा (ऐ. ब्रा. ७.९).
क्षत्रियांनां सोमवानबंदी- विश्वंतर नामक राजानें श्यापर्ण नामक ब्राह्मणांना आमंत्रण न करितां यज्ञ आरंभिला. श्यापर्ण ब्राह्मणांनां हें कळतांच आमंत्रणावाचून ते यज्ञास आले व यज्ञिय वेदींत बसले. त्यांनां पाहतांच माझी अवज्ञा करणा-या व ब्राह्मणांनां उठवून लाव असें त्या राजानें दूतांस सांगितलें. तेव्हा “पूर्वी जनमेजयानें असाच कश्यपवंशज ब्राह्मणांना वगळून यज्ञ केला असतां कश्यपवंशज असितमृग ब्राह्मणांनी त्या यज्ञामध्यें येऊन तेथें अनुष्ठान करीत असलेल्या भूतवीर नामक ब्राह्मणांचा पराजय करून यज्ञांतील आर्त्विज आपणाकडे घेतलें. तर आपणां श्यापर्ण ब्राह्मणांत असा कोणी श्रेष्ठ वीर आहे काय ?” असें ते मोठयानें बोलले. त्यावेळीं त्याच्यापैकी मार्गवेय राम हा उभा राहिला व मी तसा वीर आहे असें म्हणून पुढें तो विश्वतरांस म्हणाला की, आम्ही यज्ञानुष्ठान जाणणारे ब्राह्मण असतांना तूं आम्हांस कसा उठवून लावतोस? राजानें तूं कसा अनुष्ठानज्ञ आहेस असें विचारलें असता राम सांगतो- इंद्रानें पाच प्रकारचे अपराध केल्यामुळें त्याला कोणी सोम अर्पण करीनात. व तेव्हांपासून सर्व क्षत्रियजातीनें सोमपान वर्जिले. नंतर इंद्रानें मात्र स्वसामर्थ्यानें त्वष्टयाच्या घरी सोमपान केलें. इतर क्षत्रियांमध्यें इंद्राप्रमाणें सामर्थ्य नसल्यामुळें सोमपान त्यांनां श्रेयस्कर नाहीं; व क्षत्रियानां सोमाच्या ऐवजी जे पदार्थ सेवन करावायचे ते आम्हांस माहीत असतां तूं यज्ञातून कसा घालवून देतोस? नंतर ते क्षत्रियांनी सेवन करावयाचे पदार्थ तुला माहीत आहेत काय असें विचारल्यावरून राम सांगतो. यज्ञानुष्ठान न जाणणारे असे कांही ॠत्विज क्षत्रियांना सोमभक्षण करण्यास सांगतात पण त्यामुळे त्यांचे क्षत्रियत्व नाहीसे होऊन प्रतिग्रह, याजन, याचकवृत्ति हे गुण त्यांच्या अंगी जडतात. तसेच कोणी क्षत्रियांना दधिभक्षण करावयास सांगतात त्यामुळे त्यांच्या अंगी वैश्यगुण शिरतात; कोणी उदय भक्षण करण्यास सांगतात त्यामुळे त्या क्षत्रिय राजांच्या अंगी अत्यंत हीन असे शूद्रांचे गुण वास करूं लागतात. यासाठी क्षत्रियांनां सोम, दहि, अथवा उदक हे भक्ष श्रेयस्कर नाहीत. क्षत्रियांना वडाच्या खांद्याच्या पासून फुटणा-या पारंब्यांची अग्रें, व उंबर, पिंपळ आणि पिंपरणी या वृक्षांची पळे यांचा कुटून काढलेला रस हा भक्ष अत्यंत श्रेयस्कर आहे असें रामानें राजास सांगितलें. नंतर हा भक्षच क्षत्रियांनां श्रेयस्कर असल्याचें निरनिराळया ॠषींनीं निरनिराळया राजांनां सांगितलें. (ऐ. ब्रा. ७. २६)