प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
निरनिराळया गोत्रीयांची निरनिराळीं आप्री सूक्तें - यासंबंधी आश्वलायनसूत्र पुढील प्रमाणें आहेः- समिद्धो अग्निरिति शुनकानां, जुषस्वनः समिधमिती वसिष्ठानां, समिद्धो अद्येति सर्वेपां. या तिस-या सूत्राचा वृत्तिकार वसिष्ठ शुनकाशिवाय असा अर्थ करतात पण तो जुना आहे असें म्हणवत नाही. सूत्रांत पुढें यथर्पिवा असें एक सूत्र आहे त्यांवर भाष्य करतांनां वृत्तिकार शौनकोक्त श्लोकाचा आधार घेऊन भाष्य करतात कीं, स्वीयर्पिनामधेयस्यान गुणाऽऽप्र्याःकर्तव्याः
आश्वलायन सूत्रावरील वृत्तीप्रमाणें आप्री सूक्तें आणि त्यांचा उपयोग येणें प्रमाणें-
गोत्रनाम | सूक्तप्रतीक | ॠ.स्था. | ॠचा | सूक्तद्रष्टा |
कण्व | सुसमिद्धी नं० | १ १३ | १२ | मघतिथि |
आंगिरस | समिध्दे अग्ने० | १. १४२ | १२ | दीर्घतमा |
अगस्ति | समिध्दे अद्य० | १.१८८ | ११ | अगस्त्य |
शुनक | समिध्दे अग्नि० | २.३ | ११ | गृत्समद |
विश्वामित्र | समित्समित्० | ३.४ | ११ | विश्वामित्र |
अत्रि | ससुमिद्धय० | ५.५ | ११ | आत्र |
वसिष्ठ | जुपत्सव नं० | ७. २ | ११ | वसिष्ठ |
कश्यप | समिध्दे विश्वत | ९. ५ | ११ | असितदेवल |
वघ्ऱ्यश्व | इमां में अग्ने० | १०.७० | ११ | सुमित्र |
भृगु | समिध्दे अद्य० | १०.११० | ११ | भार्गव, ज० |
आप्रीसूक्त पशुयागांत गोत्राप्रमाणें भिन्न म्हणावें या नियमाला सूत्रकार एक अपवाद प्राजापत्ये तु जामदग्न्यः सर्वेषां हा सांगतात.
थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे हें सर्व भेद सूत्रकालीन आहेत. वेदकालीं गोत्र नव्हतीं व गोत्रानुसार आप्रीसूक्त किंवा देवता यांचे भिन्नत्व स्थापित झाले नव्हतें.
मंत्रद्रष्टया ॠषीच्या संबंधानें आपणांस असें दिसतें कीं, प्रत्यक्ष ॠग्मंत्रांत कुलकल्पनेव्यतिरिक्त गोत्रकल्पनाच नसल्यामुळें अमुक ॠषी अमुक गोत्राचें हें सापडणें शक्य नाहीं. परंतु जे थोडेसे पितृविषयक उल्लेख सांपडतात त्यांचा उपयोग त्यांस विशिष्ट गोत्रांत बांधण्याकडे सर्वानुक्रमणीकारांनी कसा केला आहे तें मागील कोष्टकांत दाखविलेंच आहे. ब्राह्मणग्रंथांत आप्रीसूक्तविषयक विवेचन करितांना प्रवरणार्ह ॠषित्रयाची कल्पना आली आहे. तथापि तेवढयावरून मंत्रवक्त्या ॠषींच्या ठायी गोत्रकल्पना होती असें सिद्ध होणार नाही. ब्राह्मणग्रंथांचा काल म्हणजे बृहद्यज्ञांचा काल आणि बृहद्यज्ञांचा काल म्हणजे देश्यांच्यावर मांत्रसंस्कृतीच्या संस्था दडपण्याचा काल. या कालांत देश्यांची विद्या स्वीकारणे किंवा आपली विद्या देश्यांस देणें या गोष्टी होतें. अघ्शर्यू उद्गाते करीत होते. केवळ ते विद्याच घेत होते असें नाहीं ते देश्यांच्या चालीरिती देखील स्वीकारीत होते. जर देश्यांमध्यें गोत्रें असली तर त्या गोत्रांचा यज्ञसंस्थेशी संबंध जोडण्याचे काम देखील अवश्य होतें. दर असें असणें शक्य आहे की देश्यांमध्यें गोत्रे आहेत असें पाहून त्यांची गोत्रसंस्था मांत्रसंस्कृतीच्या लोकानी घेतली असावी. त्या गोत्रांचा उपयोग काय करावयाचा याविषयी मात्र त्यांचा निश्चय तात्कालिक झालेला दिसत नाहीं. ॠग्मंत्रांत जशी गोत्रकल्पना नाहीं तशीं प्रवरकल्पनाहि नाहीं. तसेंच ॠग्मंत्रांत ज्या सत्रकल्पनेच्या आश्रयानें श्रौतसूत्रकारांनीं गोत्रप्रवरकल्पनेची मांडणी केली आहे त्या सत्रांचाहि उल्लेख नाहीं. जे सत्राविषयक उल्लेख आलेले आहेत त्यांचा अर्थ अनेक व्यक्तींची एकत्र स्थिति या पलीकडे पोहोचूं शकत नाहीं.
ॠग्वेदांतच सत्रें नाहींत व यजुर्वेदाच्या अनेक शाखांतहि सत्रें नाहींत तर सत्रें होती तरी केव्हा? सत्रांच्या भरभराटीचा काल असा वैदिकवाङ्मय वाचल्यास कोणताच दिसत नाहीं. हौत्राच्या ॠचेंत सत्र शब्द ऐकूं येत नाहीं आणि ब्राह्मणांमध्यें जर सत्रें पुसटलेली दिसतात तर सत्रें वैदिक पंरपरेत मूळचीं नव्हतीं पण वेदबाह्य परंपरेतून निघून वैदिकांनीं ती मान्य केली असावीं असें म्हणण्यास काय हरकत आहे?