प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

गोत्रें व श्रौतधर्म - गोत्रांचा वैदिक धर्मसंस्थेत महत्त्वाचा संबंध दिसत नाहीं. गोत्रें जर मात्रसंस्कृतीच्या लोकांची असतीं तर त्यांचा ॠग्मंत्रदृष्ट श्रौतकर्मात बराच संबंध असता. गोत्रांचा संबंध यज्ञसंस्थेत अत्यंत बेताचा दिसतो. ॠग्वेदांत त्यांचा स्पष्ट उल्लेखहि दिसत नाहीं. गोत्र प्रवरकल्पना ॠग्वेदोत्तर वाङ्मयांत दिसतात आणि त्यांचे अस्तित्त्व दोन कारणांमुळे संभवतें. एकतर यज्ञसंस्थेबरोबर गोत्रप्रवरविचार वृद्धिंगत झाला असावा किंवा मांत्रसंस्कृतीबाहेरील लोकांत गोत्रसंस्थेचे अस्तित्त्व असावें आणि गोत्रांस धर्मत्व देण्यासाठी त्यांचा यज्ञसंस्थेशीं मुद्दाम कसातरी संबंध जडविला असावा. या दोन कल्पनांपैकी दुसरी कल्पना म्हणजे गोत्रांचा यज्ञसंस्थेंशी मुद्दाम संबंध जोडला असावा हें जास्त शक्य वाटतें. गोत्रांचा श्रौतधर्मात जो फारच थोडका संबंध आहे तो इतकाच कीं आप्रीसूक्तें होत्यानें कोणतीं म्हणावयाचीं हें यजमानाच्या गोत्रावरून किंवा प्रवरावरून ठरवावें लागतें.

पशुयागामध्यें पशूच्या वपेचा याग होण्यापूर्वी प्रयाज नामक देवतांना उद्देशून याग व्हावयाचा असतो. (या देवता अकरा किंवा बारा आहेत). या यागांत प्रत्येक देवतेसंबंधी यागासांठी स्तावक पठण करण्यास मैत्रावरूणानें प्रैप दिल्यावर होत्यानें याज्यारूप ॠचा पठन करावयाची असतें. अशा अकरा अथवा बारा ॠचांच्या सूक्तास आप्री सूक्त अशी संज्ञा आहे. हीच आप्री सूक्तें होत्यानें कोणती म्हणावीं हें यजमानाच्या गोत्रावरून किंवा प्रवरावरून ठरतें.

वरील अप्रीमध्यें कोणत्या देवतांनां आहुती द्यावयाच्या या संबंधाने फरक आहे. त्याविषयी विधिनिषेधात्मक नियम आहेत ते असे. ज्या देवतांनां आहुती द्यावयाच्या त्यांपैकी दहा देवता सर्वगोत्रीयांना सारख्या आहेत. कित्येक गोत्रांचे लोक आणखी दान देवतांस आहुती देतात व कित्येक या दोहोंपैकी एकीस देतात व एकीस वगळतात. या दोन वादग्रस्त देवत म्हणजे नराशंस व तनुनपात् या होत. वसिष्ठ अत्रिवध्यक्ष व गुत्समद या गोत्राचे लोक तनुनपात या देवतेस आहुति देत नाहींत आणि विश्वामित्र, अगस्त्य, कश्यप, जमदग्नि या गोत्रांचे लोक नराशंस देवतेस आप्रीपूर्वक आहुति देत नाहींत; व काण्व आणि आंगिरस हे या दोन्ही देवतांनां आहुति देतात. देवता कोणती घ्यावी यासंबंधानें आणखी एक नियम असा आहे की क्षत्रियानी नराशंस देवताच घ्यावी. अशा प्रकारची देवता घेण्याचा व टाकण्याचा प्रसंग फक्त पशुयागांतच येतो असें नाहीं तर पंधरा दिवसांनी करावयाचा दर्शपूर्णमास यागा (इष्टी) तील प्रयाज यागांत देखील देवताग्रहण यजमानाच्या गोत्रावरून ठरत असतें.