प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
गोत्राचा वेदाध्यायाशीं संबंध - हा जुळविण्यास निरनिराळया गोत्रांचे जे लोक झाले ते कोणी होते, कोणी उद्गाते वगैरे होत. आणि त्यांचा अत्यंत प्राचीनांशी संबंध लावावयाचा झाल्यास तो सप्तर्षीमार्फत लावावा लागला. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्यें बराच काळ गेल्यानंतर गोत्रास काहींतरी कारणांमुळे सहेतुकता उत्पन्न झाली.स्थानिक लोकांत देवकांसारखे समुच्चय होते. ते आपसांत लग्ने करीत नव्हते आणि मात्रसंस्कृतीच्या लोकांत अगदी जवळ लग्न करणें ही गोष्ट प्रिय नव्हती व सात पिढयांचा हिशोब ठेवणें शक्य नव्हतें, तर आपण गोत टाकावें म्हणजे आपण ब-याच पिढया टाकल्या असें होईल अशा त-हेची कल्पना उत्पन्न होणें स्वाभाविक आहे. वाटेल त्या ॠषींचे वरण करण्याचें सामर्थ्य जसजसे कमी होत गेले असेल तसतसे प्रवरहि अर्थात वंशपरंपरागत बनले. कित्येकांत असेहि झाले असेल की, गोत्रे ज्या वेळी नवीनच असतील त्यावेळेस सात पिढया टाकावयाच्या व तेव्हाच सातांची भरती करण्याकरितां प्रवर घ्यावेत ही कल्पना रूढ झाली असेल. प्रवरच लग्नव्यवहरात वगळले म्हणजे सात पिढया वगळळयासारखे खात्रीने होईल असे प्राचीनकाळीं लोकांस वाटू लागून गोत्राबाहेर प्रवरहि वगळण्याची चाल प्रचारांत आली असेल असें वाटतें.
ब्राह्मण्याच्या इतिहासांत ॠग्वेदी व यजुर्वेदी असें जें वर्गीकरण झालें ते कार्यभिन्नत्वामुळें झालें. पण पुढें शाखा व सूत्रे जी निघाली ती पक्षभेदरूपी चळवळींमुळे निघाली. त्या चळवळीचा साग्र इतिहास येथे देण्यास अवकाश नाहीं. पण त्या चळवळीचें स्वरूप मात्र आपणांस ब्राह्मणग्रंथांतून जागोजाग दिसतें ते उदाहरणांसाठी येथे देतो.