प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
गोत्रविशिष्ट श्रौतधर्माचें अर्वाचीनत्व- आतां प्रश्न असा उपस्थित होतो कीं, आप्रीसूक्त किंवा दवतापरिग्रह याचा यजमानाच्या गोत्रांशी जोडलेला संबंध कितपत जुना आहे. आप्रीच्या निवडीपेक्षां देवतापरिग्रहासंबंधी प्रश्न जास्त जुना दिसतो.
आप्रीसूक्तें गोत्रभेदाप्रमाणें म्हणावी हें तत्त्व ब्राह्मणकाली प्रचारांत येऊं लागलें होतें असें दिसतें. (ऐ. ब्रा.२.४). परंतु तें फार जुनें असेल असें वाटत नाहीं. कारण आप्रीसूक्तें हा विषय हौत्राचा असून हौत्रविषयाचें उपबृंहण करणारे ग्रंथ जे ब्राह्मणें व सूत्रें त्यापूर्वीच्या ग्रंथांत म्हणजें यजुर्वेदांत ज्यामध्यें वादविषयक प्रयाज यागाचा संबंध येतो अशा दर्शपूर्णमास व पशु या दोहोंचेहि हौत्र पठित आहे. (ज्याला आज याजुष हौत्र असें म्हणतात) व त्यांत आप्री सूक्ते गोत्रपरखें वेगळीं सांगितली नसून एकच सांगितले आहे.सूत्रे व त्यावरील टीकाकार यांनी मांत्र याविषयी जास्त विवक्षा केली आहे. गोत्रपरत्वे आप्रीग्रहणाची चाल अलीकडील ठरविण्यास यांतच आणखी एक पुरावा असा आहे की, यजुर्वेदांतील हौत्रांत जें आप्रीसूक्त सांगितलें आहे त्याची परंपरा मोडतां येत नसल्यामुळें सूत्रकारांनी ज्या कोणास गोत्रपरत्वे निरनिराळी आप्री सूक्तें घ्यावयाची नसतींल त्यांना विकल्पानें वरील (याजुष हौत्रांतगत) सूक्त घ्यावें असें सांगितलें आहे.