प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
गोत्रें - गोत्र ही संस्था प्राचीनकाळीं काय असावी हें निश्चयानें सांगतां येत नाहीं. गो म्हणजे भूमि आणि त्र म्हणजे संरक्षक; म्हणजे गोत्र म्हणजे भूमिसंरक्षक वर्ग असा गोत्र या शब्दाचा अर्थ करून गोत्र हा शासनविषयक विभाग असावा अशी कल्पना व्यक्त झाली आहे; आणि दुस-याच्या गोत्रांतील मुलगी पळविणें हे मर्दाचें काम या मुळें गोत्रबाहेर लग्न करण्याची रीत उत्पन्न झाली असावी असें गोत्राबाहेर लग्न लावण्याचे स्पष्टीकरण करण्यांत आलें आहे. या प्रकारच्या स्पष्टीकरणाच्या ग्रहणास अडचण येते ती ही की गोत्र आणि विवाहसंस्थेचा संबंध प्राचीनकाळी नव्हता. हा संबंध केव्हां उत्पन्न झाला आणि कोणत्या प्रयोजनामुळें झाला हा ब-याच उत्तरकालीन इतिहासाचा प्रश्न आहे. वेदकाळांत गो म्हणजे जमीन आणि त्र म्हणजे संरक्षक असा अर्थ असणे शक्य आहे आणि त्यामुळे गोत्र ही एक राजकीय संस्था असावी हेंहि शक्य आहे.परंतु ती तशी होतीच हेंहि आज निश्चयानें सांगतां येत नाहीं.
गौत्र हा शब्द ॠग्वेदामध्यें इन्द्राच्या पराक्रमांच्या वर्णनांत अनेक वेळां येतो. या शब्दाचा अर्थ रॉथ मोठा असा करतो तर गेल्डनेर गाईचा कळप असा करतो. मॅकडोनेलच्या मतें वरील दुस-या अर्थावरून पुढें या शब्दास उत्तरकालीन वाङ्मयांत जो कुटुंब किंवा गोत असा अर्थ आला आहे त्याची उपपत्ति लावणें सोपें होतं. छान्दोग्य उपनिषदांत (४, ४,१) कुटुंब या अर्थी गोत्र शब्द आलेला आहे.
दुस-याच्या टोळींतील मुलगी चोरून आणावयाची आणि स्वतःच्या टोळींतील मुलगी करणें म्हणजे नामर्दपणा होय. या त-हेच्या कल्पनेचा मात्र संस्कृतीच्या लोकांतील बहिर्विवाह स्पष्ट करण्यास उपयोग होत नाहीं; कां कीं सगोत्र विवाह वेदांत तर बंद केल्याचा उल्लेख नाहीं, बौधायनासारख्या जुन्या स्मृतींतहि त्यास आडकाठी नाहीं, आणि वसिष्ठाच्या धर्मसूत्रांत देखील संगोत्रविवाह करण्यास आडकाठी जरी घातली आहे तरी बापाच्या बाजूनें पांच पिढया व आईच्या बाजूनें तीन पिढया सोडून लग्न करावें असें सांगितलें आहे.
ज्या काहीं स्मृतीमधून सगोत्र किंवा सप्रवर विवाह यांचा निषेध केला असतो त्याबरोबरच बापाकडच्या सात पिढया टाकाव्या व आईकडच्या पांच पिढया टाकाव्या असाहि उल्लेख करण्यांत येतो. गोत्रसंस्था जर प्राचीन नव्हे तर आपणांपुढे प्रश्न एवढाच उरतो की ही समाजांत शिरली असेल तरी केव्हां आणि वर धर्मशास्त्रकारांनी दिलेले दोन भिन्न नियम भिन्न काळीं उपस्थित होऊन पुढें ते दोन्ही एकत्र मांडले गेले असे तर नसेल ना? सात पिढयांपर्यंत अगोदरच नातेवाईकांचा हिशोब ज्यांस माहीत आहे अशा व्यक्ती विरळा. पांच पिढया आईकडच्या टाकाव्या हा नियम तर ब-याच जातींनी धाब्यावर बसवला आहे. दक्षिणेकडे अनेक जातींत मामाची मुलगी तर लग्नांत अधिक पसंत केली जाते. बापाकडून सात पिढया टाकाव्या हा नियम घेतला तर तो अनवश्यक ठरतो; कारण गोत्राबाहेर जर लग्न करावायचें तर सात तरकाय पण त्यानें शेंकडो पिढया वगळल्या जातात. वसिष्ठादि जुन्या स्मृतिकारांनी हे दोन्ही नियम एकसमयावच्छेदेंकरून मांडले असूनहि त्यांत दिसून येणारी परस्परविरुद्धता ओळखून मनुस्मृतीनें फक्त गोत्रांचाच नियम ठेविला आहे व बापाकडील लसात पिढयांचा वगळला आहे. मनुस्मृतीचा “असपिंडाच या मातृः असपिण्डाच या पितुः” हा पाठ घेतला तर सपिण्डाबाहेरचे सगोत्री विवाह्य ठरतील. विवाहविषयक नियम देणारे धर्मसूत्रकारांच्या पूर्वीचे ग्रंथकार म्हणजे गृह्यसूचकार हे होत. ब-याचशा गृहसूत्रकारांनीं तर गोत्रांचा मुळीच आग्रह धरिला नाहीं.
सेनार्ट हा सगोत्रविवाहाची निषिद्धता व सवर्णविवाहाची प्रशस्तता मूलग्रहकालापर्यंत नेतो. परंतु असगोत्र विवाहाची चाल इण्डोयूरोपीय कालापासून अस्तित्वांत असावी असें समजण्यास साधन जें भारतीयांतील गोत्रप्राचीनता तेंच खरें दिसत नाहीं. शतपथ ब्राह्मणात (१.८,३,६) दोन्ही बाजूंनी तिस-या किंवा चवथ्या पिढीच्या आंतच विवाह करणें संमत असल्याचा उल्लेख आहे. सायणाचार्याप्रमाणें काण्व तिस-या पिढीशी व सौराष्ट्र चवथ्या पिढीशी विवाह करतात. या उदाहरणास वज्रसूचीवरील टिकाकार काण्वाबरोबरच आंध्र व दाक्षिणात्य यांचा उल्लेख करितात. वाजसनेयीशाखांय ब्राह्मणांत मामेबहिणीशीं विवाह करणें निषिद्ध आहे एवढेंच नव्हे तर मामाचे गोत्रहि वगळावयाची चाल हे. वरील ग्रंथांत चुलत बहिणीशी विवाह करण्यास जो सांप्रत निषेध मानतात त्याचा कोठे उल्लेख आढळत नाहीं. शुनःशेपाच्या कथेवरून व गुत्समद हा आंगिरस असून पुढें भार्गव झाला यावरून गोत्र बदलणें त्यावेळीं शक्य होतें हें स्पष्ट दिसतें. गोत्र ही संस्था फार प्राचीन नाहीं ही गोष्ट गोत्रें व श्रौतधर्म यांचा संबंध लक्षांत घेतला असतां दिसून येईल. असें मात्र शक्य आहे की सूतसंस्कृतीच्या आर्यन् लोकांत गोत्रांचे म्हणजे बहिर्विवाहाचे देवकरूपाने अस्तित्त्व असेल व रोमन लोकांत “जेन” नांवाच्या समुच्चयाबाहेर लग्न करण्याची पद्धत होती. जर इंडोयूरोपीय काळात बहिर्विवाह होत असेल तर मधल्या मात्रसंस्कृतीच्या लोकांत तो तात्पुरता नष्ट झाला असला पाहिजे असें वाटतें. जेव्हां त्यांत गोत्रसंस्था निर्माण झाली तेव्हां त्यांचा प्रवराशी संबंध जोडला गेला, आणि वेदविरुद्ध पण वैदिक परंपरेवर रचलेली अशी समाजव्यवस्था प्रचलित झाली हें पुढील विवेचनावरून कळून येईल.