प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

गोत्रमंडळांतील ॠषीचें संप्रदायांत स्थान- गोत्रमंडळामुळें प्राधान्य पावलेल्या ॠषीचें संप्रदायांच्या इतिहासांत स्थान येणेंप्रमाणें दर्शवितां येईल.

गोत्रमंडळांत दृष्ट होणारे संप्रदाय व तैत्तिरीय शाखेंत वर्णिलेले संस्थास्थापक समकालीन होत. या दोहोंचा उपयोग पुढील सप्तसंस्थाकारांनी केला.
प्रवराचें ॠषी आणि गोत्रमंडळाचें ॠषी यांत कांही ॠषी एक दिसतात.

प्रवरांचा उल्लेख सत्रप्रकरणांत व सत्रांतील आप्री सर्वाच्या सारख्या असाव्यात या हेतूने आला आहे.

आप्री गोत्रावरून आखलेल्या आहेत. पण गोत्रे हजारों. त्यांचा थोडक्या आप्रीसाठीं उल्लेखिलेल्या गोत्रांशी संबंध जोडण्यासाठी काहींतरी योजना हवी होती म्हणून सर्व गोत्रांचा विशिष्ट आप्रीशीं संबंध जोडण्याकरिता प्रवरांची यादी तयार होणें अवश्य होतें. ॠग्वेदांतील अनेक ॠषी कांही विशिष्ट कुलांत घालण्याचा प्रयत्न कसा झाला हें मागें दाखविलेंच आहे.  

ही योजना भिक्षुकी स्वरूपाची आहे म्हणजे भिक्षुकी कारणाकरितां काल्पनिक इतिहास तयार होण्याचा संभव येथें आहे. म्हणजे ब-याचशा लोकांस त्याच्या गोत्रप्रवर साहाय्यावरून एका कुलांत दडपण्याची खटपट यांत दिसते.

तथापि काहीं मूळची परंपरा असल्याशिवाय आणि ती सर्वमान्य असल्याशिवाय नवीनस त्यात दडपता येणार नाहीं. यावरून असें असणें शक्य आहे की काहीं आर्षेययुक्त गोत्रें व त्यामुळें कांही परस्पर संबंध मूळचेच निश्चित झाले असावेत.

प्रवर म्हणून जी आर्षेय परंपरा प्रत्येक उपासर बाळगीती यज्ञयोजकांत व इतर सामान्यांतहि तयार झाली असावी.

गोत्रें स्थापित होणें ही आडनावें स्थापन होण्याप्रमाणेंच स्वाभाविक क्रिया आहे आणि ‘अपत्य पौत्रप्रभृति गोत्र’ असा पाणिनीने जो नियम दिला आहे तो कुलनाम निर्देशाच्या स्पष्टीकरणास योग्य आहे. कुलांनां नांवे कशीं पडली एवढें स्पष्ट करावयाचें असेल तर पाणिनीचा हा नियम ते स्पष्ट करील. तथापि आपणांस स्पष्ट करावयाची गोष्ट आडनांवस्वरूपी गोत्रें कशीं पडली एवढाच नसून बहिर्विवाहात्मक संस्था उत्पन्न कशी झाली आणि तिचा गोत्रांशी संबंध कसा जोडला गेला आणि गोत्रांचा प्रवरांशी संबंध कसा जोडला गेला इत्यादि प्रश्न आपणांस विचारणीय आहेत.