प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

कुलविरहित

पुढील सूक्तकाराचे कुलसंबंध ॠग्मंत्र, सर्वानुक्रमणी अथवा बृहद्देवता यांत आढळत नाहींत.
(१) ॠग्मंत्रसिद्ध वंशसंबंध- त्रिवृष्णाचा मुलगा त्रैवृष्ण. पुरुकुत्साचा मुलगा त्रसदस्यु. भरताचे मुलगे देवश्रवा व देववात. ॠष्टिषेणाचे मुलगे देवापि व शंतनु. अथर्वन्चा मुलगा बृहद्दिव. विवस्वान्ची मुलें यमी व यम. पिजवनाचा वंशज सुदास. प्लयोगाचा मुलगा आसंग. वृषागिराचे मुलगे ॠज्राश्च. अंबरीष, सहदेव, भयमान, सुराधस्.
(३) सर्वानुक्रमणीसिद्ध वंशसंबंध- भरताचा मुलगा अश्वमेध. कद्रूचा मुलगा अर्बुद. भलंदनाचा मुलग वत्सप्री. वृषागिरपुत्र अंबरीष व त्याचा मुलगा सिंधुद्वीप. लुश याचा मुलगा धनाक. इलुषाचा मुलगा कवष. रोहिदश्वाचा मुलगा वसुमना. विवस्वान्पुत्र यम व त्याचे मुलगे मथित, संकुसुक, शंख दमन, देवश्रवस्, उशीनराचा मुलगा शिबि. इंद्राचे मुलगे वसुक्र व विमद. दिवोदसाचा मुलगा परुच्छेप व त्याचा मुलगा अनामत. अथर्वन्चे मुलगे बृहद्दिव व भिषकू. सोमाचा मुलगा बुध. प्रजापतीचा मुलगासंवरण. अजीगर्ताचा मुलगा शुनःशेप. शिलूषाचा मुलगा कुल्मल बर्हिष. मनूचे नाभानेदिष्ट व शार्यात युवनाश्वाचा मुलगा संघाता. इलाचा मुलगा पुरूरवा व पुरूरव्याची बायको ऊर्वशी. भर्म्यश्वाचा मुलगा मुद्गल व मुद्गलाची बायको मुद्गलानी. सुवेदसचा मुलगा शिरीष. वंदनाचा मुलगा दुवस्यु.
त्र्यरुण- ५. २७ या सूक्ताचा द्रष्टा. याला त्रैवृष्णि- त्रिवृष्णिपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या पहिल्या ॠचेंत त्रैवृष्ण- त्र्यरूण असा उल्लेख आहे व त्र्यरुणाचा उल्लेख याच सूक्तांत २ व ३ ॠचांमध्यें आहे.
त्रसदस्यु- ४. ४२ व ५. २७ या सूक्तांचा द्रष्टा. याला पौरुकुत्स्य असें म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ३ -या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु तो पौरुकुस्त्य असल्याचा नाहीं. ॠग्वेदामध्यें त्रसदस्यूचा उल्लेख पुष्कळ ठिकाणीं आहे, व तो पुरुकुत्सपुत्र- त्रसदस्यु असा ५. ३३, ८.८. १९, ३; ७ १९, ३६ या तीन ठिकाणीं आहे. ४. ४२ या सूक्ताच्या ९ व १० ॠचांत याचा उल्लेख असून याची आई पुरुकुस्तानी इचाहि उल्लेख आहे.
अश्वमेध- ५. २७ या सूक्ताचा हा द्रष्टा आहे. याला भारत- भरतपुत्र असें म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ४, ५,व ६ या ॠचांत अश्वमेधाचा उल्लेख आहे. परंतु तो भरतपुत्र असल्याबद्दल नाहीं.
देवश्रवा, देववात- ३. २३ या सूक्ताचे हे दोघे द्रष्टे. यांनां भारत-भरतपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या २ व ३ या ॠचांत भारत देवश्रवा देववात. असा उल्लेख आहे. ॠग्वेदांत देवश्रवा, देववात यांचा व्यक्तिवाचक उल्लेख आणखी आढळत नाहीं.
ॠज्राश्व, अंबरीष, सहदेव, भयमान, सुराधस्- १. १०० या सूक्तांचे द्रष्टे. यांचा सदर सूक्ताच्या १७ व्या ॠचेंत एकाच ठिकाणीं उल्लेख आहे. यांनां वृषागिरपुत्र असें म्हटलें आहे. वरील पांचहि सूक्तकारांचा एकत्र असा उल्लेख ॠग्वेदांत आणखी आलेला नाहीं. एकटया ॠज्राश्वाचा उल्लेख १. १००, १ १;११६,१६,११७, १७;१८ या ॠचामध्ये आहे.
देवापि- १०. ९८ या सूक्ताचा द्रष्टा. याला आर्ष्टिषेण ॠष्टिषेणपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ५, ६ व ८ या ॠचांमध्यें आर्ष्टिषेण या नांवाचा उल्लेख असून तो देवापि याचा बाप असावा असें दिसतें.
अर्बुद- १०. ९४ या सूक्ताचा द्रष्टा. याला काद्रवेय असें म्हटलें आहे. पंतु ॠग्वेदांत तसा उल्लेख नाहीं. ॠग्वेदांतील अर्बुद याचा काही ठिकाणी असुर व काहीं ठिकाणी सायणांनीं मेघ असा अर्थ केला आहे व ८. ४५, २६ या ॠचेंतील ‘कद्रुवः’ या पदाचा कद्रु ॠषिसंबंधी असा अर्थ केला आहे. परंतु त्याचा आणि अर्बुदाचा संबंध नाहीं.
वत्सप्रि- ९. ६८ व १०. ४५ या सूक्तांचा द्रष्टा. याला भालंदन- भलंदनपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदात वत्सप्रीचा अथवा भलंदनाचा उल्लेख नाहीं.
सिंधुद्वीप- १०.९ या सूक्ताचा द्रष्टा. याला अंबरीष पुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
विवस्वान् - १०. १३ या सूक्ताचा द्रष्टा. याला अदितिपुत्र म्हटलें आहे. १०. १४, ५;१७,२ या ठिकाणीं विवस्वानाचा उल्लेख आहे. परंतु तो अदितिपुत्र असल्याचा नाहीं.
यम- १०. १४ या सूक्ताचा द्रष्टा. याला विवस्वानपुत्र म्हटलें आहे व तसा उल्लेख सदर सूक्ताच्या १ व ५ या ॠचांत आहे.
यमी-१०.१० या सूक्ताची द्रष्टी. हिला विवस्वत् कन्या असें म्हटले आहे. हिचा उल्लेख. सदर सूक्तच्या १० व्या ॠचेंत आहे व तो ती यमाची भगिनी असल्याबद्दल आहे. यमी विवस्वानाची कन्या असल्याचा प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी यम हा विवस्वानपुत्र असून यमी त्याची भगिनी असा उल्लेख असल्यामुळें यमीला विवस्वान्कन्या म्हणावयास हरकत नाहीं.
शंख- १०. १५ या सूक्ताचा द्रष्टा. याला यमपुत्र असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाही.
संकुसुक- १०. १८ या सूक्ताचा द्रष्टा. याला यमपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
दमन- १०. १६ या सूक्ताचा द्रष्टा. याला यमपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
देवश्रवा- १०. १७ या सूक्ताचा द्रष्टा. याला यमपुत्र म्हटलें आहे. परंतु ॠग्वेदांत तसा उल्लेख नाहीं.
मथित- १०. १९ या सूक्ताचा द्रष्टा. याला यमपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत तसा उल्लेख नाहीं.
विमद- १०. २० ते २६ या सूक्तांचा द्रष्टा. या इंद्रपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी १०. २०, १०; २३, ६७;२४,४ या ठिकाणीं व ॠग्वेदांत आणखी १.५१,३;११२,९;११६,१;११७,२०;८. ९, १५;१० ३९, ७;६५, १२, इतक्या ठिकाणीं आहे. परंतु तो इंद्रपुत्र असल्याचा उल्लेख नाहीं.
वसुक्र- १०. २७ ते २९ या सूक्तांचा द्रष्टा. याला इंद्रपुत्र म्हटलें आहे. याचा ॠग्वेदांत उल्लेख नाहीं.
कवष- १०. ३० ते ३४ या सूक्तांचा द्रष्टा. याला इलुषपुत्र असें म्हटलें आहे. कवषाचा उल्लेख ॠग्वेदांत एकदांच ७, १८, १२ या ठिकाणीं असून तो ॠषि नसावा असें दिसतें; कारण त्या ठिकाणीं इंद्रानें त्याला पाण्यांत बुडविल्याचा उल्लेख आहे.
लुश- १०. ३५ व ३६ या दोन सूक्तांचा द्रष्टा. याला धनाकपुत्र असें म्हटले आहे. धनाक अथवा लुश या दोघांचाहि ऋग्वेदांत उल्लेख नाही.
बृहद्दिव- १०. १२० या सूक्ताचा द्रष्टा. याला अथर्वण ॠषीचा पुत्र असें म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ८ व्या ॠचेंत बृहद्देव याचा उल्लेख आहे व ९ व्या ॠचेंत आथर्वण बृहद्दिव असा उल्लेख आहे. ॠग्वेदांत याशिवाय बृहद्दिव पदाचा उल्लेख ब-यांच ठिकाणीं आहे. परंतु तो व्यक्तिवाचक नाहीं.
भिषक्- १०. ९७ या सूक्ताचा द्रष्टा. याला आथर्वण म्हटलें आहे. ॠग्वेद व भिषक् या व्यक्तीचा उल्लेख नाहीं.
शिबि(राजा)- १०. १७९ या सूक्तांतील १ ल्या ॠचेचा द्रष्टा. याला उशीनरपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत शिबि याचा उल्लेख नाहीं.
वसुमना- १०. १७९ या सूक्तांतील ३ -या ॠचेचा द्रष्टा याला रोहिदश्वपुत्र असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत वसुमनाचा उल्लेख नाहीं.
परुच्छेप- १. १२७ ते १३९ या सूक्तांचा द्रष्टा. याला दिवोदासपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत परुच्छेपाचा उल्लेख नाहीं.
अनानत- १०. ११२ या सूक्ताचा द्रष्टा. याला परूच्छेपपुत्र असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत अनानत याचा व्यक्तिवाचक अर्थानें उल्लेख नाहीं.
बुध- १०. १०१ या सूक्ताचा द्रष्टा. याला सोमपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
अग्नियुत- १०. ११६ या सूक्ताचा द्रष्टा. याला स्थूल ॠषीचा पुत्र म्हटलें आहे. ऋग्वेदात याचा उल्लेख नाही.
संवरण- ५.३३ या सुक्ताचा द्रष्टा. याला प्रजापति पुत्र म्हटले आहे. वरील सूक्ताच्या १० व्या ॠचेंत संवरण ॠषीचा उल्लेख आहे परंतु तो प्रजापतिपुत्र असल्याबद्दल नाहीं.  ॠगवेदांत याशिवाय संवरण याचा व्यक्तिवाचक उल्लेख नाहीं.
शुनःशेप- १. २४ ते ३० या सूक्तांचा द्रष्टा. याला अजीगर्तपुत्र म्हटलें आहे. १. २४, १२;१३;५,२,७ या ठिकाणी शुनःशेपाचा उल्लेख आहे. परंतु तो अजीगर्तपुत्र असल्याबद्दल नाहीं.
कुल्मलबर्हिष्- १०. १२६ या सूक्ताचा द्रष्टा. याला शिलूषपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदात याचा उल्लेख नाहीं.
मुद्गल- १०. १०२ या सूक्ताचा द्रष्टा. याला भर्म्यश्वपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांतील ५ व ९ या ॠचांत मुद्गलाचा उल्लेख असून २ व ६ ॠचांत मुद्गलानीचा उल्लेख आहे. परंतु मुद्गल हा भर्म्यश्वपुत्र असल्याचा उल्लेख नाहीं.
मंधाता- १०. १३४ या सूक्ताचा द्रष्टा. याला युवनाश्वपुत्र म्हटलें आहें.वरील सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. ॠग्वेदांत १. ११२, १३;८.३९,८;४०, १२ या तीन ठिकाणीं मंधाता याचा उल्लेख आहे. परंतु तो युवनाश्वपुत्र असल्याचा नाहीं.
पुरूरवा- १०. ९५ या सूक्ताचा द्रष्टा. याला इलपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या २, ५, ७, ११ व १५ या ॠचांत पुरूरव्यांचा उल्लेख आहे. परंतु तो इलपुत्र असल्याचा नाहीं.
नाभानेदिष्ठ- १०. ६१ व ६२ या सूक्तांचा द्रष्टा. याला मनुपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी ६१. १८ या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु तो मनूचा पुत्र असल्याबद्दल नाहीं. ॠग्वेदांत याखेरीज नाभानेदिष्ठाचा उल्लेख नाहीं.
शार्यात- १०. ९२ या सूक्ताचा द्रष्टा. मनुपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. १. ५१, १२ व ५१, ७ या दोन ठिकाणीं शार्याताचा उल्लेख आहे, परंतु तो मनुपुत्र असल्याबद्दल नाहीं.
सुदास- १०. १३३ या सूक्ताचा द्रष्टा. याला पिजवनपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांत याचा उल्लेख नाहीं परंतु ॠग्वेदांत सुदासाचा उल्लेख पुष्कळ ठिकाणीं असून ७. १८.२२; २३;२५ या तीन ठिकाणीं पिजवनपुत्र सुदास असा उल्लेख आहे.
आसंग- ८.१ या सूक्तांतील ३० ते ३३ या चार मंत्रांचा द्रष्टा. याला प्लयोगपुत्र असें म्हटलें असून त्याचा उल्लेख वरील सूक्ताच्या ३३ व्या मंत्रांत आहे.
शश्वती- ८. १ या सूक्तांतील ३४ व्या मंत्रांची द्रष्टी. हिला आसंगपत्नी असें म्हटलें आहे. वरील मंत्रात हिचा उल्लेख आहे. परंतु आसंगपत्नी असा नाहीं.
सुवेदस- १०. १४७ या सूक्ताचा द्रष्टा. याला शिरीषपुत्र असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
दुवस्यु- १०. १०० या सूक्ताचा द्रष्टा. याला वंदनपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या १२ व्या ॠचेंत दुवस्यूचा उल्लेख आहे. परंतु तो वंदनपुत्र असल्याचा नाहीं.