प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
कश्यपकुल
(१) सर्वानुक्रमणीसिद्ध वंश व कुलसंबंध- मरीचीचा मुलगा कश्यप. कश्यपाचा मुलगा अवत्सार व शिखंडिनी नांवाच्या दोन मुली, कश्यपकुलांतील- असित, देवल, निध्रुव, भूतांश, विवृह, रेभ.
मरीचिपुत्र कश्यप- हा १.९९ व ६४, ११२;११३ या सूक्तांचा द्रष्टा. याला मरीचिपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तापैकीं ९. ११३ या सूक्तांतील २ -या ॠचेंत याचा उल्लेख आला आहे. परंतु त्यावरून तो मरीचिपुत्र असल्याचें ठरत नाहीं. ॠग्वेदांत वरील स्थलाशिवाय अन्यत्र याचा उल्लेख नाहीं.
कश्यप - भूतांश- हा १०. १०६ या सूक्ताचा द्रष्टा आहे. याला काश्यप म्हटलें आहे. सदर सूक्तांतील शेंवटच्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु तेवढयावरून तो कश्यपपुत्र अथवा कश्यप कुलांतील असल्याचें सिद्ध होत नाहीं.
काश्यप - निध्रुव- ९. ६३ या सूक्ताचा हा द्रष्टा असून याला काश्यप असें म्हटलें आहे. वरील सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. ॠग्वेदांत निध्रुवि शब्द ७. ३, १,८.२० २२; २९, २३ या तीन ठिकाणीं आहे. परंतु तो व्यक्तिवाच नाहीं. तेव्हा ॠग्वेदांतील आधारावरून हा कश्यपकुलांतील ठरत नाहीं.
काश्यप - अवत्सार- ४. ५३ ते ६० व ५. ४४ हीं सूक्तें याच्या नांवावर असून याला काश्यप म्हटलें आहे. वरील सूक्तापैकी ५. ४४ या सूक्तांतील १० व्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु त्यावरून हा काश्यप कुलांतील असल्याचें ठरत नाहीं. वरील स्थलाशिवाय याचा कोठें उल्लेख नाहीं. याच्याबरोबर एवीवद, यजत, सघ्रि यांचा उल्लेख आहे.
काश्यप - रेभः हा ८. ९७ या सूक्ताचा द्रष्टा आहे व याला काश्यप म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ११ व्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. ॠग्वेदांत ब-याच ठिकाणीं रेभ शब्द आला आहे. परंतु १. ८, १० येथेंच तो व्यक्तिवाचक अर्थाने आहे. परंतु त्याहि ठिकाणीं तो काश्यप कुलांतील असल्याचा उल्लेख नाहीं.
काश्यप असित अथवा देवल - ९. ५ ते २४ या सूक्ताचा द्रष्टा असून याला काश्यप म्हटलें आहे. वरील सूक्तांत अथवा ॠग्वेदांत असित अगर देवल या व्यक्तीचा कोठेंच उल्लेख नाहीं. अर्थात तो काश्यप असल्याचाहि उल्लेख नाहींच.
विवृह- कश्यपगोत्रः- १०. १६३. या सूक्ताचा द्रष्टा असून याला कश्यपगोत्री असें म्हटलें आहे. सदर सूक्तांत विवृहामि पद प्रत्येक ॠचेंत आले असल्यामुळेंच सदर सूक्ताचा विवृह ॠषि आहे असें म्हटलें असावें. विवृहाचा ॠग्वेदांत कोठेहि उल्लेख नाहीं.
शिखंडिनी- कश्यपाच्या कन्या- ९. १०४ या सूक्ताच्या द्रष्टया कश्यपाच्या शिखंडिनी नामक दोन मुली असल्याचें लिहिलें आहे. या शिखंडिनीचा ॠग्वेदांत कोठेंहि उल्लेख नाहीं.
रेभसूनूकश्यप- गोत्री- ९. ९९ या सूक्ताचें हे दोघे विकल्पाचें द्रष्टे असून यांनां काश्यपगोत्री असें म्हटलें आहे. परंतु ॠग्वेदांत यांचा उल्लेख नाहीं. अथवा हें काश्यप गोत्री असल्याचा उल्लेख नाहीं.
सुनू-ॠभुपुत्र- १०. १७६ या सूक्ताचा हा द्रष्टा असून याला ॠभुपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या आरंभीच्या ॠचेंतच सूनव ॠभणां अशी पदें आहेत. परंतु तीं एका व्यक्तीची बोधक नाहीत. ॠग्वेदांत या सूनूचा व्यक्तिवाचक असा उल्लेख नाही.