प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
आंगिरस कुल
(१) सर्वानुक्रमणासिद्ध व ॠग्मंत्रसिद्ध कुल व वंशसंबंध- आंगिरस, कुलांतील अयास्य, बृहस्पति, सप्तगु, प्रचेता, हिरण्यस्तूप, हिरण्यस्तूपाचा मुलगा अर्चत्.
(२) सर्वानुक्रमणीसिद्ध कुलसंबंध ॠग्मंत्रसिद्ध वंशसंबंध- उचथ्य याची स्त्री ममता व मुलगा दीर्घतमा. कृष्णाचा मुलगा विश्वक व विश्वकाचा मुलगा विष्णापू. व्यश्वाचा मुलगा विश्वमनस् अर्जुनी (स्त्री) इचा मुलगा कुत्स, कुत्साचा मुलगा दुर्मित्र, उशिजा (स्त्री) इचा मुलगा कक्षीवान, कक्षीवानाची बायको वृचया. नृमेधाचा मुलगा शकपूत.
(३) केवल सर्वानुक्रमणीसिद्ध वंशसंबंध व कुलसंबंध- अंगिरस याचे मुलगे बृहस्पति, उचथ्य, हिरण्य स्तूप, हिरण्यस्तूपाचा मुलगा अर्चत्, उचथ्याची बायको ममता व मुलगा दीर्घतमा. दीर्घतम्याचा बायको उशिजा व मुलगा कक्षीवान्; कक्षीवानाची बायको वृचया. मुलगा सुकीर्ति व मुलगी घोष: घोषेचा मुलगा सुहस्त्य. आंगिरसकुलांतील- घोर, तीरश्ची पूतदक्ष, ध्रुव, अभीवर्त, श्रुतकक्ष, सव्य, बिंदु, मूर्धन्वान, कृतयशा, पुरुहन्मन्, पवित्र, प्रभूवस्, भिक्षु, विहव्य, दिव्य, सप्तगु, संवर्त, बरू, कृष्ण, कृष्णाचा मुलगा विश्वक व विश्वकाचा मुलगा विष्णापू, शुनहोत्र, शुनहोत्राचा मुलगा गृत्समद व गृत्समदाचा मुलगा कूर्म, व्यश्व व त्याचा मुलगा विश्वमनस्, कुत्स व त्याचा मुलगा दुर्मित्र, नृमेध व त्याचा मुलगा शकपूत, प्रियमेध व त्याचा मुलगा सिंधुक्षित, अमहीयु व त्याचा मुलगा उरुक्षय. विरूप व त्याचे मुलगे नभःप्रभेद अष्टादंष्ट्र, शतप्रभेदन, साघ्रे. उरू व त्याचा मुलगा अंग.
उचथ्य - ९.५० ते ५२ या तीन सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरसपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा व्यक्तिवाचक अर्थानें उल्लेख नाहीं,. सर्वत्र उचथ व उचथ्य पदांचा स्तोता असाच अर्थ केला जातो.
दीर्घतमा- १. १४० ते १६४ या १५ सूक्तांचा द्रष्टा याला उचथ्य पुत्र असें म्हटलें आहें; व तसा उल्लेख ॠग्वेदांत १.१५८, १;४ या ॠचांमध्यें आला आहे. परंतु तो ‘औचथ्य दीर्घतमा’ असा स्पष्ट नाहीं. सदर सूक्ताचा द्रष्टा दीर्घतमा हा ममता नामक कोणा स्त्रीचा मुलगा होता. कारण १.१४७, ३; १५२, ६; १५८, ६ या ठिकाणीं त्याला मामतेय म्हटलें आहे. मात्र ममता ही उचथ्याची बायको असा ॠग्वेदांत स्पष्ट उल्लेख नाहीं. दीर्घतम्याचा या दोघांशी संबंध असल्यामुळें ममतेला उचथ्याची बायको म्हणावें लागतें.
कक्षीबान- १. ११६ ते १२६ व ९.७४. या सूक्तांचा द्रष्टा. याला दीर्घतम्याचा मुलगा असें म्हटलें आहे. वरील सूक्तापैकीं ९.११६; ११७, १२६ या सूक्तांत आणि) ९. ७४, ८ या ॠचेंत कक्षीवानाचा उल्लेख असून ॠग्वेदांत ब-याच ठिकाणी उल्लेख आहे. परंतु त्या सर्व ठिकाणीं हा दीर्घतम्याचा मुलगा असा उल्लेख नाहीं. याचा ॠग्वेद १.१८, १ या ठिकाणी कक्षीवान औशिज असा उल्लेख असून १. ११९, ९;१२२, ४;५ याठिकाणीं यास औशिज म्हटलें आहे यावरून हा उशिजा नामक स्त्रीचा मुलगा असल्याचें ठरतें. याची वृचया नामक स्त्री असल्याबद्दल १.५१, १३ येथें उल्लेख आहे.
घोषा- (स्त्री) १०. ३९; ४० या सूक्तांची द्रष्टी. वरील सूक्तांपैकी ४०, ५ येथें व १, ११७, ७; १२२, ५. या ठिकाणीं घोषेचा उल्लेख आहे. हिला कक्षीवानाची मुलगी असे सायणाने व सर्वानुक्रमणीकारांनी म्हटलें आहे. परंतु ॠग्वेदांत तसा उल्लेख नाहीं.
सुहस्त्य- १०.४१ या सूक्ताचा द्रष्टा. याला घोषेचा पुत्र असें म्हटलें आहे. वरील सूक्तांतील तिस-या ॠचेंतील सुहस्त्य पदाचा घोषेचा मुलगा असा सायणांनीं अर्थ केला आहे. १.१२०, ५ या ॠचेंत ‘घोषे’ असें पद असून त्याचा ‘घोषायाः पुत्रे’ असा भाष्यांत अर्थ दिला आहे. परंतु सुहस्त्य हा घोषेचा मुलगा असा स्पष्ट उल्लेख ॠचेंत नाहीं.
सुकीर्ति- १०. १३१ या सूक्ताचा द्रष्टा. याला कक्षीवान् पुत्र असें म्हटलें आहे. परंतु ॠग्वेदांत याचा उल्लेख नाही.
अयास्य- ९.४४ ते ४६; १० ६७;६८ या सूक्तांचा द्रष्टा. याला अंगिरस म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी ९., ४४, १.१०, ६७, १; १०८, ८ व १३८, ४. याठिकाणीं याचा उल्लेख आहे. व १०, १०८, ८ या ठिकाणीं अयास्य आंगिरस असा उल्लेख आहे.
हिरण्यस्तूप- १.३१ ते ३५ व ९. ६९ या सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरसपुत्र म्हटलें आहें. वरील सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. १०. १४९, ५. या ॠचेंत अर्चत नामक सूक्तकार आंगिरस हिरण्यस्तूप असा उल्लेख करतो. यावरून हिरण्यस्तूप हा आंगिरस असावा.
अर्चत- १०. १४९ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस हिरण्यस्तूप याचा मुलगा असें म्हटलें आहे. सदरहू सूक्ताच्या ५ व्या ॠचेंत आंगिरस हिरण्यस्तूपाप्रमाणें माझा स्तुति ऐक अशी तो प्रार्थना करतो. यावरून तो हिरण्यस्तूपाचा मुलगा असावा असें ठरतें.
कृष्ण- ८. ७४. या सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. वरील सूक्तांच्या ३ व ४ या ॠचांत याचा उल्लेख आहे. परंतु तो आंगिरस असल्याबद्दल नाहीं. ॠग्वेदांत याशिवाय व्यक्तिवाचक असा कृष्णाचा उल्लेख नाही.
विश्वक- ८.७५ या सूक्ताचा द्रष्टा. याला कृष्णपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या १ ते ४ या ॠचांत याचा उल्लेख आहे. तसेंच १.११६, २३; ११७, ७. याठिकाणीं अश्विनांनी कृष्णपुत्र विश्वक याला विष्णापू नांवाचा मुलगा दिल्याचा उल्लेख आहे. व १०. ६२, १२ या ठिकाणीहि विश्वकाला विष्णापू नामक मुलगा दिल्याचा उल्लेख आहे. यावरून कृष्णपुत्र विश्वक व त्याचा मुलगा विष्णापू असल्याचें ठरतें. विष्णापू व सूक्तकार नाहीं.
प्रचेतस्- १०. १६४ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. वरील सूक्तांच्या ४ थ्या ॠचेंत प्रचेतान आंगिरस असा उल्लेख आहे यावरून प्रचेतस हा आंगिरसकुलांतील असावा असें दिसतें.
विरूप- ८. ४३; ४४;व ६४ या सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. सदरहू सूक्तांपैकी ६४, ६ येथें याचा उल्लेख आहे. १.४५, ३ या ॠचेंत प्रियमेध, अत्रि, आंगिरस् यांच्या बरोबर याचा उल्लेख आहे परंतु तो आंगिरस असल्याबद्दल नाहीं.
बृहस्पति- १०, ७१, व ७२ या सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरस व लोकपुत्र म्हटले आहे. १०. ७१, १ यांत बृहस्पतीचा उल्लेख आहे. परंतु तो सूक्तकार या अर्थानें नाहीं. ६. ७३, १ येथें बृहस्पतिरागिरसः असा उल्लेख आहे. यावरून बृहस्पति हा आंगिरस असावा असें ठरतें.
गृत्समद- ९. १ ते ३; ९ ते २६; ३० ते ४३ या सूक्ताचा द्रष्टा व ॠग्वेद मंडल दोन याच्या नांवावर आहे. पण त्यापैकी वरील सूक्ताचाच हा द्रष्टा आहे. याला आंगिरस शुनहोत्र याचा पुत्र असे म्हटलें आहे व तोच पुढें शुनकाचा मुलगा झाला असें म्हटलें आहे. परंतु वरील दोन्हीहि गोष्टीचा उल्लेख ॠग्वेदांत नाहीं. ॠग्वेदांत गृत्समदाचा उल्लेख ४ वेळ (२ ४,९;१९,८;३९,८,४१,१८) आला आहे व शुनहोत्र याचाहि उल्लेख दोन वेळ (२.४१, १४;१७) आला आहे व भाष्यांत शुनहोत्र याचा अर्थ गुत्समद असा केला आहे. परंतु प्रत्यक्ष ॠचेत तसा उल्लेख नाही. गुत्समदाचा ॠग्वेदांत आलेला उल्लेख सर्वत्र बहुवचनी आहे.
शुनहोत्र- ६. ३३, ३४ या दोन सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. ॠग्वेदांत २.४१, १७, १८ या ठिकाणीं याचा उल्लेख आहे परंतु तो आंगिरस असल्याचा नाहीं.
कूर्म- २.२७ ते २९ या सूक्ताचा द्रष्टा. याला गृत्समदपुत्र असें म्हटलें आहें. परंतु ॠग्वेदात तसा उल्लेख नाहीं. कूर्माचा ॠग्वेदात उल्लेख नाहीं व वरील सूक्तांत गृत्समदाचाहि उल्लेख नाहीं.
व्यश्व- ८. २६ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. याचा वरील सूक्तांत उल्लेख नाहीं. ॠग्वेदांत याचा उल्लेख ९. ११२, १५. ८. ९, १०. २३, १६, २४ २८; २९ या ठिकाणी आहे. परंतु तो आंगिरस असल्याबद्दल नाहीं.
विश्वमना- ८, २३ ते २५ या सूक्तांचा द्रष्टा. याला व्यश्व पुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांत २३,२ व २७. ७ याठिकाणीं उल्लेख आहे. याला ८, २३, २४, २४, २३, २६, ११ या ठिकाणी वैयश्व (व्यश्वपुत्र) म्हटलें आहे.
घोर.- ३.३६ या सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. ॠग्वेदांत घोर याचा व्यक्तिवाचक उल्लेख नाहीं.
कुत्स- ९.९४ ते ९८;१०१ ते ११५ व ९. ४ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस असे म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा पुष्कळ ठिकाणीं उल्लेख आहे. परंतु तो आंगिरस असल्याबद्दल नाहीं. याला आर्जुनेय असें नांव
ॠग्वेदांत चार ठिकाणीं (१.११२, २३; ४. २६, १; ७, १९, २; ८ १, ११, दिले आहे. आर्जुनेय (अर्जुनी स्त्रीचा पुत्र) कुत्स असा वरील चार ठिकाणीं उल्लेख आहे. ही अर्जुनी कोण याबद्दल उल्लेख नाहीं.
दुर्मित्र- १०.१०, ५ या सूक्ताचा द्रष्टा. याला कुत्सपुत्र म्हटलें आहे. याचा उल्लेख वरील सूक्तांच्या ११ व्या ॠचेत मी दुर्मित्र स्तुति करीत आहे, त्या मज कुत्सपुत्राचें रक्षण कर अशी प्रार्थना केली आहे.
मूर्धन्वान् - १०. ८८ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरसपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं. सदर सूक्तांत मूर्धन्वान् पद फार वेळ आलें असल्यामुळें या सूक्ताचा मूर्धन्वान द्रष्टा आहे असे म्हटलें
असावें.
ऊरू- ९. १०८ या सूक्तातील ४ व ५ या ॠचांचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटले आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं व वरील दोन ॠचात आंगिरसाचा उल्लेख नाहीं.
उर्ध्वसद्मा- ९. १०८ सूक्तांतील ८ व ९ या ॠचांचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटले आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाही व वरील ॠचांत आंगिरसाचा उल्लेख नाहीं.
कृतयशा- ९. १०८ सूक्तांतील १० व ११ या ॠचांचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटले आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाही व वरील ॠचात आंगिरसाचा उल्लेख नाही.
पुरुहन्मन्- ८. ५९ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटले आहे. वरील सूक्ताच्या दुस-या ॠचेंत याचा उल्लेख आहे. ॠग्वेदात याशिवाय अन्यत्र याचा उल्लेख नाही. वरील सूक्तांत आंगिरसाचा उल्लेख नाहीं.
बृहन्मति- ९. ३९ या सूक्ताचा द्रष्टा याला आंगिरस पुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या पहिल्याच ॠचेंत याचा उल्लेख आहे. पण तो आंगिरस असल्याबद्दल नाहीं. ॠग्वेदांत वरील स्थलाशिवाय याचा उल्लेख नाहीं.
पवित्र- ९. ६७ सूक्तातींल ८. ३३ ॠचा; ९, ७३ व ८३ या सूक्तांचा हा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. वरील सूक्तांत पवित्र शब्द फार वेळ आला आहे. परंतु तो व्यक्तिवाचक नाहीं. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं. याला आंगिरस म्हणण्यास आधार नाहीं.
प्रभूवसु- ९. ३५; ३६ या सूक्तांचा हा द्रष्टा. ह्याला आंगिरसपुत्र असें म्हटलें आहे. सूक्त ३५ यांतील शेवटच्या मंत्रांत प्रभूवसो हें पद आहे. परंतु ते व्यक्ति या अर्थानें नाहीं. ॠग्वेदांत प्रभूवसो हें पद फार वेळ आलें आहे. परंतु त्याचा व्यक्तिवाचक अर्थ कोठेंच नाहीं.
भिक्षु- १०. ११७ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरसपुत्र म्हटलें आहे. सदर सूक्तांत दानप्रशंसा आहे. ॠग्वेदांत भिक्षूचा उल्लेख नाही.
विहव्य- १०. १२८ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा व्यक्ति या अर्थानें उल्लेख नाहीं.
दिव्य- १०. १०७ या सूक्ताचा (विकल्पानें) द्रष्टा आहे. याला आंगिरस म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
सप्तगु- १०. ४७ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ६ व्या ॠचेंत याचा उल्लेख आहे आणि तो आंगिरस असल्याचा आहे. ॠग्वेदांत वरील स्थलाशिवाय याचा कोठें उल्लेख नाहीं.
संवर्त- १०. १७२ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. याचा उल्लेख ८. ५४ (वालखिल्यापैकी ६) या सूक्तांतील २ -या ॠचेंत आहे. परंतु तो आंगिरस असल्याबद्दल नाहीं.
बरू- १०. ९६. या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. सदर सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. ८. २३, २८ या ठिकाणीं वरीसुषामन् नामक एका राजाचा उल्लेख आहे. अशाच त-हेचा उल्लेख ८. २४, २८, २६, २ या ठिकाणीहि आहे. बरू व बसू या नांवाबद्दल संशय आहे.
अष्ट्रादंष्ट्र- १० . १११या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस विरूप याचा पुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
नभः प्रभेदन- १०. ११२ या सूक्ताचा द्रष्टा. याला विरूपपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत यांचा उल्लेख नाहीं.
शतप्रभेदन- १०. ११३ या सूक्ताचा द्रष्टा. याला विरूपपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
सघ्रि- १०. ११४. या सूक्ताचा द्रष्टा. याला विरूपपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
अंग- १०. १३८ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरसऊरू याचा पुत्र म्हटले आहे. ॠग्वेदांत उल्लेख नाहीं.
प्रियमेध- ८ ५७; ५८ व ९. २८ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. ८. ५८, १८ येथें याचा उल्लेख आहे. परंतु तो बहुवचनी आहे. ॠग्वेदांत याचा बहुवचनी ‘प्रियमेधासः’ असा उल्लेख फार येतो. यावरून याचे स्वतंत्र कुल असावें. एकवचनीहि उल्लेख कोठें कोठें (१. १३९, ९८.५, २५) आहे परंतु तो आगिरस असल्याबद्दल नाहीं. ४५, ३ या ॠचेंत याचा आंगिरसांबरोबर उल्लेख आहे. यावरून कदाचित हा आंगिरस असावा.
सिंधुक्षित्- १०. ७५. या सूक्ताचा द्रष्टा. याला प्रियमंधपुत्र असें म्हटलें आहे., परंतु तसा उल्लेख नाहीं. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
अमहीयु- ९. ६१ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
उरूक्षय- १०. १८ या सूक्ताचा द्रष्टा. याला अमहीयुपुत्र म्हटलें आहे; पण तसा उल्लेख नाही. ॠग्वेदांत याचा व्यक्तिवाचक अर्थाने उल्लेख नाहीं.
सव्य- १.५१ ते ५७ या सूक्ताचा हा द्रष्टा. याला अंगिरा ॠषीचा पुत्र असे म्हटलें आहे. सव्याचा व्यक्तिवाचक उल्लेख ॠग्वेदांत नाहीं.
अभीवर्त- १०. १७४ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटले आहे. या सूक्ताच्या पहिल्या ॠचेत अभीवर्त पद आहे, पण त्याचा व्यक्तिवाचक अर्थ होत नाहीं.
बिंदु- ९. ३० या सूक्ताचा द्रष्टा, याला आंगिरस म्हटलें आहे. ॠग्वेदांत बिंदूचा उल्लेख नाही.
श्रृतकक्ष- ८. ८१ या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस असें म्हटलें आहे. सदर सूक्ताच्या २५ साव्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु त्यावरून तो आंगिरस असल्याचे ठरत नहीं.
ध्रुव- १०. १७३. या सूक्ताचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटलें आहे. सदरहू सूक्तात ध्रुव शब्द फार वेळ आला आहे. परंतु तो व्यक्तिवाचक नाहीं. ॠग्वेदांत याचा व्यक्तिवाचक उल्लेख नाहीं.
नृमेध- ८. ८७; ८८ व ९. २७; २९ या सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरस म्हटले आहे. वरील चारहि सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. १०.८०, ३; १३२, ७ या ॠचांत याचा उल्लेख आहे. परंतु तो आंगिरस असल्याबद्दल नाहीं.
शकपूत- १०. १३२ या सूक्ताचा द्रष्टा. याला नृमेध पुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ७ व्या ॠचेंत याचा उल्लेख असून त्याच ॠचेंत नृमेधाप्रमाणें माझे रक्षण करशील अशी तो प्रार्थना करतो. यावरून हा नृमेधपुत्र असावा असें वाटतें.
तिरश्ची- ८. ८४ या सूक्तांचा द्रष्टा- याला आंगिरस म्हटलें आहे. सदर सूक्ता या ४ थ्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु तो आंगिरस असल्याबद्दल नाहीं.
पूतदक्ष- ८. ८३ या सूक्तांचा द्रष्टा- याला आंगिरस म्हटलें आहे. ॠग्वेदात याचा व्यक्तिवाचक उल्लेख नाहीं.