प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
कण्वकुल
(१) सर्वानुक्रमणी व ॠग्मंत्रसिद्धकुल व वंशसंबंध- नृषदाचा मुलगा कण्व. कण्वाचे मुलगे मेघातिथि, प्रस्कण्व व वत्स.
(२) सर्वानुक्रमणीसिद्ध कुलसंबंध व ॠग्मंत्रसिद्ध वंशसंबंध- नभाकाचा मुलगा नाभाक.
(३) सर्वानुक्रमणीसिद्ध वंश व कुलसंबंध- घोराचा मुलगा कण्व. कण्वाचे वत्स, प्रस्कण्व, कुसीदि, गोषूक्ति, अश्वसूक्ति, प्रगाथ. प्रगाथाचे मुलगे भर्ग, कलि, हर्यत. कण्व कुलांतील- नीपातिथी, सोभरि, पर्वत, नारद, त्रिशोक, इरिंबिठि, ब्रह्मातिथि, सध्वंस, शशकर्ण कुरुसुति. सोभरीचा मुलगा कुशिक.
कण्व - १. ३६ ते ४३ व ९४ या सूक्तांचा द्रष्टा. याला आंगिरस घोर याचा पुत्र असें म्हटलें आहे. परंतु ॠग्वेदांत तसा उल्लेख नहीं. ॠग्वेदांत १०.११, ३१, येथें आला नृषद पुत्र म्हटलें आहे. अशाच त-हेचा उल्लेख १.११७, ८ येथें आहे. परंतु तो जरा संशयित आहे. ॠग्वेदांतील उल्लेखाप्रमाणें कण्व हा घोरपुत्र नसून नृषदपुत्र ठरतो. कण्वाचें त्याच्या पुढें स्वतंत्र कुलच झालें. कारण बरेचसे सूक्तकार आपणास कण्व म्हणवितात. वरील सूक्तांपैकी बुहतेक सूक्तांत कण्वाचा उल्लेख आहे. कण्व पूर्वी आंधळा होता. त्याला अश्वीदेवांनीं डोळे दिले व श्रवणेंद्रियहि दिलें असा उल्लेख आहे.
वत्स - ८. ६, ७ व ११ या तीन सूक्तांचा द्रष्टा. याला काण्व म्हटलें आहे. वरील सूक्तांत कण्वाचा उल्लेख आहे. ८. ८, ८ या ॠचेंत कण्वपुत्र वत्स असा उल्लेख आहे. ८ व ९ या सूक्तांचे द्रष्टे अनुक्रमें संध्वस व शशकर्ण हे आहेत. परंतु सदर सूक्तांत त्याचा उल्लेख नसून वत्साचा बराचवेळ उल्लेख आहे. तेव्हां सदर सूक्तें वत्साचींच असावींत असें वाटतें.
मेघातिथि, मेघ्यातिथि - १. १२ ते २:८. १ ते ३; ३२; ३३ ९. २, ४ या सूक्तांचा द्रष्टा. याला कण्वपुत्र म्हटलें आहे. ८. २, ४० या ॠचेंत काण्व मेघ्यातिथि असा उल्लेख आहे यावरून तो कण्ववंशज असल्याचें ठरतें. याचेच दुसरें नांव मेघ्यातिथि असें होतें.
प्रस्कण्व- १. ४४ ते ५० व ९. ९५ या सूक्तांचा द्रष्टा. याला कण्वपुत्र म्हटलें आहे. परंतु तसा प्रत्यक्ष उल्लेख ॠग्वेदांत नाहीं. वरील सर्व सूक्तांत प्रस्कण्वाचा उल्लेख आहे. १. ४५, ५ या ॠचेंत कण्वाचे पुत्र आम्ही तुझी स्तुति करतो ती ऐक असा उल्लेख आहे. यावरून प्रस्कण्व कण्वाचा मुलगा असल्याचें ठरतें व कण्वाचे बरेच मुलगे होते असेंहि सिद्ध होतें. कदाचित वंशज असूं शकतील.
नाभाक - ८. ३९ ते ४२ सूक्तांचा द्रष्टा. याला काण्व असें म्हटलें आहे. वरील सूक्तापैकीं ४१, २ येथें नाभाक याचा उल्लेख आहे. ॠग्वेदांत याशिवाय नाभाकाचा उल्लेख नाहीं. ८. ४१, ४ व ५ या ॠचांत ‘नभाकवत’ असा उल्लेख आहे. यावरून नभाक नावाचा कोणी ॠषि असून त्याचा हा मुलगा असावा.
त्रिशोक - ८. ४५ या सूक्ताचा द्रष्टा. याला काण्व म्हटलें आहे.सदर सूक्तांतील ३० व्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु त्यावरून हा काण्व असल्याचें ठरत नाहीं. याशिवाय १. ११२ १२ व १०. २९, २ या ठिकाणीं त्रिशोकाचा उल्लेख आहे. परंतु तो कण्व असल्याबद्दल नाहीं.
नीपातिथी- ८. ३४ या सूक्ताचा द्रष्टा. याला कण्व म्हटलें आहे. सदर सूक्तांत याचा उल्लेख नाहीं परंतु याच सूक्तांतील १ व ४ या ॠचांत कण्वाचा उल्लेख आहे. याशिवाय ॠग्वेदांत ८. ४९ (वालखिल्यापैकी) या सूक्तांत व ८. ५१ (वालखिल्य-३) या सू्क्तांत नीपातिथीचा उल्लेख आहे. परंतु काण्व असल्याचा उल्लेख नाहीं.
कुसीदिः- हा ८. ७०, ७१, ७२ या तीन सूक्तांचा द्रष्टा. अनुक्रमणीकारांनी याला कण्वपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत या व्यक्तीचा उल्लेख नाहीं, व वरील सूक्तांत कण्वाचाहि उल्लेख नाहीं.
गोषूक्ति, अश्वसूक्ति- ८. १४ व १५ या सूक्तांचे हे दोघे द्रष्टे आहेत. यांनां कण्वायन असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत या व्यक्तींचा उल्लेख नाहीं. व वरील सूक्तांत कण्वाचाहि उल्लेख नाहीं.
कुरुसुति- ८. ६५ ते ६७ या दोन सूक्तांचा हा द्रष्टा. याला काण्व म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं. व वरील सूक्तांत कण्वाचाहि उल्लेख नाहीं.
प्रगाथ- ८. १०; ४८; ५१ ते ५४ या सूक्तांचा द्रष्टा. याला कश्यपपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत प्रगाथाचा व्यक्तीचा वाचक उल्लेख नाहीं.
भर्ग- ८. ४९; ५० या सूक्तांचा द्रष्टा. याला प्रगाधपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांत व ॠग्वेदांत भर्गाचा उल्लेख नाहीं.
कलि - ८. ५५ या सूक्ताचा द्रष्टा. याला प्रगाधपुत्र म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या १६ व्या ॠचेंत याचा उल्लेख असून १. ११२, १५ येथेंहि याचा उल्लेख आहे परंतु तो प्रगाधपुत्र असल्याचा नाहीं.
इरिंबिठि- ८. १६ ते १८ या सूक्तांचा द्रष्टा. याला काण्व म्हटले आहे. ॠग्वेदांत इरिंबिठीचा उल्लेख नाहीं. वरील सूक्तांत कण्वाचा उल्लेख नाहीं.
देवातिथि - ८. ४ या सूक्ताचा द्रष्टा याला काण्व म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं. वरील सूक्तांतील दुस-या ॠचेत कण्वांचा उल्लेख केलेला आहे.
ब्रह्मातिथि - ८. ७ या सूक्ताचा द्रष्टा. याला काण्व म्हटले आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं. वरील सूक्तांत ४. २३ व २५ या ॠचांमध्ये कण्वाचा उल्लेख आहे. यावरून कदाचित हा काण्व असावा असें वाटतें.
पर्वत - ८. १२ या सूक्ताचा द्रष्टा. याला काण्व म्हटलें आहे. याचा ॠग्वेदात उल्लेख नाहीं.
नारद- ८. १३ या सूक्ताचा द्रष्टा. याला काण्व म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
सध्वंस- ८. ८ या सूक्तांचा द्रष्टा. याला काण्व म्हटलें आहे. याचा ॠग्वेदांत उल्लेख नाहीं वरील सूक्ताच्या ४ थ्या ॠचेंत ‘कण्वत्यपुत्रः’ असा उल्लेख आहे परंतु सध्वंसाचा उल्लेख नाहीं. या सूक्तांत वत्स ॠषीचा उल्लेख ४ वेळ आला असून ८ व्या ॠचेंत ‘कण्वपुत्र वत्स’ असा उल्लेख आहे. यावरून हें सूक्त वत्सानें रचलेलें असावें असें दिसतें.
हर्यत - ८. ६१ या सूक्ताचा द्रष्टा. याला प्रगाथपुत्र म्हटलें आहे. परंतु तसा उल्लेख ॠग्वेदांत नाहीं. वरील सूक्ताच्या १८ व्या ॠचेंत हर्यताचा उल्लेख आहे. सदर सूक्तांत कण्वाचा उल्लेख नाहीं.
शशकर्ण- ८. ९ या सूक्ताचा द्रष्टा. याला काण्व म्हटलें आहे. शशकर्णाचा उल्लेख ॠग्वेदांत नाहीं. सदर सूक्तांत वत्साचा उल्लेख आहे.
सोभरि- ८. १९ ते २२ व ९२ या सूक्तांचा द्रष्टा. याला काण्व म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी १९,२;३२; २०, २; १९, ८; २२, २; १५ व ९२, १४ या ठिकाणीं सोभरीचा उल्लेख असून याशिवाय ८. ५, २६ याठिकाणीं उल्लेख आहे. परंतु वरील सर्व स्थलींहि तो काण्व असल्याचा उल्लेख नाहीं.
कुशिक- १०. १२७ या सूक्ताचा द्रष्टा. याला सोभरिपुत्र म्हटलें आहे. कुशिकाचा सोभरिपुत्र या अर्थानें ॠग्वेदांत उल्लेख नाहीं.