प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
अत्रिकुल
(२) सर्वानुक्रमणीसिद्ध कुलसंबंध व ॠग्मंत्र सिद्ध वंशसंबंध- प्लतीचा मुलगा गय. वय्याचा मुलगा सत्यश्रवस्. आप्त्य अपांपुत्र त्रित. त्रिवृष्णाचा मुलगा व्यरूण.
(३)सर्वानुक्रमणीसिद्ध वंश व कुलसंबंध- संख्याचा मुलगा अत्रि. अत्रीचे मुलगे वसुश्रुत, प्रतिम विश्वसामन्, वसूयु, सुतंभर, गोपवन, पौर, अर्चनानस्, अर्चनानस्चा मुलगा शावाश्व. शावाश्वाचा मुलगा अंधीगु. अत्रीची मुलगी अपाला. अत्रिवंशांतील- इष, सदापृण, यजत, श्रुतवित्, बाहुवृक्त, उरुचक्रि, रातहव्य, बंधु, सुबंधु, विप्रबंधु, स्वस्ति, सस, विश्ववारा (स्त्री), प्रतिभानु, गातु, बुध, गविष्ठिर, कुमार, पुरू, सप्तवध्रि, वय्य व त्याचा मुलगा सत्यश्रवस्. प्लति व त्याचा मुलगा गय, व त्याचे मुलगे द्वित व त्रित. भुवन व त्याचा मुलगा विश्वकर्मन्.
अत्रि- हा ॠग्वेद मंडल ५ चा द्रष्टा आहे. सर्वानुक्रमणी व बृहद्देवतेत या मंडळांतील सूक्तकार असून ज्यांच्या कुलाचा उल्लेख नसेल त्या सर्वांना आत्रेय म्हणावें असें म्हटलें आहे. अत्रि हा मंडल पांच यांतील ३७, ४३, ७७ व ८५ या सूक्तांचा द्रष्टा आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख पुष्कळ ठिकाणीं आहे. पांचव्या मंडळांत भौमोत्री नांवाचा सूक्तकार असून ४१, ७२, ८६, या सूक्तांचा द्रष्टा आहे. हा व वरील अत्रि एकच कीं काय अशी शंका आहे. ॠग्वेदांत भौमोत्रीचा उल्लेख नाहीं. अत्रि हा संख्य याचा मुलगा असें सर्वानुक्रमणींत म्हटलें आहे त्यास ॠग्वेदांत आधार नाहीं.
अर्चनानस्- ५. ६३ व ६४ या दोन सूक्तांचा हा द्रष्टा असून बृहद्देवतेप्रमाणें हा अत्रीचा मुलगा आहे. वरील सूक्तांपैकी ६४ व्या सूक्तांतील शेवटच्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु तो अत्रिपुत्र असल्याचा नाहीं. ॠग्वेदांत यांशिवाय अर्चनानस् याचा उल्लेख नाहीं.
श्यावाश्व- ५. ५२ ते ६१, ८१ व ८. ३५ ते ३८ या सूक्तांचा द्रष्टा असून याला अर्चनानस् याचा पुत्र असें म्हटलें आहे. वरील सूक्तापैकी ५. ५२ या सूक्ताच्या आरंभीच्या ॠचेंत व ५. ६१ या सूक्ताचें शेवटीं श्यावाश्वाचा उल्लेख असून ८.३५ ते ३८ या चारी सूक्तांत श्यावाश्वाचा व अत्रीचा उल्लेख आहे. अत्रीच्या स्तुतीप्रमाणें माझी स्तुति ऐका अशी तो ८. ३५ ते ३८ या सूक्तांत प्रार्थना करतो. यावरून तो अत्रीच्या कुलांतील असावा. श्यावाश्वाच्या नांवावर आणखी ८१ व ८२ ही सूक्तें आहेत. पैकीं ८१ सूक्तांतील ५ व्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. वरील उता-यांवरून तो अर्चनानस् याचा मुलगा असल्याचा बोध होत नाहीं.
अंधीगु- या सूक्तकाराच्या नांवावर ९. १०१ हें सूक्त असून याला श्यावाश्वपुत्र असें अनुक्रमणींत म्हटलें आहे. वरील सूक्तांतील पहिल्याच ॠचेंत ‘अंधसः’ असें पद आहे. सदर सूक्तांत व ॠग्वेदांत अंधीगूचा उल्लेख नाहीं.
गोपवन- हा ८. ६३ या सूक्ताचा द्रष्टा आहे व याला आत्रेय म्हटलें आहे. वरील सूक्ताच्या ११ व्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु तो आत्रेय असल्याबद्दल नाहीं. ॠग्वेदांत वरील स्थलाशिवाय गोपवनाचा उल्लेख नाहीं.
सुतंभर- हा ५. ११ ते १४ या ४ चार सूक्तांचा द्रष्टा आहे व याला आत्रेय म्हटलें आहे. वरील चारी सूक्तांत याचा अथवा अत्रीचा उल्लेख नाहीं. ५ ४४ या सूक्तांतील १३ व्या ॠचेत याचा उल्लेख नसून त्याच सूक्तांत याच्या बरोबर एवावद, यजत, संघ्रि, अवत्सार विश्ववार, मायिन, सदापृण, बाहुवृक्त, श्रुतवित् तर्य यांचा उल्लेख आहे. सदरहू सूक्ताचा द्रष्टा अवत्सार (काश्यप) हा आहे. या सूक्तात अत्रीचा उल्लेख नाहीं.
पीर- हा ५ ७३ व ७४ या दोन सूक्तांचा द्रष्टा आहे. याला आत्रेय म्हटलें आहे. ७३ सूक्तांतील ६ व ७ या ॠचांत अत्राचा उल्लेख आहे. ७४ सूक्तांतील चवथ्या ॠचेत पौर याचा उल्लेख आहे वरील दोन्ही सूक्तांत आत्रेय पौर असा उल्लेख नाहीं. परंतु सूक्तांत अत्राचा उल्लेख येत असल्यामुळे संशयास जागा आहे.
वसुयु- ५. २५ व २६ या दोन सूक्तांचे वसुयु नामक दोन ॠषा द्रष्ट असून त्यांनां आत्रेय म्हटले आहे. ॠग्वेदांत ‘वसुयु’ ‘वसूयवः’ ही पद ब-याच ठिकाणी आली आहेत. परंतु ती व्यक्तिवाचक नाहीत. वरील ५. २५. या सूक्तांतील शेवटच्या ॠचेत ‘वसूयवः’ या पदाचा व्यक्तिवाचक अर्थ केला आहे.
विश्वसामन- हा ५. २२ या सूक्ताचा द्रष्टा असून याला आत्रेय म्हटले आहे. सदरहू सूक्ताच्या पहिल्याच ॠचेंत विश्वसामन व अत्रि यांचा उल्लेख आहे परंतु विश्वसामन हा आत्रेय असा स्पष्ट उल्लेख नाहीं. ॠग्वेदांत दुसरीकडे विश्वसामन्चा उल्लेख नाहीं.
अवस्यु- हा. ५. ७५ या सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. सदरहू सूक्ताच्या आठव्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. परंतु त्यावरून तो आत्रेय असल्याचा बोध होत नाहीं. ॠग्वेदांतील इतर ठिकाणच्या ‘अवस्यु’ पदाचा व्यक्तिवाचक अर्थ नाहीं.
प्रतिप्रभ- ५. ४९ या सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. सदरहू सूक्तांत अत्राचा उल्लेख नाहीं. ॠग्वेदांत प्रतिप्रभ याचा उल्लेख नाहीं.
सदापृण- ५. ४५ या सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. सदर सूक्तांत अत्रीचा अथवा याचा उल्लेख नाहीं. सदापृणाचा ॠग्वेदांत एकदांच ५. ४४, १२ या ठिकाणीं उल्लेख आहे, परंतु त्यांत अत्रीचा संबंध नाहीं.
बाहुवृक्त- ५. ७१ व ७२ या दोन सूक्तांचा व ५. ४४, ११ या ॠचेचा द्रष्टा आणि आत्रेय आहे. वरील दोन सूक्तांपैकी ७१ सूक्तांतील १ ल्या ॠचेंत अत्रीचा उल्लेख आहे. व ५. ४४ ११ या ॠचेतच बाहुवृक्त याचा उल्लेख आहे परंतु बाहुवृक्त आत्रेय असा प्रत्यक्ष उल्लेख नाहीं.
श्रुतवित्-१ ६१ या सूक्ताचा द्रष्टा याला आत्रेय म्हटलें आहे. वरील सूक्तांत याचा अथवा अत्रीचा उल्लेख नाहीं. ॠग्वेदांत ५. ४४, १७ या एकाच ठिकाणीं याचा उल्लेख आहे. परंतु तेथे तो आत्रेय असल्याबद्दल नाहीं.
यजत- आला ५. ६७ व ६८ या सूक्तांचा द्रष्टा आणि आत्रेय म्हटलें आहे. वरील सूक्तांत यजताचा उल्लेख नाहीं. ५. ४४. १० व ११ या ॠचात याचा उल्लेख आहे परंतु तो आत्रेय असल्याबद्दल नाहीं ॠग्वेदांत वरील शिवाय यजत याचा व्यक्तिवाचक अर्थ केलेला नाहीं.
उरुचक्रि- हा ५. ६९ व ७० या सूक्तांचा द्रष्टा असून याला आत्रेय म्हटलें आहे. ॠग्वेदांत उरुचक्रि पद २. १८, ५; ६७, ४;८. १८, ५; ९. ८९, ४ या चार ठिकाणी असून त्याचा व्यक्तिवाचक अर्थ कोठेच केलेला आढळत नाहीं.
सस- हा ५. २१ या सूक्ताचा द्रष्टा असून याला आत्रेय म्हटले आहे. सदरहू सूक्तांत चवथ्या ॠचेंत ‘समस्य’ असें पद आले आहे. त्याचा सायणांनी ससॠषि असा अर्थ केला आहे. ॠग्वेदांत आणखी ४१२ ठिकाणी ‘ससस्थ’ हें पद आले आहे. परंतु त्याचा व्यक्तिवाचक अर्थ केलेला नाहीं. वरील ५, २१ या सूक्तांतील सस हा ॠषि मानला तरी तो आत्रेय असल्याचे ठरत नाही.
त्र्यरूण- हा ५. २८ या सूक्ताचा विकल्पानें द्रष्टा आहे. याला त्रिवुष्णिपुत्र असें म्हटलें आहे. त्याबद्दलचा उल्लेख सदर सूक्ताच्या १ ल्या ॠचेंत आहे. यावरून हा त्रिवृष्णिपुत्र ठरतो परंतु आत्रेय असल्याचे ठरत नाहीं.
बंधु. सुबंधु. श्रुत बंधु विप्र बंधु- हे चार ॠषि ५. २४ व १०.६० या सूक्तांचेद्रष्ठे. यांनां गोपायनपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत गोपायन अथवा बंधु, श्रुतबंधु, विप्रबंधु यांचा उल्लेख नाहीं. फक्त सुंबंधूचा उल्लेख १०. ६०, १० येथे आहे. परंतु तो आत्रेय अथवा गोपायन पुत्र असल्याचा नाहीं.
स्वस्ति- ५. ५० व ५१ या सूक्तांचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटले आहे. वरील दोन्ही सूक्तांत स्वस्ति शब्द फार वेळ आला आहे परंतु तो व्यक्ति या अर्थानें नाहीं. सू. ५१, यांतील ८, ९ व १० या ॠचांत अत्रीचा उल्लेख आहे परंतु स्वस्ति ही व्यक्तीच नसल्यामुळें तिला आत्रेय म्हणतां येत नाहीं.
विश्ववारा- (स्त्री) अनुक्रमणीप्रमाणें ५. २८ या सूक्ताची ही द्रष्टी आहे. वरील सूक्ताच्या पहिल्या ॠचेंत विश्ववारा हें पद आलें आहे. परंतु ते प्राची दिशेचे विशेषण आहे. ॠग्वेदांत व्यक्तिवाचक अर्थानें विश्ववारेचा कोठेंच उल्लेख नाहीं.
गय- ५. ९ व १०; १०. ६३ व ६४ या सूक्तांचा द्रष्टा असून याला अनुक्रमणीकार ५ व्या मंडलांत आत्रेय व १० व्या मंडलांत प्लतिपुत्र असें म्हणतात. तेव्हां ५ व्या व १० व्या मंडलांतील सूक्ताकार गय एकच की दोन हें समजत नाहीं. ५. १०, ३ यांत गय पद आहे. परंतु त्याचा गृह असाच अर्थ केला आहे. १०. ६३ व ६४ या सूक्तांत १७ व्या ॠचेंत हा गय प्लतिचा मुलगा असल्याचा उल्लेख आहे. ‘प्लतेःसुनूः’ व ‘प्लति’ असा तेथें उल्लेख आहे. यावरून गय हा प्लतीचा मुलगा असल्याचें ठरतें. अत्रीच्या कुलांतील असल्याचें ठरत नाहीं. प्लति हा कोणत्या कुलांतील होता याचा उल्लेख नाहीं.
द्वित- हा. ५. १८ व ९. १०३ या दोन सूक्तांचा द्रष्टा असून याला ९., १०३ येथें आप्त्य म्हटलें आहे. व ५. १८, २ येथें आत्रेय म्हटलें आहे. व ८. ४७ या त्रितानें दृष्ट असलेल्या सूक्तांतील १६. व्या ॠचेंत याचा उल्लेख आहे. वरील ठिकाणीं तो आप्त्य असल्याचा उल्लेख नाहीं. ८. ४७ १६ येथें द्वित व त्रित यांचा उल्लेख असून त्रित हा आप्त्य असल्यामुळे द्वितास आप्त्य म्हटले असावे प्रत्यक्ष आप्त्य द्वित असा उल्लेख नाहीं.
त्रित- १.१०५, ८. ४७;९. १०२; १०. १ ते ७ या सूक्तांचा द्रष्टा आहे. याला आप्त्य म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी मं. १, ८ व ९ यातील सूक्तांत याचा उल्लेख असून ८.४७,१४;१५ या ॠचांत ‘आप्त्याय त्रिताय’ ‘आप्त्ये त्रिते’ असा उल्लेख आहे. ॠग्वेदांत त्रितांचा उल्लेख पुष्कळ ठिकाणीं आहे. परंतु तो आत्रेय असल्याबद्दल नाहीं.
भुवन, साधन- हे १०. १५७ या सूक्तांचे द्रष्टे आहेत. यांनां आप्त्य- आप्त पुत्र म्हटलें आहे. वरील सूक्तांत ‘भुवना’ पद आहे त्याचा व्यक्तिवाचक अर्थ नाहीं. ॠग्वेदांत भुवन व साधन या व्यक्ती म्हणून उल्लेख नाहीं.
विश्वकर्मन्- हा १०. ८१ व ८२ या सूक्तांचा द्रष्टा. याला भुवनपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत व वरील सूक्तांत विश्वकर्मा शब्द फार ठिकाणीं आला आहे. त्याचा सर्वत्र ‘परमेश्वर’ असाच अर्थ केलेला आहे. परंतु वरील सूक्तांपैकी ८१. १ व ८२, ४ या सूक्तांमध्यें सायणांनी त्याचा सूक्तद्रष्टा असा अर्थ केला आहे. भुवनपुत्र विश्वकर्मन असा ॠग्वेदांत उल्लेख नाहीं.
अपाला- ८, ८० या सूक्तांची द्रष्टी हिला अत्रिसुता असें म्हटलें आहे. सदर सूक्ताच्या ७ व्या ॠचेंत इचा इल्लेख आहे परंतु ती अत्रिसुता असल्याचा नाही.
प्रतिभानु- ५. ४८ या सूक्ताचा द्रष्टा.याला आत्रेय म्हटलें आहे परंतु ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
प्रतिभः ५. ४९ या सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. परंतु ॠग्वेदांत उल्लेख नाहीं.
स्वस्त्यात्रेय- ५. ५० व ५१ या सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं ५१ व्या सूक्तांत ‘स्वस्ति’ शब्द बराच आला आहे व ८. ९, १० या ॠचांमध्यें अत्रीचा उल्लेख आहे. यावरून या सूक्तांच्या द्रष्टयाला स्वस्त्यात्रेय म्हटलें असावें.
गातु- ५. ३२ या सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. सदर सूक्तांत व ॠग्वेदांत याचा व्यक्तिवाचक अर्थानें उल्लेख नाहीं.
एवयामरूत्- ५. ८७ या सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे.सदर सूक्तांत एवयामरुत हें पद प्रत्येक ॠचेंत आहे म्हणूनच या सूक्ताचा द्रष्टा एवयामरुत आहे असें म्हटलें असावें. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
बुधगविष्ठिर- ५. १ सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. सदर सूक्ताच्या १२ व्या ॠचेंत याचा उल्लेख असून १०. १५० या मृळीक सूक्तकाराच्या सूक्तांतील ५ व्या ॠचेंत अत्रीसह उल्लेख आहे. परंतु त्यावरून हा आत्रेय होत नाहीं.
कुमार- ५. २ या सूक्ताचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. वरील सूक्तांत कुमार पद पुष्कळ वेळां आलें आहे परंतु ते अग्नीचें विशेषण आहे. ॠग्वेदांत कुमार याचा व्यक्तिवाचक अर्थाने उल्लेख नाहीं.
पुरु- ५. १६ व १७ या सूक्तांचा द्रष्टा. याला आत्रेय म्हटलें आहे. १७. १ यांत पुरू याचा उल्लेख आहे. परंतु तो सूक्तांचा द्रष्टा या अर्थानें नाहीं. सामान्य मनुष्य या अर्थी आहे. ॠग्वेदांत सायणांनीं सर्व ठिकाणीं पुरु याचा मनुष्य असाच अर्थ केला आहे.
सत्यश्रवस्- ५. ७९ व ८० या सूक्तांचा द्रष्टा असून याला आत्रेय म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी ७९ या सूक्तांतील पहिल्या तीन ॠचांत ‘सत्यश्रवस वाय्य’ असा उल्लेख आहे. परंतु अनुक्रमणीकार याला वय्यपुत्र असें म्हणत नाहींत. वरील स्थलाशिवाय ॠग्वेदांत सत्यश्रवस् याचा आणखी उल्लेख नाहीं व तो आत्रेय असल्याचाहि उल्लेख नाहीं.
सप्तवघ्रि- ५. ७८ या व विकल्पानें ८. ६२ या सूक्तांचा द्रष्टा असून याला आत्रेय म्हटलें आहे. ५. ७८, या सूक्तांत ५, ६ या ॠचांत याचा उल्लेख असून ८. ६२, ९ या ठिकाणीं व १०. ३९,९ या ॠचेंत उल्लेख आहे. वरील सर्व ठिकाणीं तो आपणांबरोबर अत्रीचा उल्लेख करीत आहे. यावरून तो अत्रिकुलांतील असावासें दिसतें.
रातहव्य- ५. ६५ व ६६ या सूक्तांचा हा द्रष्टा असून याला आत्रेय म्हटलें आहे. वरील सूक्तांपैकी ६५, ३ या ठिकाणी रातहव्याचा उल्लेख आहे. परंतु तेथे अत्रीचा कांही संबंध येत नाही. ॠग्वेदांत रातहव्याचा उल्लेख पुष्कळ ठिकाणी आहे, परंतु त्याचा व्यक्तिवाचक अर्थ कोठेंच केलेला नाही.
वसुश्रृत- हा ५ ते ६ या सूक्तांचा द्रष्टा याला आत्रेय म्हटलें आहे. सदर चार सूक्तांत व ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
इष- ५. ७ व ८ या सूक्तांचा द्रष्ट. याला आत्रेय म्हटलें आहे.वरील सूक्तांत इष याचा उल्लेख नाहीं. ५. ७ यांतील १० व्या ॠचेंत अत्रीचा उल्लेख आहे. इष याचा व्यक्तिवाचक अर्थानें ॠग्वेदांत उल्लेख नाहीं.