प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

गोतमकुल
(२) सर्वानुक्रमणीसिद्ध कुलसंबंध व ॠग्मंत्र सिद्ध वंशसंबंध- रहूगणाचा मुलगा गोतम. गोतमाचा मुलगा नोधा.

(३) सर्वानुक्रमणीसिद्ध वंशसंबंध व कुलसंबंध- रहूगणचा मुलगा गोतम. गोतमाचे मुलगे नोधा व वामदेव. नोधस्चा मुलगा एकद्यू व वामदेवाचा मुलगा बृहद्दिव.

गोतम- या सूक्तकाराकडे १. ७८; व ९ ३१ य सूक्तांचे वर्तृत्व आहे. अनुक्रमणीकार याला रहुगणपुत्र असें म्हणतात. १. ७८ या सूक्तांत बहुतेक सर्व ॠचामध्यें गोतमाचा उल्लेख असून ५ व्या ॠचेंत तो आपणास रहूगणाः म्हणवितो यावरून तो रहूगण याचा मुलगा असावा.
नोधा- ॠ. १. ५८ ते ६४ या सूक्ताचा हा द्रष्टा. अनुक्रमणींत याला गोतमपुत्र म्हटलें आहे. तो ज्या सक्ताचा
द्रष्टा आहे. त्यापैकी १. ६१, १४; ६२, १३; ६४, १ या ॠचेंत त्याचा उल्लेख असून १. ६२, १३;६०, ५;६१, १६ या ॠचेत तो आपणास गोतमासः (गोतमपुत्राः) म्हणवितो. यावरून तो गोतमपुत्र असावा असें वाटतें.
एकद्यू- ८. ६९ या सूक्ताचा हा द्रष्टा असून याला अनुक्रमणीकार नोधसपुत्र असें म्हणतात. यानें द्रष्ट असलेल्या सूक्ताच्या ८ व्या ॠचेंत फक्त ‘एकद्यू’ असें पद आलें आहे. परंतु त्यात तो नोधसपुत्र असल्याचा उल्लेख नाहीं; व अन्यत्रहि तसा उल्लेख नाहीं.
वामदेव- हा मंडळ ४ चा द्रष्टा असून त्याला अनुक्रमणींत गोतमपुत्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत फक्त ४. १६, १८ या एकाच ठिकाणी वामदेवाचा उल्लेख आहे. ४.४, ११ या ॠचेंत तो आपणांस गोतमपुत्र म्हणवीत आहे. पण हें सूक्त वामदेवाचेंच असल्याबद्दल निश्चितता नसल्यामुळे वामदेवाला गोतमपुत्र निश्चितपणें म्हणतां येत नाहीं.
बृहदुक्थ- हा १०. ५४ ते ५६ या सूक्तांचा द्रष्टा आहे व त्यामध्येंच त्याचा उल्लेख आहे, परंतु त्यावरून तो वामदेवपुत्र ठरत नाहीं. ॠग्वेदांत वरील स्थलाशिवाय अन्यत्र याचा उल्लेख नाही.