प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
गोत्रप्रवरसंबंध व गोत्रप्रवर्तक मुख्य ॠषी - गोत्रें उत्तरकालीन आहेत ही कल्पना मान्य झाली म्हणजे ब्राह्मणेतिहासांतील जे धागे उलगडावयाचे ते येणें प्रमाणें-
(१)गोत्रांचा प्रवरांशी संबंध काय?
(२) गोत्रांचा संबंध प्रवरांशी लावून सर्व जनता सप्तर्षिसंभव आहे ही कल्पना कशी उद्भुत झाली?
(३) प्रवरसंस्थापक सप्तर्षि आणि सहस्त्रावधि गोत्रें यांचा संबंध काय?
(४) विशिष्ट सप्तर्षीनां महत्त्व कसें प्राप्त झाले?
(५) गोत्रांचा व प्रवरांचा धर्मकृत्यांशीं संबंध?
(६) गोत्रांचा व प्रवरांचा विवाहविधीची संबंध काय ?
(७) गोत्रांचा व प्रवरांचा मंत्रद्रष्टयांशी व वैदिक शाखांशीं संबंध काय होता?
या इतक्या बाजूंनीं विवेचन झालें म्हणजे ब्राह्मणजातीच्या अंतर्घटनेचें स्पष्टीकरण झालें असें होईल.
वरील प्रश्नांपैकी पहिले चार प्रश्न विचारासाठीं प्रथम घेऊं.
ॠषींचीं नांवें, त्यांच्या मुलांची त्यांच्या नांवांपासून निघालेलीं नांवे आणि मुलांच्या नांवांनां तद्वित प्रत्यय लागून झालेली त्यांची पौत्र नामें याप्रकारची नांवें मंत्रात बरीच आहेत. तथापि अनेक ॠषी विशिष्ट प्रवररचनेनें एकत्रित केलेले दिसत नाहींत.
प्रवरांशी गोत्रांचा संबंध सूत्रकालीन होय. सूत्रकारांनी प्रवरॠषी हे व्यक्तीचे गोत्रसंस्थापकापूर्वीचे पूर्वज बनविले आहेत. पण त्या विधानास वेदांत प्रमाण नाहीं.
वेदांत प्रवरासारखा उल्लेख कायतो एकच आहे. तो आर्षेयवरणविषयक होय (तै. सं. २.५,८) म्हणजे अशी कल्पना होते कीं श्रौती मंडळींचे आठ संप्रदाय स्थापन झालें आणि त्यावेळचे आचार्य किंवा विद्याभ्यासी या आठांपैकी कोणत्याना कोणत्या सम्प्रदायांत समाविष्ट होत.
वरण या शब्दाचा अर्थच निवड, स्वीकारणें असा आहे. म्हणजे त्यावेळचा शालंकायन किंवा बैधायन हा अगस्त्य किंवा वसिष्ठ इत्यादि कोणत्या तरी ॠषीपासून जे संप्रदाय स्थापन झाले त्यापैकी एकाचा स्वीकार करी. म्हणजे ते त्याचे प्रवर झाले.
हा गोत्रप्रवरांचा इतिहास पूर्णपणें लक्षांत येण्यासाठी प्राचीन निरनिराळया विद्येमुळे किंवा आचारामुळें झालेल्या संप्रदायाचें एकत्रित अवलोकन केलें पाहिजे. विशेषतः वेदामुळें म्हणजे यज्ञांतील कोणता भाग करावयास आपण तयार व्हावें याविषयींच्या तयारीमुळें ॠग्वेदी, यजुर्वेदी हे झालेले भेद खरोखर संप्रदायच होत.
याच संप्रदायाचें पुढें उपसंप्रदाय पडले. ते शाखा या नांवानें लोकांस परिचित आहेत. या शास्त्राचे पुढे आणखी उपसंप्रदाय झाले ते सूत्राच्या नांवाने प्रसिद्ध आहेत. अग्निहोत्री पुढें कोणत्याना कोणत्या तरी सूत्राचा परिग्रह करी, आणि आपलें विशेष संप्रदायांशी नातें जोडी. अमुक एक होत्यांच्या संप्रदायाशीं अमुक एक अघ्वर्यूचा संप्रदाय सहकारिता करी आणि इतरांशीं असहकारिता करी. यामुळें अग्निहोत्र्यास कोणत्या तरी पक्षास मिळावें लागे. ॠग्वेदी किंवा यजुर्वेदी हे कर्मविशिष्ट संप्रदाय होत परंतु शुक्लयजुर्वेदी किंवा कृष्णयजुर्वेदी हे पक्षविशिष्ट संप्रदाय होत.
पक्षविशिष्ट संप्रदाय कर्मविशिष्ट संप्रदायानंतरचे होत. या कर्मविशिष्ट संप्रदायाच्या स्थापनेपूर्वी देखील म्हणजे ॠत्विजांत हाते,उद्गाते व अघ्वर्यू असा भेद उर्फ विशिष्टीकरण होण्यापूर्वी देखील विद्यामूलक अगर आचारमूलक संप्रदाय होतेच. यज्ञसंस्था जी तयार झाली ती आचार संहितांनी युक्त म्हणून दिसते तशी तयार होण्यापूर्वी अनेक संप्रदाय चालू असलेले दिसतात; ते येणेप्रमाणेः-
(१) गोत्रमंडळात दृष्ट होणारे संप्रदाय.
(२) प्रवर संस्थापक ॠषी व त्यांचे संप्रदाय.
(३) आप्रीसूक्तदृष्ट ॠषी व त्यांचे संप्रदाय.
(४) ज्यांच्या नांवांवरून विशिष्टक्रिया अगर कर्माग उत्पन्न झालें त्यांचा संप्रदायांशी संबंध.
(५) सत्रमूलक संप्रदाय.
गोत्रमंडळामुळें ज्या संप्रदायांचे अस्तित्व कळून येतें ते संप्रदाय म्हटले म्हणजें गृत्समद, विश्वामित्र, वामदेव, अत्रि, भारद्वाज, वसिष्ठ. जे ऋषी कोणत्याच मंडळांत किंवा संप्रदायांत नाहींत असे मंत्रद्रष्टे पहिल्या, आठव्या, नवव्या व दहाव्या मंडळांत घातले आहेत.
प्रवरसंस्थापक ॠषी म्हटले म्हणजे कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गोतम,जमदग्नि, वसिष्ठ व आठवा अगस्ति असे धरले जातात. अनेक ॠषींच्या नांवाची गोत्रे आहेत. ती सर्व वरील ॠषीच्या नांवावर स्थापन झालेल्या प्रवरांशी जोडली जातात.
या प्रवरस्थापकांमध्यें आंगिरसाचे नांव दिलेले नाहीं. आंगिरस हा तर अत्यंत प्राचीन काल्पनिक पुरुष अगर प्रत्यक्ष अग्नि होय. असें शक्य आहे कीं जे ॠषी कोणत्याच पुरुषास आपला संप्रदायप्रवर्तक म्हणून मान्य करीत नसतील ते आंगिरस वरण करीत असावेत.
आप्रीसूक्त म्हणजे काय याचें विवेनन पूर्वी केलेंच आहे. आणि आप्रीसूक्तांवरून जे संप्रदाय दिसून येतात त्या संबंधीहि बरेच विवेचन झाले आहे.
या अनेक संप्रदायांची तोंडमिळवणी करून सर्वसामान्य श्रौतधर्म तयार करण्याची खटपट चालू असे. त्या खटपटीची अंगें अनेक होती. एक अंग म्हटलें म्हणजे अनेक संप्रदायातींल विध्यंश घेऊन कर्मकल्पना करणें, दुसरें अंग म्हटलें म्हणजे कर्मामध्यें कांहीं संप्रदायाचें वैशिष्टय कायम राहावे म्हणून ऐच्छिक क्रिया ठेवणें. या दोन्ही क्रियांचे परिणाम यज्ञसंस्थेवर झालेले दिसत आहेत.
काहीं संप्रदायामध्यें विशिष्ट कर्मे रूढ होती. उदाहरणार्थ, आंगिरसामध्यें द्विरात्र, गर्गात, त्रिरात्र, अत्रींत चतूरात्र. जमदग्नीमध्येंहि एक त-हेचा चतूरात्र होताच. उद्दालकपुत्र कुसुरुबिंद याच्या नांवावर सप्तरात्र इत्यादि संस्था व्यक्तीच्या किंवा संप्रदायाच्या दिसतात. सोमयागसंस्था पूर्ण होऊन यजुर्वेद व ब्राह्मणें तयार होण्यापूर्वीच या संस्था. ज्या क्रियेनें सामान्य एकाहि क्रतु झाला त्याच क्रियेनें या इतर संस्था बनल्या असाव्यात.
जेव्हां अनेक संप्रदायाचें एकीकरण झालें व अनेक गोत्रांमधून ज्याप्रमाणें हौत्र तयार झालें. त्याचप्रमाणें सामान्य यज्ञघटना बनवितांना प्रत्येक वरील संप्रदायापाशीं देव घेव करून यज्ञाची मांडणी सर्वमान्य करण्यांत आली असावी.
पुढें असें दाखविण्यांत येईल की सत्रांची मांडणी सामान्यतः घेऊन त्याच्या संक्षेपानें सोमयाग झाला असावा. ही कल्पना खरी असल्यास असें म्हणावें लागेल कीं, सत्रांचा काल व संत्रे संकोच पावून सोमयाग तयार होण्याचा काल यांच्यामध्ये गर्ग, आंगिरस इत्यादि मंडळींनीं आपापल्या पुरते सत्रसंक्षेप तयार केले असावेत व त्यांच्यामुळे जे संप्रदाय तयार झाले असतील त्यांच्या क्रियांचे एकीकरण व व्यवस्थितकरण होऊन सर्वजनसामान्य असा यागसमुच्चय तयार झाला असावा.