प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

गोत्रांची उत्पत्ती मांत्र की देश्य संस्कृती?

गोत्रें म्हणजे ज्या समुच्चयांतील लोकांनीं आपापसांत विवाहसंबंध करतां कामा नये असे पुंज, अशी लोकांत आज कल्पना रूढ आहे. असेल समुच्चय मांत्रसंस्कृतीच्या लोकांत होते असें  मंत्रांमधून तर मुळीच सिद्ध होत नाहीं, आणि प्रवरहि मंत्रांत नाहीत तर ही गोत्रप्रवरात्मक सृष्टि आली कोठून? ही उत्तरकालीं त्याच संस्कृतीतून विकास पावली असेंहि म्हणतां यावयाचें नाहीं. कां कीं मांत्रसंस्कृतीच्या लोकांचे वाङ्मयरूपी साहित्य आपणाजवळ भरपूर आहे. जर गोत्रविहीन समाजापासून गोत्रसंस्था तयार होत गेली असती तर या विकासाच्या मधल्या पाय-या दाखविणारे वाङ्मयरूपी किंवा शब्दरूपी उल्लेख आपणांस खास सांपडले असते. परंतु तसे उल्लेख आपणांस आरण्यकान्त वाङ्मयांत कोठेंच सांपडत नाहींत. ज्या समुच्चयाबाहेर लग्न केलें पाहिजे असे समुच्चय काश्मीरपासून द्राविडपर्यंत अनेक जातींत सांपडतात. एवढेंच नव्हें तर रशियापासून ऑस्ट्रेलियापर्यंत देखील सांपडतात. कांही समुच्चयांत बहिर्विवाहाची सक्ती जास्त असते व काहींत कमी असते एवढेंच. या त-हेचा बहिर्विवावह समाजांत उत्पन्न झाला तो कां या विषयीं मानववंशशास्त्रज्ञांनी बरीच कारणें पुढें मांडली आहेत. त्यांतील एक कारण असें कीं समुच्चया समुच्चयांतच लग्न करणें ‘नामर्दपणाचें आहे’. खरे मर्दाचे काम म्हणजे शत्रूच्या गोटांतील मुलगी पळवून आणावयाची ही कल्पना समाजाच्या अत्यंत बाल्यावस्थेंत कदाचित् खरीही असेल पण या कल्पनेच्या  साहाय्यानें भारतीय ब्राह्मणांमध्ये बर्हिविवाह का उत्पन्न व्हावा याचें स्पष्टीकरण होणार नाहीं. कां कीं, परसमुच्चयांतून मुलगी पळवून आणण्याचें महत्त्व किंवा त्या क्रियेस अनुकूल परिस्थिती ही जो देश वसलेला आहे व ज्या देशांत राजसंस्था स्थापित झाली आहे अशा देशांत नसते आणि परसमुच्चयांतून मुलगी पळवून आणण्याचें महत्त्व हौत्रांत किंवा औद्गात्रांत तयार झालेल्या भिक्षुकांत कोठून उत्पन्न होणार? अर्थात बहिर्विवाहाचीं स्वाभाविक कारणें उत्पन्न होऊन बहिर्विवाह मांत्रसंस्कृतीच्या लोकांत स्थापित झाला हें शक्य नाहीं. जर स्वाभाविक कारणांमुळे उत्पन्न झाला नसेल तर त्याच्या अस्तित्वाची उपपत्ति अनुकरणाशिवाय दुसरी कशांत सांपडणार? याचा थोडक्यांत अर्थ असा की ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतरांचे अनुकरण केले. परंतु तुझ्यावर माझी कडी पाहिजे असा प्रकार मात्र केल्याशिवाय ते राहिले नाहींत. त्यांनी लौकिक गोत्र व अध्यात्मिक गोत्र असा निराळा भेद उत्पन्न करून आपली गोत्रें ब्राह्मणेतरांवर लादलीं आणि पुष्कळ प्रसंगी आपल्या शिष्यांस (उदाहरणार्थ रजपूतांस) अशी शिकवण दिली कीं, लौकिक गोत्रांचे विवाहादि प्रसंगांत अध्यात्मिक गोत्रापेक्षां महत्त्व कमी.