प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

द्विरात्र, षडरात्र व द्वादशाह हे क्रतू सत्रांगच होत असा पुरावा - द्वादशाह नामक यज्ञाच सत्राग व अहीन (स्वतंत्र) असे दोन प्रकार आहेत. या दोन प्रकारांत वस्तुतः काहीं भेद नाहीं. कारण ‘अहीन’ अथवा सत्रांग या दोनहि द्वादशाहांत कोणता तरी एक ज्योतिष्टोमविशिष्ट विधि करून सोमयाग करावयाचा असतो. ‘आसीरन्’ ‘उपेयुः’ अशी चोदनायुक्त पदें जेव्हा वेदांत आढळतात तेव्हां ते बहुयजमानयुक्त असें सत्र समजलें जातें. व ‘यजति’ असें एकवचनी पद जेथें आढळतें तेथे सत्रकर्ता यजमान एकटाच अभिप्रेत असतो.यावरून ज्या द्वादशाहांत सर्वच ॠत्विज यजमानरूपानें असतात तो द्वादशाह सत्ररूप होय व ज्या द्वादशाहांत एकच यजमान असून तो ॠत्विजांच्या सहाय्यानें अनुष्ठान करतो तो अहीन द्वदशाह होय. प्राचीन सत्राचा संकोच झाल्यावर द्वादशाह यज्ञाची कल्पना निघालेली दिसते. मोठाल्या सत्रांतूनच द्विरात्रादि द्वादशाहान्त क्रतू निघाले आहेत. द्विरात्र यज्ञामध्यें चार प्रकार आहेत, त्यापैकी एक प्रकार अंगिरस कुलांतील हविष्मत्  व हविष्कृत या दोन व्यक्तीच्या नांवावर प्रचलित झाल्याचें वर्णन आढळतें. ती कथा अशी- अंगिरसाचें सत्र चाललें असता त्यांच्यापैकी हविष्मत व हविष्कृत यांनी अग्निष्टोम व अतिरात्र हे दोन क्रतू जोडून द्विरात्र नांवाचा एक यज्ञ करून ते स्वर्गास गेले असा उल्लेख तैत्तिरीय संहितेंत (७.१,४) आला आहे. अहीनापैकी षड्रात्र क्रतूस देवसत्र असें नांव दिले आहे. यावरूनहि मोठया संत्रांचा संकोच कसा होत होता हें दिसून येण्यासारखें आहे. वास्तविक तेरा दिवसांपेक्षा अधिक मुदतीचा सामुच्चयिक यज्ञ असेल तर त्याला सत्र म्हणणे युक्त होईल. परंतु साध्य नामक देवांनी षड्रात्र क्रतूच सामुच्चयिक म्हणजे सत्ररूपानें केला, अशात-हेची कथा सांगून षड्रात्र क्रतूला देवसत्र हें नांव दिलें गेलें. सत्राचा संकोच होऊन त्यांतूनच एकहि, द्विरात्रादि अहीन क्रतू निर्माण झाले याला दुसरा पुरावा असा देतां येईल कीं, सत्रातील कांही गोष्टी. अहीन क्रतूमध्यें आणून त्यांनांच सत्र असें नांव देऊन त्यावरच सत्रांसंबंधी तहान भागाविण्याचा प्रकार चालू झाला होता. उदाहरणार्थ हविर्धान व आग्नीघ्रीया या दोन मंडपांची उभारणी चाकें असलेल्या गाडयावर करणे; यूपस्तंभ मोठया बुडाचा म्हणजे वाटेल तेथे जमिनीवर उभा करतां येईल अशा प्रकारचा करणें इत्यादि सत्रांतील गोष्टीचा षड्रात्र क्रतूमध्यें समावेश केला आहे.