प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
प्रवरण विधि - द्वादशाहामध्यें करावयाचा सामुच्चयिक प्रवरणविधि म्हणजे असाः- प्रथम गृहपतीच्या अवराचा उच्चार करून नंतर होता, अध्वर्यु, ब्रह्मा व उद्गाता या चार प्रमुख ॠत्विजाचें प्रवरोच्चारण झाल्यावर पुढें अनुक्रमें प्रतिप्रस्थाता, मैत्रावरूण वगैरे सर्व ॠत्विजांचे प्रवरोच्चारण करावयाचें.
दीक्षाहुतीच्या वेळी अघ्वर्यूनें दीक्षाहुति द्यावी व अघ्वर्यूला इतरांनी अन्वारब्ध (हरतस्पर्श) करावा. कृष्णाजिन परिधानाच्या वेळी अघ्वर्यूने प्रथम गृहपतीकडून मंत्र पठण करवावा. नंतर सर्वांकडून करवावा. अग्निष्टोमादि क्रतूंमध्यें सुत्येच्या दिवशीं प्रातःसवनांत ॠतुयागासंबंधी याज्या पठण करावयाच्या असतात त्या अध्वर्यु, यजमान व प्रतिप्रस्थाता यांच्याकरितां होत्यानें पठण करावयाच्या असतात. परंतु सत्रांमध्यें मात्र त्यांनी होत्यास म्हणावयास न सांगतां स्वतःच म्हणावयाच्या असतात.
सत्रांग द्वादशाहांत बारा दिवस दररोज जे अनुष्ठान व्हावयाचें तें प्रथमदिवशी अतिरात्र, दुस-या दिवशीं अग्निष्टोम नंतर पुढें सहा दिवस उक्थ्य. व पुढें तीन दिवस छंदोम आणि शेवटच्या दिवशीं अग्निष्टोम याप्रमाणें बारा दिवस अनुष्ठान करावयाचें असतें. आता सत्रावरूनच सोमयाग उत्पन्न झाले काय हे पाहूं.