प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

प्रवरसंस्थापक ॠषीचें महत्त्वस्थापन - येथें आपण प्रश्न विचारांत घ्यावयाचा तो हा कीं, प्रवरांचे संस्थापक म्हणून कांही ॠषींनां महत्त्व कां प्राप्त झालें? ॠषींनां विशिष्ट महत्त्व प्राप्त होऊन त्यांचे समुच्चय पाडण्याचे प्रसंग प्राचीन इतिहासांत चार सांगता येतील. ते म्हटले म्हणजे गोत्रमंडळांचे ॠषी, प्रवरसंस्थापक ॠषी, आप्रीसूक्तांत विधि भिन्नत्त्वामुळें उत्पन्न झालेले ॠषी व आकाशांतील सप्तर्षी. यांमध्यें असें म्हणतां येईल की आकाशांतील सप्तर्षी हें सर्व प्रवरसंस्थापक नऊ ॠषींमध्यें  मोडतील आणि भारद्वाज व गोतम खेरीज करून इतर सर्व प्रवरसंस्थापक ॠषी आप्रीसूक्तांत विधिभिन्नत्व उत्पन्न करणा-या ॠषींमध्यें मोडतील. या चौघांचा संबंध दाखविणारें कोष्टक येणेंप्रमाणें.

 गोत्रमंडळाचें ॠषी  प्रवरसंस्थापक ॠषी  आप्रीमध्यें विधिभिन्नत्वकारक  आकाशांतील सप्तर्षी
 गुत्समद
 विश्वामित्र  विश्वामित्र  विश्वामित्र  विश्वामित्र
 वामदेव
 अत्रि  अत्रि  अत्रि  अत्रि
 भरद्वाज  भरद्वाज  भरद्वाज
 वसिष्ठ  वसिष्ठ  वसिष्ठ  वसिष्ठ
 कश्यप  कश्यप  कश्यप
 अगस्त्य  अगस्ति
 गोतम  गौतम
 जमदग्नि  जामदग्न्यभार्गव  जमदग्नि
 आंगिरस  आंगिरस
 कण्व  कण्व
 शुनक
 वघ्र्यश्व

प्रवरसंस्थापक ॠषी म्हणून जे समजले गेले त्यांस महत्त्व कसें प्राप्त झालें हें दाखविण्यास वरील कोष्टक उपयोगी पडेल. विश्वामित्र, अत्रि, भरद्वाज आणि वसिष्ठ यांच्या नांवावर तर ॠग्वेदांतील एक एक मंडळच आहे आणि भरद्वाजाखेरीज तिघांचा संबंध ॠग्मंत्राचा श्रौत कर्माकडे उपयोग करतांना गोत्राकडे लक्ष देण्याचा एकच प्रसंग जो आप्रीसूक्तशंसन त्याप्रसंगी येतो. येणेंप्रमाणें वसिष्ठ, विश्वामित्र व अत्रि या तीन गोत्रांस दोहोंकडून महत्त्व आहे. कश्यपाचें महत्त्व आप्रीसूक्त व आकाशांतील सप्तर्षीपैकी एक या दृष्टीनें आहे. तीच गोष्ट जमदग्नीची होईल. अगस्त्य व गोतम यांचा ॠग्मंत्रांत महत्त्वानें उल्लेख आहे.  

प्रवरसंस्थापक ॠषी खरोखर नऊ असून सात समजण्याचा प्रचार आहे, व पुढील दोन आणखी म्हणून घातले.

सात या आंकडयास प्रामुख्य कसें मिळालें व सर्व ॠषी विशिष्ट प्रवरांत कसे कोंडले गेले या विचारामधील दुसरा विचार झालाच आहे. परंतु सात आंकडयात ते ॠषीचे सात संप्रदाय आहेत ही कल्पना कोठून आली. हे सात संप्रदाय कोठेले असावेत. ज्या वेळेस होते हे आव्हान करणारेच केवळ नसून हवन करणारेहि होते आणि ज्या वेळेस होता, अध्वर्यु असें वर्गीकरण झालें नव्हतें त्या वेळेस महत्त्वाच्या ॠषींच्या नांवावरून होत्यांमध्येंच अनेक संप्रदाय स्थापन झाले असावे व कांहीच्या दृष्टीनें ते सात असावेत असें दिसतें.

यज्ञ वैयक्तिक उपासनेंचे स्वरूप टाकून जेव्हां सामुच्चयिक स्वरूप धारण करूं लगला तेव्हां प्रथमतः निरनिराळया समुच्चयांतले लोक एकत्र गोळा करून सार्वजनिक यज्ञ करावयाचा अशी कल्पना प्रथम प्रवर्तली असावी. आणि यासाठी जे समुच्चय घेतले ते विशिष्ट प्रवरसंस्थापक ॠषींच्या नांवावर मोडले जाणारे घेतले असावेत. होत्यांमध्यें सात संप्रदाय असून त्यांवर रूपकें होत होतीं असें पुढील अर्थावरून दिसतें.

सप्ततेअग्नेसमिधः सप्तजिव्हाः सप्तर्षयः सप्तधाम प्रियाणि॥
सप्तहोत्राः सप्तधात्वा यजन्ति सप्तयोनीरापृणस्वा घृतेन॥

हे अग्ने सात समिधा तुला अर्पिल्या जातात, तुझ्या जिव्हा सात आहेत, ॠषी सात आहेत, तुला प्रिय अशी सात स्थानें आहेत. सात होते सातप्रकारांनीं अगर सात ठिकाणीं तुझें यजन करतात. यासाठीं हे अग्ने तुपाच्या योगानें तुझीं सातहि उगमस्थलें भरून टाक.

निरनिराळया प्रकारच्या संप्रदायांनां एकत्र करण्यासाठीं जे प्रयत्न झालें त्यांत सात होते मिळून होणा-या यज्ञाची स्थापना आणि आप्री सूक्तांची योजना या गोष्टी प्रमुख होत. सात होत्यांच्या यज्ञसंस्थेचे प्रकार आज आपणांस उपलब्ध नाहींत. ॠत्विजांचे विशिष्टीकरण झालेली यज्ञसंस्था आपणांस उपलब्ध आहे, तथापि वर दिलेल्या ॠचेसारख्या ॠचा सात प्रकारच्या होत्यांचे स्मारक होत. प्रवरसंस्थापक जे ॠषी होत ते सात कुलांचे पूर्वज असावेत असें वाटत नाहीं. कां कीं सात कुलांपासून सर्व जनतेची उत्पत्ति होईपर्यंतचा इतिहास जाणण्याची शक्ति प्राचीन लोकांनां असणें शक्य नाहीं. सात पुरुषांपासून सर्व जनतेची उत्पत्ति ही गोष्ट उघड उघड अशक्य दिसते. ज्याप्रमाणें एका स्त्रीपुरुषापासून सर्वजनतेची उत्पत्ति देण्यासंबंधीची कल्पना मनोरंजक पण अनैतिहासिक तितकीच ही देखील होय. शिवाय प्रवरण ज्यांचे करावयाचें ते पूर्वज होते असें कशावरून? ‘प्रवरण’ या शब्दाच्या अर्थाकडे जर लक्ष दिले तर ते पुरुष पूर्वज नव्हते असें सिद्ध होईल. वरण म्हणजे निवड व प्रवरण म्हणजे प्रकर्षानें निवड. कोणत्याहि संप्रदायामध्यें आपल्या पूर्वजांच्या नांवाचा उच्चार करण्याऐवजी आपल्या संप्रदायांतील प्रमुख आचार्यांच्या नांवाचा उच्चार करण्याची प्रवृत्ति चोहोंकडेच आहे व आपण ब्रह्मयज्ञांग तर्पणांत ती पाहतोंच.

सात पुरुषांपासून प्रवरांच्या सहाय्याने आपल्या रक्ताचा इतिहास लावण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. त्याच्या योगानें आध्यात्मिक परंपराच कळणार आहे. एवढेच केवळ नव्हे तर प्रवरांची निवड होत होता व प्रवरांची निवड करण्याचें स्वातंत्र्य कमी करण्याचेहि प्रयत्न होत होते.