प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
वसिष्ठकुल
(२) सर्वानुक्रमणीसिद्ध कुलसंबंध व ॠग्मंत्रसिद्ध वंशसंबंध- मित्रावरुणांच मुलगे वशिष्ठ व अगस्त्य अगरस्त्याची बायको लोपामुद्रा.
(३) सर्वानुक्रमणीसिद्ध वंशसंबंध- मित्रावरूणाचे मुलगे अगस्त्य व वसिष्ठ. वसिष्ठाचे मुलगे मूळीक, चित्रमहस, शक्ति, शक्तीचे मुलगे पराशर व गौरिवांति.
वशिष्ठ- ॠ. मंडळ ७ यांतील बरीच सूक्तें वसिष्ठदृष्ट व कांही वसिष्ठ कुलातील ॠषींनीं दृष्ट आहेत असे अनुक्रमणीकार म्हणतात. व म्हणून सातव्या मंडळाला वसिष्ठ मंडळ असें म्हणतात. ५. ३३, ११ या ॠचेंत वसिष्ठ मित्रा वरूणाचा मुलगा असल्याचा उल्लेख आहे. तसेंच ७. ३३, १३ या ॠचेंत वसिष्ठ व मान याचा मित्रावरूण व ऊर्वशी यांच्यापासून जन्म झाल्याचा उल्लेख आहे.
शक्ति- हा ॠ. ७. ३२ या सूक्तांचा द्रष्टा आहे. याला वसिष्ठपुत्र असें अनुक्रमणींत म्हटलें आहे. परंतु याला आधार ॠग्वेदांत आढळत नाहीं. याच्या नावावर असलेल्या सूक्तांत व ॠग्वेदांत अन्यत्र शक्ति शब्द आला आहे परंतु तो व्यक्तिवाचक नाहीं.
पराशर- हा १. ६५ ते ७३ या सूक्तांचा द्रष्टा आहे. वरील सूक्तांत याचा उल्लेख नाहीं. ॠग्वेदात ७. १८, २१; १०४, २१या दोनच ठिकाणी पराशराचा उल्लेख आला आहे. परंतु सर्वानुक्रमणीकार यालाजे शक्तिपूत्र म्हणतात तें या ठिकाणीं सिद्ध होत नाहीं. ७. १८, २१ याठिकाणीं पराशराबरोबर वसिष्ठ व शतयातु यांचा उल्लेख आहे. निरुक्त ६. ३० मध्यें पराशर हें वसिष्ठाचेंच नांव आहे असें म्हटलें आहे.
मृळीक- हा १०. १५० या सूक्ताचा द्रष्टा आहे. सदर सूक्तांत मृळीक शब्द ब-याच वेळा आला आहे व त्याचा ‘सूक्तकार’ आणि विकल्पानें सुख असा सायणांनी अर्थ दिला आहे. ॠग्वेदांत आणखी पुष्कळ ठिकाणी मृळीक शब्द आला आहे. परंतु त्याचा सुख असाच सर्व ठिकाणी अर्थ केला आहे. अनुक्रमणीकार जे याला वसिष्ठ पुत्र म्हणतात त्याबद्दल ॠग्वेदांत अथवा इतर वेदांत आधार नाहीं. १०. ५५ सूक्तांतील ५ व्या मंत्रांत वसिष्ठाचा उल्लेख आहे. परंतु त्यावरून तो मृळीकाचा बाप ठरत नाहीं.
चित्रमहस्- हा १०. १२२ या सूक्तांचा द्रष्टा आहे व अनुक्रमणीकार याला वसिष्ठपुत्र असें म्हणतात. चित्रमहस् हे पद ॠग्वेदांत एकदाच व तें वरील सूक्तांतील पहिल्या ॠचेंत आहे. परंतु ते व्यक्तीचें नांव नसून अग्नाचें विशेषण आहे. सदर सूक्तातील शेवटच्या ॠचेंत ‘वसिष्ठासः’ असें बहुवचनी पद आहे. परंतु तेवढयावरून चित्रमहस् नांवाचा कोणी वसिष्ठपुत्र असल्याचे ठरत नाहीं.
गौरिवीति- हा ५. २९ व १०. ७३ व ७४ या सूक्तांचा द्रष्टा असून अनुक्रमणीकार याला शक्तिपुत्र असें म्हणतात. ॠग्वेंदात ५. २९, ११ याठिकाणीं एकदांच याचा उल्लेख आला आहे. परंतु त्यांत तो शक्तिपुत्र असल्याचें ठरत नाहीं.