प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास
विश्वामित्रकुल
(२) सर्वानुक्रमणीसिद्ध कुलसंबंध व ॠग्मंसिद्ध वंशसंबंध- कुशिकाचा मुलगा विश्वामित्र
(३) सर्वानुक्रमणीसिद्ध वंशसंबंध व कुलसंबंध- इपीरथाचा मुलगा कुशिक, कुशिकाचा मुलगा गाथी; गाथीचा मुलगा विश्वामित्र विश्वामित्राचे मुलगे ॠषभ, रेणु, अष्टक, कत, मधु छंद कताचा मुलगा उत्कील. मधुच्छंदाचे मुलगे अघमर्ष व जेता. विश्वामित्र कुलांतील प्रजापति व पूरण.
कुशिक- सर्वानुक्रमणीप्रमाणें हा ३. ३३, या सूक्ताचा द्रष्टा असून याला इषीरथपुत्र असें म्हटलें आहे. ॠग्वेदांत कुशिकाचा ब-याच वेळ उल्लेख आला असून तो सर्व ठिकाणीं कुलवाचक असा बहुवचनी आहे. ३.३३, ५. या ठिकाणीं हें एकवचनी पद एकाव्यक्तीचें नांव या अर्थानें आलें आहे. परंतु तेथें इषीरथपुत्र असा उल्लेख नाहीं. व इषीरथ या व्यक्ताचा ॠग्वेदांत उल्लेख नाहीं. या कुशिकाला सर्वानुक्रमणीकारांनीं १०. १२७ या सूक्ताचा द्रष्टा सांगतांना त्याला विकल्पानें सोभरिपुत्र असें म्हटलें आहे. परंतु त्यालाहि ॠग्वेदांत आधार नाहीं.
विश्वामित्र- ॠग्वेद मंडल तीन चा हा द्रष्टा असून त्यांतील बरीचशीं सूक्तें याच्या नांवावर आहेत. सर्वानुक्रमणीकार याला गाथीपुत्र असें म्हणतात. परंतु याला ॠग्वेदांत आधार नाहीं परंतु हाकुशिक याचा मुलगा असल्याबद्दल ३. ३३, ५ या ठिकाणीं उल्लेख आहे.
मधुच्छंद- ॠ. १.१ ते १० व ९. १ या सूक्तांचा हा द्रष्टा असून याला वैश्वामित्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत मधुच्छंदाचा उल्लेख नाहीं.
गाथी- या सूक्तकारांच्या नांवावर ३. १९ ते २२ हीं सूक्तें असून याला कुशिकपुत्र म्हटलें आहें. ॠग्वेदांत गाथी या व्यक्तींचा उल्लेख नसल्यामुळें तो कुशिकपुत्र असल्याचे ॠग्वेदावरून ठरत नाही.
ॠषभ- हा ३. १३ व १४ आणि विकल्पानें १०. १६६ या सूक्तांचा द्रष्टा असून याला विश्वामित्रपुत्र असें म्हटलें आहे. परंतु याला ॠग्वेदांत आधार नाहीं. ॠग्वेदांत ॠषभ पद ब-याच ठिकाणीं आले आहे परंतु ते व्यक्तिवाचक नाहीं.
रेणु- हा १०. ८९ या सूक्ताचा द्रष्टा असून याला विश्वामित्रपुत्र म्हटलें आहे. परंतु याला ॠग्वेदांत आधार नाहीं. ॠग्वेदांत रेणु नामक व्यक्तीचा उल्लेख नाहीं.
अष्टक- हा १०. १०४ या सूक्ताचा द्रष्टा असून यालाहि वैश्वामित्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
पूरण- हा १०. १६० या सूक्ताचा द्रष्टा असून यालाहि वैश्वामित्र म्हटलें आहे. ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
कत- हा. ३. १७; व १८ या दोन सूक्तांचा द्रष्टा असून याला वैश्वामित्र (विश्वामित्रपुत्र) म्हटलें आहे. वरील दोन्ही सूक्तांत विश्वामित्राचा उल्लेख नाहीं व ॠग्वेदांत कत याचा उल्लेख नाहीं.
उत्कील- हा ३.१५;१६ या दोन सूक्तांत द्रष्टा असून याला कात्य (कतपुत्र) म्हटले आहे. वरील दोन्ही सूक्तांत विश्वामित्राचा उल्लेख नाही व ऋग्वेदात कत या व्यक्तीचा उल्लेख नाही.
जेता- हा. १. ११ या सूक्ताचा द्रष्टा असून याला मधुच्छंदपुत्र म्हटलें आहे. सदर सूक्तांत अथवा ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
अघमर्षण- १०. १९० या सूक्ताचा हा द्रष्टा असून या मधुच्छंदपुत्र म्हटलें आहे. सदर सूक्तांत व ॠग्वेदांत याचा उल्लेख नाहीं.
प्रजापति- ३. ३८ या सूक्ताचा हा द्रष्टा (विकल्पानें) असून याला वैश्वामित्र असें म्हटलें आहे. परंतु हा वैश्वामित्र असल्याचे ॠग्वेदावरून ठरत नाहीं.